Tuesday, 14 February 2017

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज


उस्मानाबाद.दि.14:-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या जिल्हयात गुरूवार दि.16 फेब्रुवार 2017 रोजी होणाऱ्या 55 जिल्हा परिषद गट व 110 पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 8 हजार 770 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हयात 1 हजार 139 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.त्यातील 70 केंद्र हे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून त्या ठिकाणी पोलीसांची विशेष निगराणी राहणार आहे.

जिल्हयात दि.16 फेब्रुवार 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हयात एकूण 10 लाख 13 हजार 323 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 4 लाख 66 हजार 932 महिलांचा समावेश आहे तर 5 लाख 46 हजार 384 पुरूषांचा समावेश आहे. जिल्हयात प्रत्येक गावातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 1 हजार 139 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वाधिक मतदारांची संख्या ही उस्मानाबाद तालुक्यात 2 लाख 16 हजार 400 इतकी आहे. तुळजापूर तालुक्यात 1 लाख 71 हजार 367, उमरगा तालुक्यात 1 लाख 55 हजार 646, कळंब तालुक्यात 1 लाख 30 हजार 470, परंडा तालुक्यात 98 हजार 853, भूम तालुक्यात 94 हजार 28 इतकी, लोहारा तालुक्यात 81 हजार 756 तर वाशी तालुक्यात 64 हजार 803 मतदारांची संख्या आहे.

 जिल्हयात या निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक विभागाकडून मागील महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती ही तयारी दि. 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हयात तालुकानिहाय मतदानांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्राची उभारणी केली आहे. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक मतदारांची संख्या आहे. त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यात 228 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यात 189 केंद्र, उमरगा तालुक्यात 165, लोहारा तालुक्यात 87 केंद्र, कळंब तालुक्यात 161 केंद्र, भूम तालुक्यात 106 केंद्र, परंडा तालुक्यात 124 केंद्र तर वाशी तालुक्यात 79 केंद्र उभारण्यात आली आहेत. उस्मानाबाद जिल्हयात 1 हजार 139 केंद्रापैकी 70 केंद्र ही संवेदनशील म्हणून पोलिसांनी घोषित केले आहेत. त्यामुळे याठिकाणी विशेष पोलिस ठेवण्यात आले असून या संवेदनशील केंद्रावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक विभागाचेही विशेष लक्ष राहणार आहे.


निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, चार कर्मचारी, एक शिपाई, एक पोलिस कर्मचारी असे सात कर्मचारी काम पाहणार आहेत. याशिवाय 140 पथकांची विशेष निगराणी राहणार आहे.त्यात 46 व्हीडीओग्राफी,46 भरारी पथके राहणार आहेत.