जिल्हयातील
आठही तालुक्यात घेणार प्रशिक्षण
उस्मानाबाद,दि.17:- संभाव्य आपत्ती व्यवस्थापन पूरपरिस्थितीत
गावकऱ्यांची सुटका कशी करायची, एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर त्या व्यक्तीला
कसे वाचवायचे, याबाबतचे प्रशिक्षण दि. 14 जुलै ते दि. 28 जुलै 2017 या कालावधीत
हातलाई डोंगर परिसरात सुरु आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखा,
जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्याकडून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तलोरे, प्रशिक्षक योगेश परदेशी यांनी संपूर्ण
नियोजन केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात पोलीस,
होमगार्डस, अग्निशमण दल, आरोग्य हे विभागही सहभागी झाले असून विशेष म्हणजे संपूर्ण
जिल्हयात आठही तालुक्यात प्रत्येकी 4 दिवस असे एकूण 32 दिवस एक पथकात किमान 25
व्यक्ती असे सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यामध्ये पहिला दिवस पाठयक्रम
अभ्यासवर्ग व उर्वरीत 3 दिवस प्रात्यक्षिक असे प्रशिक्षणाचे स्वरुप आहे. अशा
रितीने आयोजित केलेले राज्यातील हे पहिलेच प्रशिक्षण आहे.
या प्रशिक्षणात मुख्यत: पाण्याचा
प्रवाह वेगात असताना व ज्या ठिकाणी बोट चालविणे अशक्य आहे अशा वेळी दोरीच्या
सहाय्याने एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव कसा वाचवायचा, ओबीएम बोटीचा वापर कसा
करायचा, जीवरक्षक साधनांचा वापर कसा करायचा, प्रथमोपचार पध्दतीचा कशा प्रकारे
उपयोग करायचा या कौशल्यावर विशेष मेहनत घेण्यात येत आहे.
या
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, मुख्य प्रशिक्षक योगेश परदेशी, दिनकर
कांबळे तसेच आरोग्य विभागाच्या अधिसेविका सरस्वती थोरात, परिसेविका नलिनी दलभंजन,
सुलभा भट, दिपाली सेलमोकर, प्रसाद गायकवाड तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य
संस्था, सोलापूर या संस्थेचे प्रशिक्षक व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली आहे.