Thursday, 9 November 2017

महिलांनी नेतृत्व स्वीकारुन इतरांना मार्गदर्शक व्हावे - जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे




उस्मानाबाद, दि.9:- शासनामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा महिलांनी उपयोग करुन घ्यावा व विविध उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी सकारात्मक भावनेतून एकत्र येऊन स्वत: चा कुटुंबाचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास घडवावा व महिलांनी नेतृत्व स्वीकारुन इतरांना मार्गदर्शक व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले.

स्वयंम शिक्षण प्रयोगच्या वतीने लेडीज क्लब येथे “राष्ट्रीय व्यवसायिकता दिवस” निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.गमे बोलत होते. यावेळी स्वयम शिक्षण प्रयोग च्या संचालिका प्रेमा गोपालन, उपमन्यु पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. बोराळकर, देआसरा फौंडेशन पुणे चे श्री अनिल पाठक, उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे श्री संजय मंत्री, लक्ष्मिकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले की, महिलांनी विविध प्रशिक्षणाचा उपयोग करुन व्यवसायात उतरावे, यामुळे एक महिला पूर्ण कुटुंबाची प्रगती करु शकते.येथिल महिला बचत गटांनी जिल्ह्यातील उत्तम वस्तूंचा पुरवठा इतरांना देण्याइतके सक्षम व्हावे, त्याचबरोबर पर्यावरणाचा विचार ही करायला हवा व यासाठी पर्याय शोधून त्यामाध्यमातून पर्यावरण संरक्षणही करावे, सौरउर्जेकरिता आपला जिल्हा सर्वोत्तम आहे त्याचाही उपयोग करुन शासनाच्या योजनांचा अभ्यास करावा व त्याचा लाभ बचत गटांनी करुन घ्यावा.

कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून विविध शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण घेवूनही महिला बचत गट मोठया संख्येने चांगले व्यवसाय, उद्योग सुरु करुन यशस्वी होवू शकतील, असे ही श्री.गमे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये यशस्वी महिला उद्योजकांचे अनुभव कथन व मार्गदर्शन झाले. यामध्ये यशस्वी 30 महिला उद्योजकांना स्वयम शिक्षण प्रयोग च्या वतीने दर वर्षी यशस्वी पुरस्कार योजना देण्याचे जाहीर केले. त्याच सोबत आम्ही सखी यशकथा बुलेटीन चे विमोचन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. काकासाहेबआडसुळे, सूत्रसंचालन आणि आभार श्री. किरण दिगंबर माने यांनी केले.  या कार्यक्रमामध्ये 5 जिल्हयातील 200 गावातून 450 महिला व्यवसायिक आपल्या उत्पादनासह सहभागी झाल्या होत्या.   

Sunday, 5 November 2017

वृक्षलागवडीची जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचे उस्मानाबादेत स्वागत


उस्मानाबाद, दि. 5:- वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष लागवड मोहिमेच्या चित्ररथाचे उस्मानाबादमध्ये आगमन झाले आहे. या रथाचे स्वागत करून हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. ए.पी. पवार, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासन व वन विभागाच्या वतीने सन 2018 मध्ये पावसाळयात 13 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी या चित्ररथाच्या माध्यामतून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती केली जात आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण यांच्या हस्ते चित्ररथाचे स्वागत करुन चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी श्री. गमे यांनी उपस्थित नागरिकांना वृक्षलागवडीचे महत्त्व सांगितले. तसेच जिल्ह्यात अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले. यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेली रोपे, तसेच नागरिकांच्या मदतीसाठी आणि जनजागृती करण्यासाठी देखील प्रशासनाने पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.

वृक्ष लागवड मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी २०१७, २०१८ आणि २०१९ या वर्षात अनुक्रमे ४ कोटी, १३ कोटी आणि ३३ कोटी असे एकूण ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वनविभागाने केला आहे. याच संकल्पाच्या पूर्तीसाठी या वर्षी लोक सहभागातून ४ कोटी वृक्ष लावण्याची मोहीम वन विभागाने हाती घेतली आहे.  

Wednesday, 1 November 2017

उस्मानाबाद येथे महा रेशीम अभियानाचा शुभारंभ


उस्मानाबाद, दि.1:-  महाराष्ट्रात रेशीम उद्योगाचा विकास तळागाळातील, खेडयातील शेतकऱ्यांना माहिती व्हावा, या उद्देशाने महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने उस्मानाबाद येथे महा रेशीम अभियानाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्ह्यात 250 एकर नवीन तुती लागवडीचा लक्षांक दिलेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत नवीन शेतकऱ्यांची निवड करणेकरिता महा रेशीम अभियान राबवून गावो गावी कार्यक्रम व ग्रामसभा घेवून शासन निर्णयानुसार योजनेंतर्गतचे देय लाभ व रेशीम उद्योगाची कार्यपध्दती तसेच या उद्योगापासून मिळणारे उत्पन्न याबाबतची माहिती आणि शेतकऱ्यांना रेशीम उद्योग करण्यास प्रवृत्त करणे, मनरेगांतर्गत 229 एकर क्षेत्रावर तुती लागवड करण्यात आली असून 18 गावामध्ये 275 लाभार्थ्यांकडे कामे चालू आहेत.
सन 2018-19 मध्ये मनरेगांतर्गत तुती लागवड करण्यासाठी नवीन लाभार्थी करिता महा रेशीम अभियान दि.1 ते 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिलह्यातील शंभर गावामध्ये कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.   
यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार राहूल पाटील, जिल्हा रेशीम अधिकारी श्री.मुल्ला.एम.के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, रेशीम कार्यालयाचे  उस्मानाबाद समुह प्रमख श्री. एस.ई.इप्पर, बार्टी पुणेचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, केंद्रीय रेशीम मंडळाचे सह संचालक श्री.ए.पी.बागडे आदीसह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.