Wednesday, 7 October 2026
*नवरात्रोत्सवात तुळजापुरातील वीजपुरवठा अखंडित ठेवा* * २४ तास नियंत्रण कक्षासह अधिकारी-वायरमन उपलब्ध ठेवण्याचे निर्देश * महोत्सवापूर्वी विद्युत यंत्रणेची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करण्याच्या सूचना
*नवरात्रोत्सवात तुळजापुरातील वीजपुरवठा अखंडित ठेवा*
* २४ तास नियंत्रण कक्षासह अधिकारी-वायरमन उपलब्ध ठेवण्याचे निर्देश
* महोत्सवापूर्वी विद्युत यंत्रणेची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करण्याच्या सूचना
धाराशिव दि.७ ऑक्टोबर (जिमाका) श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूर येथे राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने शहरातील विद्युत व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.महोत्सव कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही,याची दक्षता घेण्यासह २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि.११ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे.या काळात राज्याच्या विविध भागांसह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल होणार असून भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता विद्युत व्यवस्थेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
*वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता*
नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजापूर नगर परिषद आस्थापनांचा विद्युत पुरवठा अखंडित राहील,याची विशेष दक्षता घेण्यात यावी.अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास मोठ्या गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक पूर्वनियोजन करावे.
विद्युत व्यवस्थेसंदर्भातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात यावा.तसेच संबंधित अधिकारी आणि वायरमन हेही २४ तास उपलब्ध राहतील,अशा पद्धतीने नियोजन करून त्यांची नियुक्ती करण्यात यावी.
*महोत्सवापूर्वी संपूर्ण विद्युत यंत्रणेची तपासणी*
महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने तुळजापूर शहरातील सर्व ठिकाणांची पाहणी करून आवश्यक देखभाल व दुरुस्ती पूर्ण करण्यात यावी. ट्रान्सफॉर्मरवर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक भार पडणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी.फ्युज व्यवस्थित ठेवावेत.आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर (स्पेअर) उपलब्ध ठेवण्यात यावेत.
शहरातील कोणत्याही भागात विद्युत केबल उघड्यावर राहणार नाहीत,याचीही दक्षता घेण्यात यावी.नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत यंत्रणेची संपूर्ण देखभाल (मेंटेनन्स) पूर्ण करून घ्यावी.यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड होऊन जीवित अथवा वित्तहानी होणार नाही,यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी.
*धोकादायक वायर,केबल व पोल तातडीने दुरुस्त करा*
तुळजापूर शहरातील विजेच्या केबल किंवा विद्युत बॉक्स उघडे राहणार नाहीत तसेच ते नागरिक आणि भाविकांसाठी धोकादायक ठरणार नाहीत,याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शहरात धोकादायक स्थितीत असलेल्या वायर,केबल, विद्युत पोल तसेच विद्युत यंत्रणेतील अन्य त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात,असे निर्देश देण्यात आले आहेत.
लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांची सुरक्षितता आणि सुरळीत दर्शन व्यवस्था अबाधित राहण्यासाठी अखंडित व सुरक्षित विद्युत पुरवठा महत्त्वाचा आहे.त्यामुळे महोत्सव सुरू होण्यापूर्वीच विद्युत यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवून यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही,यासाठी संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****************