Wednesday, 7 October 2026
* महिला-पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप * निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यात रूपांतर * अझोला,हायड्रोपोनिक्स आणि काटेविरहित निवडुंगाचे प्रात्यक्षिक
*वृत्त क्र.,८४७*
*दि.७ ऑक्टोबर २०२६*
*दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी माळकरंजातून चारा व्यवस्थापनाचा नवा मार्ग*
६० महिलांना ‘BHN-11’चे ३० हजार ठोंबे वाटप
महिला-पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप
* निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यात रूपांतर
* अझोला,हायड्रोपोनिक्स आणि काटेविरहित निवडुंगाचे प्रात्यक्षिक
धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) पावसाने ओढ दिली की शिवारातील हिरवाईबरोबरच पशुपालकांच्या चिंतेतही भर पडते.जनावरांसाठी वर्षभर चारा कुठून आणायचा,उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा उपयोग कसा करायचा आणि मर्यादित पाण्यात हिरवा चारा कसा पिकवायचा, हे प्रश्न दुष्काळसदृश परिस्थितीत अधिक तीव्र होतात.याच प्रश्नांवर प्रत्यक्ष उपाय सांगण्यासाठी माळकरंजा येथे मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी चारा लागवड,निकृष्ट चाऱ्याचे पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर आणि पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच योग्य चारा व्यवस्थापनाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता.बायफ संस्थेचे अध्यक्ष डॉ.मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार,कळंब तहसीलदार श्री.हेमंत ढोकले, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.दीपक मुळे,डॉ.हनुमंत गायके,डॉ.बायस, डॉ.वैभव पाटील,डॉ.पांडुरंग इंगळे, डॉ.राऊत,तसेच बायफ संस्थेचे श्री.अतुल मुळे,नूतन क्षीरसागर व श्री.संताजी मिसाळ उपस्थित होते. कळंब तालुक्यातील विविध विभागांचे तसेच उमेद अभियानाचे अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागात पशुधन सांभाळण्याची मोठी जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असते. जनावरांचे चारा-पाणी,निगा आणि दुग्ध व्यवसायातून कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यापर्यंत त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे या उपक्रमात महिला पशुपालकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले.
उमेद अभियानाच्या माध्यमातून निवड झालेल्या कळंब तालुक्यातील दहा गावांमधील ६० महिलांना हिरवा चारा लागवडीसाठी ‘BHN-11’ हायब्रीड नेपियर चाऱ्याचे एकूण ३० हजार ठोंबे वाटण्यात आले.याशिवाय उपस्थित सुमारे १२५ महिला व पशुपालकांना खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले.
*निकृष्ट चाऱ्यातूनही पोषणाचा मार्ग*
दुष्काळात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यानंतर हाताशी असलेल्या चाऱ्याचा योग्य वापर करणे पशुपालकांसाठी महत्त्वाचे ठरते.उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा प्रभावी वापर करून त्याचे पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर कसे करता येते,याचे डॉ.हनुमंत गायके यांनी सोयाबीन बुस्कटावर प्रक्रिया करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी काटेविरहित निवडुंग चारा पिकाची लागवड,अझोला कल्चर तसेच दुष्काळी परिस्थितीतील चारा व्यवस्थापनाच्या विविध पद्धती याबाबतही पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.उपलब्ध साधनसामग्री आणि मर्यादित पाण्याचा वापर करून पशुधनासाठी पोषक चाऱ्याची व्यवस्था कशी करता येईल,यावर भर देण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी कार्यक्रमातील विविध प्रात्यक्षिकांची पाहणी केली. दुष्काळाच्या काळात पशुपालकांनी चारा व्यवस्थापनाचे आगाऊ नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हिरव्या चाऱ्याची लागवड करण्याबरोबरच हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन करून पशुधनासाठी वर्षभर चाऱ्याची उपलब्धता राखण्याचे आवाहन त्यांनी पशुपालकांना केले.दुष्काळी परिस्थितीत पारंपरिक चारा व्यवस्थापनासोबतच उपलब्ध आधुनिक आणि पर्यायी तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुलभ करता येऊ शकतो,असा संदेश या प्रात्यक्षिकातून देण्यात आला.
*‘सेवा संकल्प’मधून योजनांची माहिती*
पशुसंवर्धन विभागामार्फत सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना,राष्ट्रीय पशुधन मिशनांतर्गत पशुधन विमा,कडबा कुट्टी यंत्रासाठी मागणी,चारा व्यवस्थापन तसेच अन्य नाविन्यपूर्ण योजना याबाबत डॉ.दीपक मुळे व डॉ.पांडुरंग इंगळे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.पात्र पशुपालकांनी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज सादर करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
*पशुधन विकासासाठी मोफत उपक्रम*
बायफ व बीएसएस सोनाटा मायक्रो क्रेडिट यांच्या सामाजिक जबाबदारीतून पशुधन विकास कार्यक्रमांतर्गत पशुपालकांसाठी सॉर्टेड सिमेन व पारंपरिक कृत्रिम रेतन,चारा लागवड,खनिज मिश्रण तसेच पशुधन व्यवस्थापनाशी संबंधित विविध उपक्रम मोफत राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ.मुळे यांनी दिली.
*दहा गावांतील महिलांची निवड*
माळकरंजा,गोविंदपूर,देवळाली,जवळा खु.,देवधानोरा,आंदोरा, हसेगाव (केज), मस्सा खु.,मोहा आणि खामसवाडी या गावांतील उमेद अभियानांतर्गत ज्या महिलांकडे चारा लागवडीसाठी पाणी उपलब्ध आहे,अशा महिलांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या महिलांना चारा ठोंब व खनिज मिश्रणाचे वाटप करण्यात आले.माळकरंजा व परिसरातील पशुपालकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दुष्काळसदृश परिस्थितीत जनावरांच्या पोटासाठी रोज चाऱ्याची जुळवाजुळव करणाऱ्या पशुपालकांसाठी हा उपक्रम केवळ ठोंबे आणि खनिज मिश्रणाच्या वाटपापुरता मर्यादित राहिला नाही.आज दिलेला चाऱ्याचा ठोंब उद्याच्या हिरव्याy चाऱ्याची बेगमी ठरावी आणि हाताशी असलेल्या निकृष्ट चाऱ्यातूनही जनावरांना पोषण मिळावे,यासाठी आवश्यक ज्ञान आणि तंत्रज्ञान पशुपालकांच्या हातात देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा नियोजन,हिरवा चारा लागवड, उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा योग्य पद्धतीने वापर आणि पशुधनासाठी पोषण व्यवस्थापन याबाबत देण्यात आलेले मार्गदर्शन पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणार असून,पशुधनाची उत्पादकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
*****************



