Monday, 2 January 2017

नमन क्रांतीज्योतीला !


          महाराष्ट्राच्या स्त्री जीवनाला  आकार देणारी  एक रचनात्मक  शक्ती  म्हणून  सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख अभिमानाने करता येतो.   सावित्रीबाईंनी  स्त्रीला  प्रतिष्ठा  दिली. स्त्रीच्या  व्यक्तिमत्वाचे  आणि कर्तृत्वाचे  उदात्त , क्रांतिकारक  दर्शन  त्यांच्यामुळेच  घडले असे म्हणायला प्रत्यवाय नाही .  आज  शतकानंतर  जेव्हा सावित्रीबाई  झाल्याच  नसत्या तर असा विचार  मनात येतो तेव्हा  त्यांच्या कार्याची  महानता जाणवते…  या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची दिनांक 3 जानेवारी रोजी जयंती … यानिमित्ताने सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाजकार्याला उजाळा देणारा हा लेख …
          नवविचारांच्या  या  ज्योतीचे तेज  आजच्या आणि उद्याच्या  महाराष्ट्राला  प्रेरणा देणारे आहे. सावित्रीबाईं फुलेच्या कार्यांस उजाळा देताना पुण्यप्रभाव या नाटकातील एक वाक्य आढवते …पुरुष ही परमेश्वराची  कीर्ती आहे, तर स्त्री ही  परमेश्वराची मुर्ती आहे…   स्त्रीला परमेश्वर म्हणण्यात एक प्रकारचे अपार  वात्सल्य , निर्मितीशीलतेचा  आणि सेवेतून संस्कार  करण्याचा , त्यागाचा  गुणधर्म लक्षात  घेतला तर स्त्रीच्या  सामर्थ्याची यथोचित  जाणीव  होऊ शकते . सावित्रीबाईंच्या समाज परिवर्तनशील कार्यामुळे त्यांच्या देवत्वाचेही दर्शन घडू शकते ... सावित्रीबाईंनी मृतवत  झालेल्या  समाजात  आणि स्त्रीच्या  जीवनात  नवा प्राण  ओतण्यासाठी  एकोणिसाव्या  शतकात  अखंड  संघर्ष केला …त्यांच्या लढ्याची  स्फूर्तीदायक  गाथा समजून  घेण्यासाठी  त्या कालखंडातील  सामाजिक  स्थितीगतीचे चित्र पाहणे  जरुरीचे वाटते …
दिनांक 3 जानेवारी  1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म  एका गरीब  शेतकरी कुटुंबात  शिरवळनजीकच्या  नायगाव( ता. खंडाळा , जि. सातारा)  या खेड्यात झाला . त्या छोट्याशा  खेड्यात  शिक्षणाची परंपरा  किंवा संस्कार  नसलेल्या घरात  जन्मलेल्या  सावित्रीबाईंनी लग्नानंतर  शिकून जोतिरावांच्या  खांद्याला  खांदा  लावून समाजक्रांतीचा  रथ आयुष्याच्या  अखेरच्या  क्षणापर्यंत  अव्याहतपणे  चालू  ठेवावा  ,  याचेच  नवल वाटते .  सुधारणांचा  हा रथ अंधश्रध्दांच्या  व रुढीपरंपरांच्या  काट्याकुट्यांच्या , खाचखळग्यांच्या अवघड  मार्गावरुन  चालत राहिला . समाजक्रांतीच्या त्या रथाचे  एक चाक  जोतिराव  आणि दुसरे चाक  सावित्रीबाई  फुले होत्या. सावित्रीबाई फुले या थोर समाजक्रांतीकारक  महात्मा जोतीराव फुले यांच्या सहधर्मचारिणी. आपल्या देदीप्यमान  ज्योतीने  जोतिबांनी  सावित्रीबाईंच्या  कर्तृत्वाची  ज्योत प्रज्वलित केली आणि  स्त्रीसुध्दा  पुरुषांच्या  बरोबरीने युगप्रवर्तक  कार्य करु शकते , हे जगाला सिध्द करुन  दाखविले .
महात्मा जोतिबा फुले  यांनी पुण्यात 1851 साली मुलींची शाळा सर्वप्रकारच्या विरोधाला तोंड देऊन  स्थापन केली , त्यामुळे  स्त्री शिक्षणाच्या आंदोलनाला भरती येऊ लागली . पुढे सावित्रीबाईंनी  शिक्षण घेतले आणि दीर्घकाळ  स्त्री शिक्षणाचे  कार्य त्या करत  राहिल्या . हे करताना  त्यांना अत्यंत खडतर  वाटेने  पावले  टाकावी  लागली.  क्रांतीची वाट कधीच सरळ  नसते .  अनेक  खाचखळग्यांनी आणि काट्याकुट्यांनी  भरलेल्या या वेड्यावाकड्या  वळणाच्या वाटेवरुन   चालणे  हे एक  दिव्य  आहे. पण फुले  पती- पत्नी  निर्धाराने , शांतपणे  वाटचाल  करीत राहिले . त्यामुळेच  महाराष्ट्रात  स्त्री शिक्षणाची  चळवळ सामर्थ्यवान बनली …
आपल्या समाजामध्ये स्त्रीचा जन्मच मुळी  अशुभ मानला जाई .  आजही  फारशी  वेगळी  स्थिती नाही ,  परंतू ज्या  काळात  स्त्रीने  शिकणे  हे महापाप  मानले जाई , त्या काळात  मुळात निरक्षर  असलेल्या  सावित्रीबाईंनी  आवश्यक तेवढे  शिक्षण  विवाहानंतरच  घेतले. प्रारंभी  पतीच्या आग्रहास्तव  आणि काळाच्या ओघात  स्वयंप्रेरणेने , स्वाध्यायाद्वारे , स्वत:च्या  अखंड  कार्यकर्तृत्वाने  त्या आद्यशिक्षिका, मुख्याध्यापिका , समाजसेविका , दीनदलितांच्या उध्दारक , इतकेच  नव्हे तर  आधुनिक  मराठी  कवितेच्या  गंगोत्री  बनल्या आणि  जोतिबांच्या  मृत्यूनंतर  तर सत्यशोधक  समाजाचे  नेतृत्वही त्यांनी सांभाळले.
 स्त्री पुरुष  समानतेचा  पुरस्कार  करणारा हजारो वर्षांपूर्वीचा वेदांचा काळ  लगेच संपला.  पुरुषप्रधान  संस्कृतीचे  जणू तमोयुगच  मध्यंतरी  अवतरले .  वेदांचे  अध्ययन  स्त्रीशुद्रादी  सर्व मानवांनी  करावे असे सांगणारे  यजुर्वेदाचे  आदेशही  हे तमोयुग  विसरले आणि स्त्री  व शुद्र  यांच्या नशिबी  दुर्देवाचे दशावतार भोगणे  आले . उच्चवर्णीयात  मोडणाऱ्या  जातींनी  स्त्री व शुद्र यांना पशूहूनही  हीन दर्जाची  वागणूक  दिली.  वंदनीय  सावित्रीबाईंनी  प्रथमच या उच्चवर्णीय  जातींच्या  वर्तनाविरुध्द  क्रांतीचे निशाण  फडकविले , स्त्रियांच्या मूलभूत  प्रश्नांना  हात घालणाऱ्या सावित्रीबाई पुन्हा जन्मल्या नाहीत हे आजवरचे विदारक सत्य आहे . वाणी  आणि करणी  यांचा अंत:करणी  मेळ घालणाऱ्या  सावित्रीबाई वंदनीय होत .
सावित्रीबाईंनी  मुलींसाठी  व अस्पृश्यांसाठी  शाळा काढणे , आपल्या  घरातच  बालहत्या-प्रतिबंधक गृह चालविणे , गोरगरीब कामगारांसाठी  रात्रशाळा  काढणे,  दुष्काळात  अन्नानदशा  झालेल्या  गरीबांसाठी  अन्नछत्रे  सुरु करणे , केशवपन विधवा विवाहबंदी  देवदासी  पध्दती इ. दुष्ट  प्रथांचे  उच्चाटन  करणे म्हणजे एकोणिसाव्या  शतकातले  या देशातील  चमत्कारच  होत …  फुले दाम्पत्यांच्या कार्याचा हा संपूर्ण  इतिहासच  रोमांचकारी आहे . या सर्व  कार्यात  सावित्रीबाईंनी  त्या काळात जोतिरावांना ज्या धैर्याने  साथ दिली , त्यास  तोड नाही .
 जुन्या काळी  नवरा वारला की त्याच्या  विधवेचे केशवपन  करणे ही  तिच्या  खाण्यापिण्याच्या  आणि वस्त्रप्रावरणाच्या  निर्बंधाबरोबरची  दुष्ट  पंरपरा  विधवांच्या बाबतीत  पाळली जात  असे . केशवपनामुळे स्वत:चे  तोंड लपवावेसे वाटावे  अशी परिस्थिती  त्यांच्यावर  लादली  जायची  आणि  दरमहा  वाढणारे  केस  कापण्यासाठी न्हाव्याला  सामोरं  जावं लागायचं … यावर सावित्रीबाईंनी  जोतिबांबरोबराच्या चर्चेतून एक विलक्षण  कल्पना  लढवली . त्यांनी  मुळी न्हाव्यांनाच  आवाहन  करणारी परिषद  घेतली . केशवपनाच्या  रुढीतून  स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या   अत्याचारांचं स्वरुप न्हावीबंधूंना  समजावून  सांगून , त्यांनी न्हाव्यांचा संप घडवला .  या संपाचं वेगळेपण हेच त्यातले  मोठेपण  आहे . हा संप न्हाव्यांच्या दरवाढीसारख्या  मागण्यांसाठी  नव्हता. उलट  या संपामुळे एका परीने त्यांच्या दरमहाच्या  उत्पन्नात  कायमची  कपात होण्याचीच खात्री  होती. तरीसुध्दा विधवा स्त्रियांबाबतच्या  बंधुभावातून  हा संप झाला .  यामुळे ही रुढी  कायमची  नाहीशी  झाली नसली , तरी तिच्या  क्रुरतेकडे  लक्ष वेधण्याचं, संवेदनशीलतेला जाग आणण्याचं  आणि रुढीचा फेरविचार  करण्यासाठी  आवाहन  करण्याचं बळ , या न्हाव्यांच्या संपानं  निश्चितच  गोळा झाले…
अशी  असंख्य कामे त्यांनी केली .. सावित्रीबाई फुले या कोणत्याच गुणात कमी नव्हत्या ….  त्या प्रतिभाशाली कवयित्री ,  उत्तम अभ्यासक , नि:स्वार्थी  समाजसेविका  आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर  सावित्रीबाईंनी  1893 च्या सत्यशोधक  परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले होते ..
महाराष्ट्रात 1896 साली दुष्काळ  पडला.  तो जोतिबांच्या निधानानंतरचा दुष्काळ . त्यापूर्वीच्या दुष्काळात  सावित्रीबाई – जोतिबांनी  बरोबरच  काम केलं होतं.  दुष्काळग्रस्तांसाठी  अन्नछत्र  चालवण्याचे काम  कष्टाचे आणि जबाबदारीचे होते . त्यापूर्वीच्या  1876-77 मधील दुष्काळात , जोतिबांनी  जनतेला  दुष्काळग्रस्तांसाठी  मदतीचं  आवाहन केले होते . मिळेल तेथून  अन्नधान्य जमवून सावित्रीबाईंच्या पुढाकाराने  अन्नछत्राची देखभाल  होत होती .  ठिकठिकाणी छायालये  उघडून  जवळपास दोन हजार  मुलामुलींसाठी  जेवणाची सोय करण्यात आली होते . छायालयाची  जबाबदारीही  सावित्रीबाई सांभाळत  होत्या . 
जोतिबांच्या  निधानानंतरच्या 1897 च्या प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा  करता करताच  सावित्रीबाईंना  रोगाची लागण  झाल्यामुळे सावित्रीबाई या साथीच्या  बळी ठरलया  !  एखाद्या  सैनिकाने किंवा  सेनानीने  युध्दात  लढता- लढता  मरण  स्विकारावे  तसेच मरण  सावित्रीबाईंनी  स्विकारले …
आज एकविसाव्या  शतकात  स्त्रीच्या प्रज्ञेने  आणि प्रतिभेने  अनेक कार्यक्षेत्रे   उजळून  टाकलेली दिसतात… राष्ट्राच्या  प्रशासनाची सुत्रेही  आजची स्त्री  हाती घेऊन  राष्ट्र चालवू  शकते हे आता ऐतिहासिक सत्य बनले आहे …पण या कर्तृत्वाचा जन्म एका  सावित्रीच्या व्यक्तिमत्वातून  झाला हे  आपणास मान्य करावेच  लागेल …

अशा या थोर सामाजिक कार्यकर्त्या क्रांतीज्योती  सावित्रीबाई  फुले यांचे महानिर्वाण  दि. 10 मार्च 1887  रोजी झाले .
सावित्रीबाईंनी जबाबदारीनं निभावलेले व्यक्तिगत  आणि सामाजिक  पालकत्व  हेही खणखणीतपणे  ठेवणे महत्वाचे आहे… शंभर वर्षांपूर्वी दगड – शेणगोटे  खाल्ले  म्हणून  आम्ही  आजच्या स्त्रिया  फुले झेलतो आहोत … सावित्रीबाईंच्या  पुण्यस्मृतीला माझे  शतश:  अभिवादन !

                                                                   --आशा बंडगर ,
                                                                   सर्वसाधारण सहायक तथा
                                                                   माहिती सहायक
                                                                   जिल्हा माहिती कार्यालय ,

                                                                   उस्मानाबाद