उस्मानाबाद, दि. 5:- वन
विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष लागवड मोहिमेच्या चित्ररथाचे उस्मानाबादमध्ये
आगमन झाले आहे. या रथाचे स्वागत करून हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी (रोहयो)
प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. ए.पी.
पवार, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा
माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासन व वन विभागाच्या वतीने सन 2018 मध्ये पावसाळयात 13
कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी या चित्ररथाच्या
माध्यामतून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती केली जात
आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण यांच्या हस्ते चित्ररथाचे स्वागत करुन चित्ररथाला
हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी श्री. गमे यांनी उपस्थित
नागरिकांना वृक्षलागवडीचे महत्त्व सांगितले. तसेच जिल्ह्यात अधिकाधिक वृक्ष लागवड
करण्याचे आवाहन केले. यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेली रोपे, तसेच नागरिकांच्या
मदतीसाठी आणि जनजागृती करण्यासाठी देखील प्रशासनाने पुढाकार घ्यावा असेही ते
म्हणाले.
वृक्ष लागवड मोहिमेची
व्याप्ती वाढवण्यासाठी २०१७, २०१८ आणि २०१९ या वर्षात अनुक्रमे ४ कोटी, १३ कोटी
आणि ३३ कोटी असे एकूण ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वनविभागाने केला आहे.
याच संकल्पाच्या पूर्तीसाठी या वर्षी लोक सहभागातून ४ कोटी वृक्ष लावण्याची मोहीम
वन विभागाने हाती घेतली आहे.
