Wednesday, 11 January 2017

रस्त्यावरची गाडी चांगली चालवायला शिकलात तर आयुष्याची गाडी चांगली चालवाल ! जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे





उस्मानाबाद, दि.11:- मुले वयात यायला लागताच, आताच्या जीवन शैलीची गरज म्हणून  बहुतांश  लोकं  दोन चाकी , चार चाकी  वाहने खरेदी करतात. मात्र  आपल्या  मुलांच्या सवयींना, हट्टांना  आपणच  आवर घातला  पाहिजे,  सोळावं वरीस धोक्याचं असते, रस्त्यावरची गाडी चांगली चालवायला शिकलात तर आयुष्याची गाडी चांगली चालीवाल , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी आज येथे केले. 28 वा रस्ता  सुरक्षा सप्ताह  व राज्य रस्ता  सुरक्षा  अभियान 2017 निमित्त श्रीपतराव भोसले हायस्कूल  येथे आयोजित  जनजागृती कार्यक्रमात  ते बोलत होते .
यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, श्रीपतराव भोसले  हायस्कूलचे  संस्थापक  सरचिटणीस  के.टी. पाटील, अतिरिक्त  पोलीस  अधीक्षक डॉ. दिपाली घाटगे,  एस.टी. महामंडळाचे  विभागीय  नियंत्रक  राजीव साळवे  हे उपस्थित होते . 
डॉ. नारनवरे म्हणाले की , नियम सर्वसामान्यांच्या  हितासाठी  असतात, नागरिकांनी याची जाणीव  ठेवावी व  समजून घ्यावे , अति आत्मविश्वास  नडतो  , आपलेच नुकसान होते , सन्मानाने जगण्यासाठी नियमांचे पालन व अभ्यास हा मार्ग अवलंबिला पाहिजे . आपल्या चुकीमुळे  आपण इतरांच्या जीवाला  धोका निर्माण करु नये.तसेच आपण फक्त हेल्मेट/रस्ता सुरक्षा पुरतीच मर्यादित न राहता  चांगला  नागरिक  म्हणून  जगता आले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनाचे मूल्य, शिक्षण  कशासाठी  हे शिकवावे,  शिक्षण घेण्याच्या संधीने आपल्या व  इतरांच्या  आयुष्याचे  सोने करावे . असेही डॉ. नारनवरे यांनी उपस्थितांना सांगितले. भारत  2025 पर्यंत  सर्वात तरुण राष्ट्र  असणार आहे व याचे आपण महत्वाचा भाग असणार आहात.जे 16 वर्षांखालील मुले  गाडी चालविताना  सापडतील  त्यांच्या  पालकांना बोलावून समज द्यावी,असे डॉ. नारनवरे यांनी वाहतूक शाखेस आवाहन केले.
यावेळी मनोगत  व्यक्त करताना  नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर  म्हणाले की , वाहतुकीची शिस्त पाळणे आवश्यक आहे,16 वर्षांखालील विद्यार्थ्यांनी कोणतेही वाहन चालवू नये,हॉर्न न वाजविण्याबाबत  विद्यार्थ्यांनी  त्यांच्या पालकांना सांगावे , तसेच  वाहन चालविताना  जीवघेणी  स्पर्धा करु नये. 
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्तेसुरक्षित  ड्रायव्हिंग मार्गदर्शिका या पुस्तिकेचे  प्रकाशनही करण्यात आले .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते  यांनी आपल्या  मार्गदर्शनपर भाषणात  वाहतुकीची शिस्त,  हॉर्न वाजविणे , नियमांच्या  पालनाबाबतची  जनतेची  उदासीनता इत्यादी गोष्टींबाबत  खंत व्यक्त केली व  वाहतुकीच्या नियमांचे  सर्वांनी  पालन  करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या  पीढीला  रस्ते सुरक्षा नियमांचे, भविष्यातील सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याविषयी  माहिती देणारा हा उपक्रम स्तुत्य तर आहेच मात्र आवश्यकही आहे.  नियमांचे  पालन सर्वांनीच  करणे स्वत:साठी , कुटुंबासाठी  गरजेचे आहे.  लहानपणापासूनच  मुलांना या विषयाची जागृती  आवश्यक आहे. 
यानंतर प्रशासकीय अधिकारी एन.एम. हाजगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले . तसेच एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक  राजीव साळवे यांनी विद्यार्थ्यांसाठी एस.टी. महामंडळाच्या सोयी सुविधा आणि राबविण्यात येणारे उपक्रम यांविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक  महेश पाटील  यांच्या सुमधूर  आवाजातील  स्वागतगीताने झाली.यावेळी  काव्यदूत संजय आंधळे यांची  रोडपेक्षा घातक … घोडदौड … ही कविता इयत्ता  12 वी  मधील विद्यार्थीनी  नम्रता साळुंके हिने उपस्थितांसमोर सादर केली.
या कार्यक्रमास उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी  विलास कांबळे , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप , सहायक पोलीस निरीक्षक  शहर वाहतुक शाखा प्रशांत पाटील , श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य सुधीर पडवळ आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  सहशिक्षक  सूर्यकांत पाटील यांनी केले . तर प्रस्तावना  उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले .
****