उस्मानाबाद,दि.14:- शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी असल्याने
ग्रामीण भागातील तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. शहराबरोबर ग्रामीण
भागाचा विकास व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करुन
देऊन बेरोजगारीवर मात करुन त्यांचे जीवनमान उंचावेल यासाठी शासनाने बेरोजगारीच्या
प्रश्नावर तोडगा म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या
संयुक्त विद्यमाने स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद
चालू केली आहे.
केवळ शहरी भागाचा विकास होऊन चालणार
नाही, तर खेडयाचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना
गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास ही मदत
होईल व देशाच्या विकासात त्यांचे योगदान राहील.
ग्रामविकासाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे स्वप्न मूर्त स्वरुपात
साकारायचे असेल तर ग्रामीण भागात उदयोग व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे, यासाठी
ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण
संस्था, उस्मानाबादच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील
बेरोजगार तरुणांना निवडून प्रशिक्षण देणे व स्वयंरोजगार उभारणीसाठी मार्गदर्शन
करणे,ग्रामिण भागाच्या विकासाठी तरुणांना प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागात व्यवसाय
विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे, दारिद्रयरेषेच्यावर आणण्यासाठी युवकांना
प्रशिक्षण देणे हे संस्थेचे मुख्य उद्देश आहेत.
ग्रामीण भागातील तरुणांसाठी या
संस्थेचे 14 प्रकारचे प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचे राबविले जातात, टेलरिंग व
डिझायनिंग, ब्युटी पार्लर मॅनेजमेंट, शेळी पालन व मेंढीपालन, ग्रामिण उद्योजकता
विकास कार्यक्रम, कॉम्प्युटर बेसिक, बेसिक फोटोग्राफी व व्हीडीओग्राफी,
कुक्कुटपालन, मोटार ड्रायविंग, मोबाईल रिपेरिंग, कॉम्प्युटर टॅली, शोभंच्या वस्तू
बनविणे, दुचाकी दुरुस्ती, इलेक्ट्रीक मोटार दुरुस्ती, रंगकाम आदींचा समावेश आहे.
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत
प्रवेश मिळविण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. लाभार्थी ग्रामीण भागातील
रहिवासी असावा, लाभार्थीचे वय 18 वर्षे ते
45 वर्षांपर्यंत असावे, लाभार्थी दारिद्रयरेषेखालील असावा, कमीत कमी इयत्ता 4 थी
पास/ नापास असणे आवश्यक आहे,
निवड झालेल्या
प्रशिक्षणार्थींसाठी संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून, चहा, नाष्टा, भोजन विनामूल्य
आहे, उत्तम व अनुभवी शिक्षकामार्फत प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, अद्यावत मशिनरी,
सॉप्टवेअर, भरपूर प्रात्याक्षिके व सराव, उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण, बँक कर्ज
प्रस्ताव याबाबत मार्गदर्शन केले जाते.
प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे
आवश्यक आहेत - शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड/ रहिवाशी पुरावा, दारिद्रयरेषेखाली
असल्याचा पुरावा, ओळखपत्र आधार कार्ड/ मतदान कार्ड, पासपोर्ट साईज 5 फोटो आदींची
कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना
या संस्थेमुळे स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. तरी गरजू बेरोजगार
तरुण-तरुणींनी या संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन, संस्थेचे संचालक श्री. मिलिंद
सावंत यांनी केले आहे.