उस्मानाबाद , दि. 22:-
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज
दिनांक 22 डिसेंबर 2016 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली . यावेळी आ. मधुकर चव्हाण , आ. राणा जगजितसिंह पाटील ,
आ. सुजितसिंह ठाकूर , आ. ज्ञानराज चौगुले, आ. राहूल मोटे , खा. रविंद्र गायकवाड हे
उपस्थित होते .
या बैठकीमध्ये सर्वप्रथम दिनांक 20 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या
जिल्हा नियोजन समिती
बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली ,
जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 मधील
सर्वसाधारण , अनुसूचित जाती उप
योजना व आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजनांचा माहे नोव्हेंबर 2016 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्री डॉ. सावंत
यांनी घेतला . तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 मधील सर्वसाधारण ,
अनुसूचित जाती उप योजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांच्या पुनर्विनियोजनाच्या एकूण 1 हजार
770 लक्ष एवढ्या निधीस मंजूरी देण्यात आली .सन 2017-18 मधील जिल्हा वार्षिक सर्वसाधारण , अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनानिहाय प्रारुप आराखड्यास यावेळी मंजूरी देण्यात आली .
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2016-17 करीता एकूण 17 हजार 492
लक्ष रुपये मंजूर असून आजपर्यंत 3 हजार 116 लक्ष एवढा निधी खर्च झाला आहे . जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती
उपयोजना सन 2016-17 साठी 6 हजार 292 लक्ष
एवढा निधी मंजूर असून त्यापैकी 4 हजार 924
लक्ष एवढा निधी खर्च झाला आहे तर जिल्हा
वार्षिक आदिवासी उप योजना सन 2016-17 साठी 215.57 लक्ष एवढा निधी जिल्ह्यासाठी मंजूर असून त्यापैकी 27.83
लक्ष निधी आतापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुधारक आडे
यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे सभागृहासमोर सादर केली.
या सादरीकरणानंतर पालकमंत्री
महोदयांनी सर्व विभाग प्रमुखास मार्च 2017
पर्यंत निधी 100 टक्के खर्च करण्याच्या
सूचना यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री महोदयांनी मागील इतिवृत्ताच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढीलप्रमाणे सूचना दिल्या --
जिल्ह्यात रस्ते , पाणी , वीज, आरोग्य
आदींबाबत चांगल्या प्रकारच्या
सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे .
जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती . सरतेशेवटी जिल्ह्यात
अतिवृष्टी होऊन सोयाबीन या पिकाचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले आहे . याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
पीक विम्याची रक्कम मिळेल याबाबत
तात्काळ कार्यवाही करावी . पॉली हाऊस , शेड नेट , शेततळे , कांदा चाळी याबाबत कृषी
विभागाकडे प्राप्त प्रस्तावांवर तात्काळ कार्यवाही करुन सर्व संबंधित शेतकऱ्यांना
निधी वितरीत करण्यात यावा.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या त्या नोटीस
तात्काळ रद्द करण्यात याव्यात अशा स्पष्ट
सूचना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या . याबाबत 15
दिवसांच्या आत संबंधित बँकेने केलेली
कार्यवाही अध्यक्षांना अवगत करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सूचित केले .
यावेळी सर्व आमदार व
खासदारांनी अध्यक्ष महोदयांना विनंती केली की ,
शेतकऱ्यांकडील कर्ज माफीबाबत शासनास विनंती करावी.
ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर
त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर तात्काळ बसवून देण्यात यावे अशा सूचनाही यावेळी
अधिक्षक अभियंता महावितरण यांना देण्यात आल्या .
कसबे तडवळे येथे ज्या शाळेस
डॉ. आंबेडकरांनी भेट दिली होती ,तेथे डॉ.
आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत समाज कल्याण विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी
पालकमंत्री महोदयांनी जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अभियंता श्री. आनंद रायते यांना दिल्या .
यावेळी जिल्हा नियोजन समिती
सदस्या श्रीमती सुषमा देशमुख , श्रीमती छाया सोमवंशी , श्रीमती अलका भोसले
, श्रीमती कांचनमाला संगवे , श्रीमती कविता सरवदे , श्रीमती स्मिता ननवरे , श्रीमती पार्वतीबाई
गुलाबराव , श्रीमती कीर्तीमाला खटावकर ,
श्री. कैलास शिंदे , श्री. बाबूराव राठोड , श्री. दत्तात्रय साळुंके,
श्री. मधुकर मोटे , श्री. महेंद्र
धुरगुडे , श्री. संजय दुधगावकर , श्री. सुधाकर गुंड तसेच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत
नारवनरे , मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,
निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आणि सर्व
विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते .
