Saturday, 24 December 2016

प्रशासनामध्ये काम करताना सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांची अनमोल साथ मिळाली-जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे

वृत्त क्र. 999                                  दिनांक : 24-12-2016



उस्मानाबाद,दि.24:- एक कुशल प्रशासक, चांगले मित्र, चांगले मार्गदर्शक, एक कुटुंबप्रमुख, माणुसकी जपणारे, प्रामाणिक, मेहनती व दूरदर्शीपणा असणारे  प्रशासक अशी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची  ओळख जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. अशा या प्रशासकाचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांचा येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक 24 डिसेंबर 2016 रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. धनंजय रणदिवे यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी  ज्येष्ठ पत्रकार श्री. मोतीचंद बेदमुथा , श्री. राजा वैद्य, श्री. एस.ए. सय्यद व इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  जिल्ह्यामध्ये  अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी  शेतकरी व सर्वसामान्य जनतेला विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत तर केलीच परंतू एक नैतिक पाठबळही दिले असे गौरोवोद्गार पत्रकार संघाचे अध्यक्ष  श्री. रणदिवे यांनी याप्रसंगी काढले.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की , प्रशासनामध्ये काम करताना सर्व अधिकारी  व पदाधिकाऱ्यांची मला अनमोल साथ मिळाली. दुष्काळामध्ये  सामाजिक संस्थांनी  खूप मदत केली . मी या सर्वांचा आभारी आहे . जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या  जलयुक्त शिवार अभियान, कृषीक्रांती, पशुसंवर्धनासाठी जनजागृती अभियान, समूह गट शेती, आधुनिक पध्दतीने शेती व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण, फूल उत्पादक, विविध शेतकरी गटांची स्थापना ,  शेडनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन, महिला सक्षमीकरण, कृषी गटाचे सक्षमीकरण ,  शेतकऱ्यांच्या कंपन्या,  दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांचे आत्महत्येपासून मनपरिवर्तीत व्हावे यासाठी राबविण्यात आलेले बळीराजा चेतना अभियान, तुळजापूर मंदीर संस्थानचे प्रशासक या नात्याने तेथे करण्यात आलेल्या सुधारणा  व इतर अनुषंगिक बाबी  या जिल्ह्यासाठी यशस्वीपणे राबविता आल्या. याच बरोबर भूकंपामुळे बेघर झालेल्या उस्मानाबाद जिल्ह़यातील 977 जणांना 20 वर्षांनंतर हक्काच्या जागा प्राप्त झाल्या आहेत. या सर्वांना घरांचे वाटप करण्यात आले होते. मात्र त्याच्या नावावर घराच्या जागा नव्हत्या. आता कबाल्याच्या माध्यमातून त्यांच्या नावावर जागा करण्यात आल्या आहेत, नवजात अर्भकाचे जन्मत: मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रम,ई- ब्लड बँकेसारख्या उपक्रमांबाबतही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी  विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. हे उपक्रम राज्यात उस्मानाबाद पॅटर्न म्हणून प्रसिध्दीस आले . तसेच या उपक्रमांमधील काही उपक्रम हे राजस्थान व मध्यप्रदेश  या राज्यानेही स्विकारले आहेत.   ही उस्मानाबादसाठी  अभिमानाची बाब आहे .
 नुकतेच एक केंद्रीय पथक उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी  जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन एक अहवाल तयार केला असून त्या अहवालानुसार  जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबतचा उस्मानाबाद पॅटर्न हा मसूरी येथील भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थींच्या  अभ्यासक्रमामध्ये समाविष्ठ करण्यात येणार आहे .
अशाप्रकारे प्रत्येकाला सोबत  घेऊन काम करण्याच्या  त्यांच्या या  कौशल्याने  उस्मानाबाद मधील बहुतेक विभागांचे काम  हे राज्यात  अग्रेसर आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. संतोष हंबीरे यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार           श्री. मोतीचंद बेदमुथा  यांनी मानले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रतिनिधी श्रीमती आशा बंडगर, पत्रकार                 श्री. मल्लिकार्जून सोनवणे,श्री.उपेंद्र कटके, श्री. देविदास पाठक, श्री.राजेंद्र जाधव,श्री. संतोष जाधव, श्री. बिभीषण लोकरे, श्री. डोंगरे, छायाचित्रकार श्री. अजिंक्य माने , श्री. राहूल कोरे , श्री. ईस्माईल सय्यद आदी उपस्थित होते.
****