Tuesday, 18 July 2017

जिल्हयात क्षयरुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ


उस्मानाबाद दि.18: - प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ दि.17 जुलै 2017  रोजी  जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, जि.प. उपाघ्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुक्यातील भगतसिंग तांडा या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणुमंत वडगावे यांच्या हस्ते सर रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला.
                                   यावेळी नगरसेवक शिवाजीराव गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या भराटे, डॉ. अनुराधा लोखंडे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपक पंडीत तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे  सर्व कर्मचारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ  उपस्थित होते.
                                  या प्रसंगी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी  दि. 17 ते 31 जुलै 2017 या कालावधीत समाजातील दुर्गम भागातील वंचित व जोखमी भागापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती या घरोघर भेट देऊन क्षयरुग्ण शोधण्याचे काम करणार आहेत. या मोहिमेस जनतेने सहकार्य करुन या क्षयरुग्ण शोध मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे सांगितले. 
            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी क्षयरोग ही गंभीर समस्या असून जनतेने या मोहिमेच्या माध्यमातून आपली तपासणी करुन घेवून लवकरात लवकर निदान करुन उपचार घ्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. नगरसेवक शिवाजीराव गवळी यांनी जनतेने या क्षयरुग्ण शोध मोहिमेचा लाभ करुन घ्यावा आव्हान केले व दुर्गम भागातून या मोहिमेचा शुभारंभ केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले. शेवटी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.