Thursday, 6 April 2017

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाचे मार्केटिंग केले पाहिजे -जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे




उस्मानाबाद,दि.6:-शेतकऱ्यांनी फक्त उत्पादक होवून न थांबता आपल्या शेतीमालाचे मार्केटिंग देखील केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे केले.
        कृषी व आत्मा विभाग यांच्या वतीने बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी मार्गदर्शक चर्चासत्राचे आयोजन  जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, एनसीडीइएक्स कंपनीचे श्री.राघवन व श्री. शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
        यावेळी पुढे बोलताना डॉ. नारनवरे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे वळले पाहिजे,जमिनीचे संवर्धन करायचे असेल तर सुक्ष्मसिंचनाने शेतीसाठी पाण्याचा वापर केला पाहिजे तसेच शेततळे करून त्याचा शेतीसाठी फायदा घ्यायला हवा, शेतबांधावर काही अंशी फळझाडे लावून उत्पन्न घ्यावे.
        अर्थ शास्त्रीय सिध्दांत सांगताना ते म्हणाले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित का कोलमडून पडते तर शेतकरी हा केवळ शेतीवरच अवलंबून आसतो  शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय जसे शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय केल्यास शेतकरी आर्थिक सक्षम होण्यास मदत होईल.त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे,त्यासाठी त्यांनी आपल्या शेतमालाचे प्रोसेसिंग,ब्रॅन्डींग व मार्केटिंग करून शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत स्वत:चा उदयोग तयार करावा, असे ही डॉ. नारनवरे यावेळी म्हणाले.
        यावेळी श्री. रायते म्हणाले की, मोठमोठया उदयोगात गुंतवणूक होते परंतु शेतीत गुंतवणूक होत नाही त्यामुळे शेतीचे चित्र बदलत नाही यासाठी शेतीत गुंतवणूक करून शेती आधारित प्रक्रिया उदयोग शेतकऱ्यांनी उभारावेत.
एन.सी.डी.इ.एक्स.टीमचे सदस्य तथा राम रहिम शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक श्री.राघवन यांनी शेती उत्पादन, प्रोसेसिंग, ब्रॅन्डींग व मार्केटिंग विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादक कंपनीचे मार्केटिंग व्यवसायाचे सादरीकरण यावेळी त्यांनी केले व  एन.सी.डी.इ.एक्स, मंढी.कॉम वेबसाईडवर वायदे बाजार, मार्केटिंगचे फायदे शेतमालाचे दर महिन्याचे भाव पाहण्यास मिळतील असे सांगितले.यावेळी योगेश शर्मा यांनी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपन्यानी वायदे बाजारात उतरावे, असे आवाहन केले.

        यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, डॉ. अनिल भिकाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले यांनी केले. यावेळी जिल्हयातील शेतकरी गटांचे सदस्य, शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद, शेतकरी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.