Tuesday, 6 October 2026

व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्जास मुदतवाढ *१० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज; प्रवेश यादी १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्जास मुदतवाढ *१० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज; प्रवेश यादी १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार* धाराशिव दि.५ ऑक्टोबर (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची यादी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येते.या वसतिगृहांमध्ये शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.शासकीय वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही,अशा विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’ ही योजना आहे.स्वाधार योजनेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहाकरिता ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक आहे.यासाठी इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी https;//hmasnew.mahait .org या पोर्टलवर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे. समाज कल्याण आयुक्तालयाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित केले होते.कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीसाठी वसतिगृह प्रवेश अर्ज करण्याची मुदत ३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ अशी होती.या प्रवेशाची यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत ७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ अशी होती आणि प्रवेश यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ७ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली होती. तथापि,सीईटी सेलचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश देण्याचे अद्यापही सुरू आहेत.या प्रवेशासाठी अजून काही कालावधी लागणार असल्याने तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी संधी मिळावी,यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शासकीय वसतिगृह प्रवेश अर्जाची मुदत आणि त्यानुसार प्रवेश यादी प्रसिद्ध करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वसतिगृह प्रवेशाचा अर्ज १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत करता येणार असून,प्रवेशाची यादी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित वसतिगृहांचे गृहपाल, निरीक्षक तसेच सहायक आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त अर्जांची छाननी करणे बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे असे अर्ज तात्काळ छाननी करून निकाली काढावेत,असे निर्देश देण्यात आले आहेत. वसतिगृहातील दरवर्षी विहित मुदतीत प्रवेशाच्या याद्या प्रसिद्ध होतील,याची दक्षता घ्यावी. ऑनलाइन पोर्टलमधील तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नसल्यास अशा विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत आपल्यास्तरावर एक नोंद रजिस्टर ठेवावे.याबाबत वेळोवेळी आयुक्तालयामार्फत ऑनलाइन बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत.त्यानुसार विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात यावे. प्रयत्न करूनही तांत्रिक अडचणींमुळे विहित मुदतीमध्ये ऑनलाइन अर्ज करता न आलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आवश्यक असल्यास,त्यांना गुणवत्तेनुसार वसतिगृहात प्रवेश देण्याबाबत आपल्या स्तरावर कार्यवाही करावी.मात्र,अशा प्रकारे प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रादेशिक उपायुक्त यांच्यामार्फत आयुक्तालयास तातडीने कळवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. *************