Tuesday, 6 October 2026
*हवामानाच्या धोक्यांपासून फळबागांना विम्याचे कवच* शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन अंबिया बहारात द्राक्ष,मोसंबी,डाळिंब, केळी,आंबा व पपईचा समावेश ; फळपिकानुसार विमा हप्ता भरण्याच्या अंतिम मुदती वेगवेगळ्या
*हवामानाच्या धोक्यांपासून फळबागांना विम्याचे कवच* शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन
अंबिया बहारात द्राक्ष,मोसंबी,डाळिंब, केळी,आंबा व पपईचा समावेश ; फळपिकानुसार विमा हप्ता भरण्याच्या अंतिम मुदती वेगवेगळ्या
धाराशिव दि.६ ऑक्टोबर (जिमाका) हवामानातील अनिश्चितता आणि अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान,सापेक्ष आर्द्रता,वेगाचा वारा तसेच गारपीट यांसारख्या हवामान धोक्यांपासून फळपिकांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी अंबिया बहारात द्राक्ष,मोसंबी,डाळिंब,केळी,आंबा व पपई या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत ऑनलाइन नोंदणी करून या योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल,तर कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकाकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत,त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
या योजनेअंतर्गत अवेळी पाऊस, कमी तापमान,जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता,वेगाचा वारा आणि गारपीट या हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळणार आहे.योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, ७/१२ उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांशासह फोटो आणि बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग नोंदवायचा असेल,त्यांनी नियमित व अतिरिक्त विमा हप्ता बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे.
फळपिकनिहाय विमा संरक्षण, शेतकरी हिस्सा आणि अंतिम मुदती निश्चित करण्यात आल्या आहेत.द्राक्ष पिकासाठी विमा हप्ता भरण्याचा अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२६ आहे. मोसंबीसाठी विमा संरक्षित रक्कम नियमित जोखमीसाठी प्रतिहेक्टरी ३ लाख ८० हजार रुपये व गारपिटीसाठी १ लाख २७ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा अनुक्रमे १५ हजार २०० रुपये आणि ९ हजार ५२५ रुपये आहे. मोसंबीसाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. डाळिंबासाठी नियमित विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी १ लाख ६० हजार रुपये व गारपिटीसाठी ५३ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा अनुक्रमे १३ हजार ६०० रुपये आणि २ हजार ६५० रुपये आहे.डाळिंबासाठी अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२७ आहे.केळीसाठी नियमित विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी १ लाख ७० हजार रुपये व गारपिटीसाठी ५७ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा अनुक्रमे १४ हजार ४५० रुपये आणि २ हजार ८५० रुपये आहे.केळीसाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.आंब्यासाठी नियमित विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी १ लाख ७० हजार रुपये व गारपिटीसाठी ५७ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा अनुक्रमे १४ हजार ४५० रुपये आणि २ हजार ८५० रुपये आहे.आंब्यासाठी अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२६ आहे. पपईसाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टरी १३ हजार रुपये असून,शेतकरी हिस्सा ३ हजार ४०० रुपये व अतिरिक्त विमा हप्ता ६५० रुपये नमूद करण्यात आला आहे.पपईसाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.
हवामानावर आधारित फळपिक विमा योजना अंबिया बहारासाठी फळपिकनिहाय अधिसूचित महसूल मंडळेही निश्चित करण्यात आली आहेत.पपई पिकासाठी धाराशिव ग्रामीण,केशेगाव,बेंबळी,जागजी, येडशी,अंबेजवळगे,कळंब,मस्सा ख., नायगाव,ईटकूर,येरमाळा,मोहा,शिराढोण, गोविंदपूर,तुळजापूर,सावरगाव,सलगरा दि.,ईटकळ,जळकोट,मंगरुळ,नळदुर्ग, आरळी बु.,तामलवाडी,परंडा,आसु, जवळा नि.,सोनारी,आनाळा,पाचपिंपळा, शेळगाव,भूम,वालवड, माणकेश्वर, अंभी,आष्टा,पाथुड,ईट,वाशी,तेरखेडा, पारगाव,पारा,गुरुम व डाळिंब ही महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.
आंबा,केळी,डाळिंब आणि द्राक्ष या फळपिकांसाठी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. मोसंबी पिकासाठी शिराढोण,गोविंदपूर, नायगाव,तुळजापूर,सावरगाव,सलगरा दि.,ईटकळ,जळकोट,मंगरुळ,नळदुर्ग, आरळी बु.,तामलवाडी,धाराशिव ग्रामीण, तेर,ढोकी,जागजी,अंबेजवळगे,येडशी, परंडा,आसु,जवळा नि.,सोनारी,आनाळा, पाचपिंपळा,शेळगाव,माणकेश्वर,अंभी, वालवड,ईट,वाशी,तेरखेडा,पारगाव व पारा ही महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.
वरील नमूद केल्याप्रमाणे फळपिकनिहाय अधिसूचित महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.बदलत्या हवामानामुळे फळबागांपुढील जोखीम वाढत असताना विम्याचे आर्थिक कवच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.त्यामुळे संबंधित महसूल मंडळांतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्धारित अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी पीएमएफबीवायच्या अधिकृत संकेतस्थळाचा (pmfby.gov.in) वापर करावा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
***************