Monday, 5 October 2026

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम *जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत ३८६ गावे व शहरी भागात घरोघरी तपासणी* ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची होणार तपासणी ; २१ हजार ३४१ सहवासितांची विशेष तपासणी

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम *जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत ३८६ गावे व शहरी भागात घरोघरी तपासणी* ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची होणार तपासणी ; २१ हजार ३४१ सहवासितांची विशेष तपासणी धाराशिव,दि.५ ऑक्टोबर (जिमाका) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोग संक्रमण शून्यावर’ आणण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेत जिल्ह्यातील ३८६ गावे व शहरी भागातील १ लाख १४ हजार २११ घरांना भेटी देऊन तब्बल ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २ हजार ५७२ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये ६१२ सांसर्गिक रुग्ण,६१ बालरुग्ण, ग्रेड-१ विकृती असलेले ३७ रुग्ण तसेच ग्रेड-२ विकृती असलेला एक रुग्ण आढळून आला आहे. ग्रेड-१ विकृतीमध्ये प्रामुख्याने तळहात किंवा तळपायाला बधिरता येते,तर ग्रेड-२ विकृतीमध्ये दिसणारी शारीरिक विकृती आढळते. ग्रेड-२ विकृती असलेला रुग्ण हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील असून,ऊसतोड मजूर म्हणून जिल्ह्यात आला होता. मागील पाच वर्षांत निदान झालेल्या सर्व कुष्ठरुग्णांच्या नजिकच्या सहवासितांची तपासणी करण्यात येणार आहे.यासाठी जिल्ह्यातील ५९१ गावांची निवड करण्यात आली असून,एकूण २१ हजार ३४१ सहवासितांची तपासणी केली जाणार आहे. नवीन निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांच्या नजिकच्या सहवासितांची तपासणी करून कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी पात्र सहवासितांना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) अंतर्गत रिफॅम्पिसिनची एक मात्रा देण्यात येणार आहे.सहवासितांना औषध देण्यापूर्वी आवश्यक तपासणी व वैद्यकीय निकषांची पूर्तता करण्यात येईल.कुष्ठरोगाच्या संपर्कातील पात्र व्यक्तींना सिंगल-डोस रिफॅम्पिसिन देणे ही संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी मान्यताप्राप्त प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. *३८६ गावांमध्ये ‘फोकस्ड लेप्रसी कॅम्पेन’* मागील पाच वर्षांत सांसर्गिक रुग्ण, बालरुग्ण किंवा विकृती असलेले रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या ‘फोकस्ड लेप्रसी कॅम्पेन’ (Focused Leprosy Campaign) अंतर्गत जिल्ह्यातील ३८६ गावे व शहरी भागांची निवड करण्यात आली आहे.मोहिमेत १ लाख १४ हजार २११ घरांना भेटी देऊन ५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.यामध्ये आढळणाऱ्या संशयित रुग्णांची पुढील तपासणी केली जाईल. निदान झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार, त्यांच्या नजिकच्या सहवासितांची तपासणी आणि पात्र सहवासितांना PEP अंतर्गत रिफॅम्पिसिनची एक मात्रा देऊन कुष्ठरोग संसर्ग साखळी तोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. *कुष्ठरोगाची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत* कुष्ठरोगाची तपासणी तसेच बहुविध औषधोपचार (MDT) सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांनी उपचारामध्ये खंड न पाडता नियमितपणे औषधोपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. बहुसांसर्गिक (MB) कुष्ठरुग्णांसाठी १२ महिने,तर अल्पसांसर्गिक (PB) कुष्ठरुग्णांसाठी सहा महिने नियमित बहुविध औषधोपचार (MDT) घेणे आवश्यक आहे.WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार MDT मध्ये रिफॅम्पिसिन, डॅप्सोन व क्लोफाझिमिन या औषधांचा समावेश असतो. *लवकर निदान करा,विकृती टाळा* कुष्ठरोग लपवून ठेवल्यास किंवा उपचारास विलंब केल्यास आजार वाढून नसांना इजा होण्याबरोबरच कायमस्वरूपी विकृती निर्माण होऊ शकते.मात्र,लवकर निदान आणि नियमित उपचार घेतल्यास कुष्ठरोग बरा होतो आणि विकृती टाळता येते. उपचार सुरू केलेल्या रुग्णामध्ये उपचाराचा प्रभाव लवकर सुरू होतो आणि संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.त्यामुळे कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता नियमित उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. *कुष्ठरोगाची लक्षणे ओळखा* अंगावर एक किंवा अनेक फिकट पांढरे अथवा लालसर,न खाजणारे चट्टे असणे,चेहऱ्यावर किंवा शरीराच्या एखाद्या भागावर संवेदना कमी होणे अथवा बधिरता असणे,हातापायाला मुंग्या येणे; तळहात किंवा तळपायाला बधिरता येणे,चेहरा तेलकट किंवा चकाकणारा दिसणे,भुवयांचे केस विरळ होणे,तसेच हात-पायातील संवेदना कमी होणे किंवा कमजोरी जाणवणे ही कुष्ठरोगाची संभाव्य लक्षणे आहेत.यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास किंवा कुष्ठरोगाची शंका वाटल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घ्यावी. *नागरिकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे* या विशेष सर्वेक्षण मोहिमेचा अहवाल प्रत्येक आठवड्याला राज्य स्तरावर सादर करण्यात येणार आहे.कुष्ठरोगाचे लवकर निदान,नियमित उपचार,सहवासितांची तपासणी आणि पात्र सहवासितांना प्रतिबंधात्मक औषधोपचार यामुळे कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी घरोघरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना आवश्यक सहकार्य करावे.तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास रोग लपवून न ठेवता तात्काळ जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे. ‘कुष्ठरोग लपवू नका — तपासणी करा,उपचार घ्या,विकृती टाळा.’ असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव डॉ.सतीश हरीदास,जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव डॉ.धनंजय चाकूरकर व सहायक संचालक,आरोग्य सेवा,कुष्ठरोग,धाराशिव डॉ.मारुती कोरे यांनी केले आहे. *************