Tuesday, 6 October 2026
निपाणीत पशुपालकांच्या दारात योजनांचे मार्गदर्शन *निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक*
निपाणीत पशुपालकांच्या दारात योजनांचे मार्गदर्शन
*निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक*
धाराशिव दि.५ ऑक्टोबर (जिमाका) पशुपालनाचा वाढता खर्च,चाऱ्याची उपलब्धता आणि पशुधनाच्या आरोग्याची चिंता अशा विविध आव्हानांना सामोरे जाणाऱ्या पशुपालकांसाठी ‘सेवा संकल्प अभियान’ आधार देणारे ठरत आहे.या अभियानांतर्गत कळंब तालुक्यातील निपाणी येथे पशुपालकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले.
निपाणी येथे आज आयोजित या उपक्रमात पशुपालकांना VMDDP योजनेअंतर्गत कडबा कुट्टी व मका चारा बियाण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची माहिती मिळाल्यामुळे पात्र पशुपालकांना योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक
पशुपालकांसमोर अनेकदा उपलब्ध चाऱ्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होतो.अशा परिस्थितीत उपलब्ध असलेल्या निकृष्ट चाऱ्याचाही योग्य प्रक्रिया करून अधिक परिणामकारक पद्धतीने उपयोग करता यावा,यासाठी या मार्गदर्शन कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.निकृष्ट उपलब्ध चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी,तसेच त्यामध्ये गूळ,मीठ व खनिज मिश्रणाचा वापर कसा करावा,याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखविण्यात आले.
केवळ योजना सांगण्याऐवजी चाऱ्यावर प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखविण्यात आल्याने पशुपालकांना ही पद्धत समजून घेणे अधिक सोपे झाले.उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून जनावरांच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी असे व्यावहारिक मार्गदर्शन पशुपालकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
*पशुधन विमा,केसीसीसह विविध योजनांची माहिती*
यावेळी पशुपालकांना पशुधन विमा योजना,किसान क्रेडिट कार्ड (KCC) तसेच पशुसंवर्धनाशी संबंधित इतर विविध योजनांची माहितीही देण्यात आली.पशुधन हे ग्रामीण कुटुंबांसाठी केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्यांच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे.त्यामुळे पशुधनाचे संरक्षण,आवश्यक आर्थिक मदत आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळणे पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.त्या दृष्टीने एकाच ठिकाणी विविध योजनांची माहिती मिळाल्याने पशुपालकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ घेण्याचा मार्ग अधिक सुकर झाला.
*‘सेवा संकल्पमधून सेवा थेट लाभार्थ्यांपर्यंत*
‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ शासकीय योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता,त्या योजना आणि सेवा प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे वारंवार झिजवावे लागू नयेत,त्यांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन स्थानिक पातळीवर मिळावे आणि पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत,हा अशा उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे.
निपाणी येथील उपक्रमातूनही याच संकल्पनेला कृतीची जोड मिळाली.ऑनलाइन अर्ज भरण्यापासून ते जनावरांसाठी उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकापर्यंत मिळालेले मार्गदर्शन पशुपालकांसाठी उपयुक्त ठरले.‘योजना कागदावर न राहता तिचा लाभ पशुपालकाच्या गोठ्यापर्यंत पोहोचावा’,या सेवाभावी भूमिकेला या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
***************

