उस्मानाबाद, दि.9:-
शासनामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा महिलांनी उपयोग करुन घ्यावा व विविध
उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी सकारात्मक भावनेतून एकत्र येऊन स्वत: चा
कुटुंबाचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास घडवावा व महिलांनी नेतृत्व
स्वीकारुन इतरांना मार्गदर्शक व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांनी केले.
स्वयंम शिक्षण
प्रयोगच्या वतीने लेडीज क्लब येथे “राष्ट्रीय
व्यवसायिकता दिवस” निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.गमे बोलत
होते. यावेळी स्वयम शिक्षण प्रयोग च्या संचालिका प्रेमा गोपालन, उपमन्यु
पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक
आयुक्त श्री. बोराळकर, देआसरा फौंडेशन पुणे चे श्री अनिल पाठक, उस्मानाबाद जिल्हा
व्यापारी महासंघाचे श्री संजय मंत्री, लक्ष्मिकांत जाधव यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी पुढे
बोलताना जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले की, महिलांनी विविध प्रशिक्षणाचा उपयोग
करुन व्यवसायात उतरावे, यामुळे एक महिला पूर्ण कुटुंबाची प्रगती करु शकते.येथिल
महिला बचत गटांनी जिल्ह्यातील उत्तम वस्तूंचा पुरवठा इतरांना देण्याइतके सक्षम
व्हावे, त्याचबरोबर पर्यावरणाचा विचार ही करायला हवा व यासाठी पर्याय शोधून
त्यामाध्यमातून पर्यावरण संरक्षणही करावे, सौरउर्जेकरिता आपला जिल्हा सर्वोत्तम
आहे त्याचाही उपयोग करुन शासनाच्या योजनांचा अभ्यास करावा व त्याचा लाभ बचत गटांनी
करुन घ्यावा.
कृषी विज्ञान
केंद्राच्या मार्गदर्शनातून विविध शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण घेवूनही महिला
बचत गट मोठया संख्येने चांगले व्यवसाय, उद्योग सुरु करुन यशस्वी होवू शकतील, असे
ही श्री.गमे यांनी यावेळी सांगितले.
या
कार्यक्रमामध्ये यशस्वी महिला उद्योजकांचे अनुभव कथन व मार्गदर्शन झाले. यामध्ये
यशस्वी 30 महिला उद्योजकांना स्वयम शिक्षण प्रयोग च्या वतीने दर वर्षी यशस्वी
पुरस्कार योजना देण्याचे जाहीर केले. त्याच सोबत आम्ही सखी यशकथा बुलेटीन चे
विमोचन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक श्री. काकासाहेबआडसुळे, सूत्रसंचालन आणि आभार श्री. किरण दिगंबर माने
यांनी केले. या कार्यक्रमामध्ये 5 जिल्हयातील
200 गावातून 450 महिला व्यवसायिक आपल्या उत्पादनासह सहभागी झाल्या होत्या.