Friday, 13 February 2026
नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरती प्रक्रियेला वेग; निवड व प्रतीक्षा याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई भरती प्रक्रियेला वेग; निवड व प्रतीक्षा याद्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
धाराशिव दि.१३ फेब्रुवारी (जिमाका) नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड संवर्ग) पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला असून संबंधित उमेदवारांनी अधिक माहितीसाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित पाठपुरावा करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गातील 284 पदे भरण्यासाठी आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत माहे जुलै 2025 मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेचा निकाल दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता.निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षण तसेच गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
कागदपत्र पडताळणीअंती तयार करण्यात आलेल्या निवड यादी, प्रतीक्षा यादी,निवडीस नकार दिलेल्या उमेदवारांची यादी,अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनासाठी बोलाविण्यात येणार असून समुपदेशनाचे ठिकाण व दिनांक लवकरच विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.तरी सर्व संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत माहिती तपासावी,असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी कळविले आहे.
00000