Saturday, 22 July 2017

जिल्हयातील सर्व बँकामध्ये किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर वर 31 जुलै पर्यंत पिक विमा भरावा- जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद, दि.22 :-  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 साठी पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2017 असून बँका व्यतिरिक्त कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रावर विमा भरता येणार असल्याची माहिती पिक कर्जासाठीच्या आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.
            छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा व प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 साठी पिक विम्याचा हप्ता भरण्यासाठी मदत व्हावी याकरीता जिल्हयातील विविध भागात जवळपास 643 कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) असून त्यांची माहिती सर्व बँकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर  (CSC) मध्ये आधार कार्ड, सात-बारा, पिक-पेरा प्रमाणपत्र व बँक पासबुक हे कागदपत्र घेऊन ऑनलाईन पध्दतीने पिक विमा हप्ता भरावा व छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले.  
            या कार्यशाळेत महाऑनलाईनचे जिल्हा व्यवस्थापक संतोष गायकवाड यांनी उपस्थित सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) धारकांना शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी पात्र व अपात्र लाभार्थी यांच्या माहितीसह त्याबाबतचे फॉर्म ऑनलाईन कसे भरावयाचे आणि पिक विम्याचा हप्ता कशा पध्दतीने भरुन घ्यावयाचा याबाबतची माहिती उपस्थित सेंटरधारकांना कॉमन सर्व्हिस सेंटरचे प्रतिनिधी हेमंत मोटे, लक्ष्मीकांत कांबळे, वैभव मस्के यांनी दिली.
            यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हयातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) धारक उपस्थित होते.