Tuesday, 6 October 2026
‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ अभियानाला धाराशिवमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद* ३० वर्षांवरील १ लाख ६५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
*‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ अभियानाला धाराशिवमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद*
३० वर्षांवरील १ लाख ६५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
धाराशिव,दि.६ ऑक्टोबर (जिमाका) आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा तो होण्यापूर्वी किंवा सुरुवातीच्या टप्प्यातच त्याची चाहूल लागणे अधिक महत्त्वाचे ठरते.विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासारख्या असंसर्गजन्य आजारांची सुरुवातीची लक्षणे अनेकदा जाणवतही नाहीत.याच पार्श्वभूमीवर नागरिकांमधील असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून योग्य उपचार सुरू करता यावेत आणि गंभीर आजारांमुळे निर्माण होणारे धोके कमी करता यावेत,या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने १ सप्टेंबर २०२६ पासून ‘तिशीचा पल्ला,तपासणी आणि सल्ला’ अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,आतापर्यंत ३० वर्षांवरील तब्बल १ लाख ६५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ७ लाख ७३ हजार नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी केली जात आहे. विशेषतः कर्करोग,मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधून त्यांना पुढील उपचार तसेच आवश्यक संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.तपासणीत एखादा आजार किंवा संशयित लक्षणे आढळल्यास संबंधित नागरिकाला पुढील तपासणी आणि उपचारासाठी योग्य आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात येत आहे.
*मुख कर्करोगासाठी ७६ हजार ११६ नागरिकांची तपासणी*
अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ७६ हजार ११६ नागरिकांची मुख कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी संदर्भ सेवेकडे पाठविण्यात येत आहे.त्यामुळे कर्करोगाचे निदान वेळेत होऊन आवश्यक उपचार लवकर सुरू करण्यास मदत होत आहे.
*स्तन कर्करोगासाठी १० हजार ३०५ महिलांची तपासणी*
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तन कर्करोग तपासणीवरही विशेष भर देण्यात आला आहे.आतापर्यंत १० हजार ३०५ महिलांची स्तन कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली असून,त्यापैकी संशयित आढळलेल्या २० रुग्णांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी संदर्भ सेवेकडे पाठविण्यात आले आहे.
*गर्भाशयमुख कर्करोगासाठी ८ हजार ५६७ महिलांची तपासणी*
महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे,यासाठीही अभियानांतर्गत विशेष तपासणी करण्यात येत आहे.आतापर्यंत ८ हजार ५६७ महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे.त्यापैकी १० रुग्णांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भ सेवेसाठी पाठविण्यात आले आहे.
*२,१८७ जणांना मधुमेह; २,०९७ जणांना उच्च रक्तदाब*
कर्करोग तपासणीसोबतच नागरिकांची मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठीही तपासणी करण्यात येत आहे.आतापर्यंत २ हजार १८७ नागरिकांमध्ये मधुमेह, तर २ हजार ९७ नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे.या रुग्णांवर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले असून,त्यांना नियमित उपचार, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले जात आहे.
*तिशीनंतर नियमित तपासणी महत्त्वाची*
अनेक आजारांची सुरुवातीची लक्षणे स्पष्टपणे जाणवत नसल्यामुळे त्यांचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते.आजार गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर उपचार सुरू करण्याऐवजी त्याचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावीपणे करता येतात. त्यामुळे ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.तिशीचा पल्ला,तपासणी आणि सल्ला’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करून आजारांचे वेळीच निदान करण्यावर भर देण्यात येत आहे.
तपासणीदरम्यान एखादा आजार किंवा संशयित लक्षणे आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी योग्य आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात येत आहे.त्यामुळे गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन आवश्यक उपचार तातडीने सुरू करण्यास मदत होत आहे.एका साध्या तपासणीतून भविष्यातील गंभीर आजाराचा धोका वेळीच ओळखता येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही लक्षणे जाणवण्याची वाट न पाहता स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील ३० वर्षांवरील नागरिकांनी ‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ अभियानाचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. तपासणीमध्ये आजाराचे निदान झाल्यास नियमित उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी यांनी केले आहे.
००००००