Wednesday, 7 October 2026

कुष्ठरोग शोध मोहिमेत १.२८ लाख नागरिकांची तपासणी* * ६७२ संशयित आढळले * ४८० जणांची तपासणी पूर्ण * सहवासित तपासणीत तीन असंसर्गिक * तर फोकस लेप्रसी कॅम्पेनमध्ये एक संसर्गिक रुग्ण आढळला

*कुष्ठरोग शोध मोहिमेत १.२८ लाख नागरिकांची तपासणी* * ६७२ संशयित आढळले * ४८० जणांची तपासणी पूर्ण * सहवासित तपासणीत तीन असंसर्गिक * तर फोकस लेप्रसी कॅम्पेनमध्ये एक संसर्गिक रुग्ण आढळला धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) कुष्ठरोगाबाबत समाजात असलेली भीती, गैरसमज आणि कलंक दूर करण्याबरोबरच रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.दि.१६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सहवासित तपासणी व फोकस लेप्रसी कॅम्पेन अंतर्गत २ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातून ६७२ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ही विशेष कुष्ठरोग जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय मागील पाच वर्षांत शोधण्यात आलेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांची तपासणी या कालावधीत करण्यात येत आहे. तसेच मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये संसर्गिक रुग्ण,१४ वर्षांखालील बालरुग्ण तसेच विकृती ग्रेड-१ व ग्रेड-२ चे रुग्ण आढळले आहेत, अशा गावांमध्ये फोकस लेप्रसी कॅम्पेन सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. समाजामध्ये कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज आणि कलंक दूर व्हावा, नागरिकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि संशयित रुग्णांचे लवकर निदान व्हावे,या उद्देशाने विशेष जनजागृती व कुष्ठरोग तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे,प्रतिबंध, निदान आणि उपचार याबाबत माहिती देण्यात येत आहे.तालुकानिहाय २५ हजार ५४१ घरांतील नागरिकांची तपासणी फोकस लेप्रसी कॅम्पेनअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ५४१ घरांतील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव तालुक्यात ६ हजार ९६४ घरांतील ३५ हजार ८२३ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यातून १०३ संशयित शोधण्यात आले असून, ७२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.तुळजापूर तालुक्यात ४ हजार ५८९ घरांतील २३ हजार ४४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये २५३ संशयित आढळून आले असून, त्यापैकी २०१ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. वाशी तालुक्यात २ हजार ५२४ घरांतील १२ हजार १७० नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये १५ संशयित शोधण्यात आले असून,सर्व १५ संशयितांची तपासणी पूर्ण झाली आहे.लोहारा तालुक्यात १ हजार ८३९ घरांतील ९ हजार १३६ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये २७ संशयित शोधण्यात आले असून,सर्व २७ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. भूम तालुक्यात २६५८ घरांतील १३ हजार १७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये ८२ संशयित आढळून आले असून, ३२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.परंडा तालुक्यात १२० घरांतील ५७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ४ संशयित शोधण्यात आले असून,चारही संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. कळंब तालुक्यात १ हजार ४८९ घरांतील ७ हजार ४३९ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ३९ संशयित शोधण्यात आले असून,३७ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.तर उमरगा तालुक्यात ५ हजार ३५८ घरांतील २६ हजार ६८२ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये १४९ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ९२ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण २५ हजार ५४१ घरांतील १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, ६७२ संशयित शोधण्यात आले आहेत. त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. १४ हजार ४६३ सहवासितांपैकी ११ हजार २७७ जणांची तपासणी दि. १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण १४ हजार ४६३ सहवासितांपैकी ११ हजार २७७ सहवासितांची तपासणी करण्यात आली आहे.या तपासणीत तीन नवीन पी.बी. (असंसर्गिक) रुग्ण शोधून काढण्यात आले आहेत. फोकस लेप्रसी कॅम्पेनअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५ लाख ८७ हजार ४६४ लोकसंख्येपैकी १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.या तपासणीत ६७२ संशयित शोधण्यात आले असून,त्यापैकी ४८० संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.त्यातून एक नवीन एम.बी.(MB-संसर्गिक) रुग्ण शोधून काढण्यात आला आहे. *ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका* त्वचेवर संवेदना कमी झालेला,न खाजणारा,न दुखणारा फिकट, पांढरा किंवा लालसर बधिर चट्टा दिसणे,त्या भागातील केस व घाम कमी होणे,हात-पायांमध्ये मुंग्या येणे अथवा संवेदना कमी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे तसेच चेहरा तेलकट दिसणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत किंवा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. *कुष्ठरोग उपचाराने पूर्णपणे बरा होतो* कुष्ठरोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.संसर्गिक रुग्णाला १२ महिने,तर असंसर्गिक रुग्णाला सहा महिने उपचार दिले जातात.कुष्ठरोगाचे निदान आणि बहुविध औषधोपचार (MDT) शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. वेळेवर निदान होऊन उपचार सुरू झाल्यास अपंगत्व टाळण्यास मदत होते. अभियानाच्या माध्यमातून गावोगावी तसेच वॉर्डनिहाय जनजागृती करण्यात येत आहे. संशयित रुग्णांची तपासणी,निदान झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी कुष्ठरोगाबाबत भीती किंवा गैरसमज बाळगू नयेत. संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.‘कुष्ठरोग लपवू नका; लवकर तपासणी करून घ्या,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांना सहकार्य करावे आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीस हातभार लावावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव डॉ.सतीश हरिदास आणि सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (कुष्ठरोग),धाराशिव डॉ.एम.आर. कोरे यांनी केले आहे. ****************