Friday, 9 October 2026

*सेवा संकल्पाचा जागर ; सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य,पर्यावरण संवर्धनाचा संदेश* जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दाखवला हिरवा झेंडा

*सेवा संकल्पाचा जागर ; सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य,पर्यावरण संवर्धनाचा संदेश* जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दाखवला हिरवा झेंडा धाराशिव,दि.८ ऑक्टोबर (जिमाका) नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ,पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देण्याचा संदेश देतानाच आरोग्यदायी जीवनशैली,पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी धाराशिव शहरात सेवा संकल्प अभियानांतर्गत सायकल व ई-बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय,बसवेश्वर चौक ते बार्शी रोड मार्गे निघून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे रॅलीचा समारोप झाला.विविध शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सेवा,आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. जिल्हा प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७.३० वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणे, शासकीय सेवांविषयी जनजागृती करणे तसेच युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश होता. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.विद्याचरण कडवकर,जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नावरे,शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक,आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अश्विनी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे,नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या प्रश्नांची संवेदनशीलतेने दखल घेतली जावी,ही लोकाभिमुख प्रशासनाची खरी ओळख आहे.सेवा संकल्प अभियान याच भावनेला बळ देणारे आहे.प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे,सेवा वितरणात गतिमानता आणणे आणि शासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे,या बाबींना अभियानाच्या माध्यमातून महत्त्व देण्यात येत आहे. *चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग ; नव्या पिढीकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश* या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्ह्यातील विविध शाळांमधील जवळपास ४०० विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग होता.विद्यार्थ्यांचा उत्साह, युवकांची ऊर्जा आणि उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सहभाग यामुळे रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. शालेय जीवनातच आरोग्य,पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत.त्यामुळे अशा उपक्रमांतून त्यांना केवळ सायकल चालविण्याचा आनंद मिळत नाही,तर सार्वजनिक हितासाठी एकत्र येण्याची प्रेरणाही मिळते. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा छोटासा प्रयत्नही महत्त्वाचा असतो. सायकलचा वापर,पर्यावरणपूरक वाहतुकीला प्राधान्य आणि शासकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या बाबींचे महत्त्व या रॅलीच्या निमित्ताने दिसून आले. या अभियानांतर्गत आयोजित सायकल व ई-बाईक रॅलीने शासकीय सेवा,सामाजिक सहभाग आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणला.नागरिकांना सेवा देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी आहे,हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या सायकल व ई-बाईक रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे,अक्षय बिरादार,क्रीडा मार्गदर्शक शुभांगी रोकडे,विश्वास खंदारे,डिंपल ठाकरे,जान्हवी पेठे,संपदा मोरे,किशोर भोकरे आणि सुरेश कळमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. सेवेचा संकल्प,आरोग्याचा जागर आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार या तिन्ही बाबींचा संदेश देणारी ही रॅली विद्यार्थी व युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे लक्षवेधी ठरली.प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्र येऊन समाजहितासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले. ००००००००००००