उस्मानाबाद.दि.6:- 12 जानेवारी हा दिवस
युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालय,
शिक्षण, क्रीडा,आरोग्य, नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “लोकराज्य युवा दौड”चे जिल्हयात सर्वत्र आयोजन
करण्यात येणार आहे.
लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र असून या
मासिकाचा उपयोग ज्ञानाकरिता शेतकरी, नोकरदार वर्ग,विद्यार्थी अशा सर्वानाच होतो. याचा
होणारा लाभ सर्वदूर तळागाळापर्यंतच्या जनतेला व्हावा म्हणून जिल्हा माहिती
कार्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या संबंधीच्या नियोजनाची बैठक नुकतीच
जिल्हा क्रीडा विभागाच्या कार्यालयात पार पडली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.
संजय महाडिक, शिक्षणाधिकारी (प्राथ.)श्री. सचिन जगताप, नेहरु युवा केंद्राचे
लेखाधिकारी श्री.विकास कुलकर्णी, तालुका क्रीडा संयोजक, क्रीडा शिक्षक, नेहरु युवा
केंद्राचे समन्वयक आदी उपस्थित होते. “लोकराज्य दौड” या माध्यमातून सर्व
जनतेला ,युवक युवतींना लोकराज्य मासिक, शिक्षणाचे, खेळाचे, आरोग्याचे महत्व , नेहरु
युवा केंद्राचे महत्व याद्वारे युवा युवतींना मिळणारा लाभ या विषयांची जनजागृती
केली जाणार आहे.
अशा प्रकारची “लोकराज्य युवा दौड” ही निश्चितपणे राज्यात
उस्मानाबाद जिल्हयाचे नावलौकिक वाढविणारी ठरेल असा आत्मविश्वास या बैठकीस उपस्थित
असणाऱ्या सर्वानी व्यक्त केला व हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार केला.
****