Saturday, 12 November 2016

राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन संपन्न


उस्मानाबाद,दि.12:-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानूसार दिनांक 12 नोव्हेंबर 2016 रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले हाते. सकाळी 10.30 वाजता पक्षकार, संपादन मंडळ अधिकारी, विधीज्ञ मंडळ, जिल्हा सरकारी वकील यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने लोकअदालतीचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री आर.आर.देशमुख, प्राधिकरणाचे सचिव श्री एस.आर.पडवळ, भूसंपादन उपविभागीय अधिकारी श्री  मुळे,  अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ श्री डी.बी.तोंडे, जिल्हा सरकारी वकील श्री एस.बी.जाधवर, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री अजित खोत, न्यायीक अधिकारी,  शासकीय अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, बॅंक अधिकारी, पक्षकार त्यांचे विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये प्राधिकरणाचे सचिव श्री एस.आर.पडवळ यांनी पॅनलनिहाय ठेवण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती  सांगितली.
            जिल्ह्यातून प्रलंबित प्रकरणांपैकी  दिवाणी स्वरूपाची(963), मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई  प्रकरणे (234),  भू-संपादन प्रकरणे (312),  फौजदारी स्वरूपाची (355) तडजोडपात्र प्रकरणे, धनादेशाची (924) प्रकरणे, दूरसंचार आणि विविध बॅंकेची (1626) प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती पैकी दिवाणी स्वरूपाची (177), मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई  प्रकरणे (57),  भू-संपादन प्रकरणे (116),  फौजदारी स्वरूपाची (22) तडजोडपात्र प्रकरणे,  धनादेशाची (20) प्रकरणे, दूरसंचार आणि विविध बॅंकेची (157 ) प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली.  मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई  प्रकरणांमधील पक्षकारांना रूपये 3 कोटी 35 लाख 77 हजार 029/- मावेजा देण्यात आलेला आहे. धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला रूपये 14 लाख 96 हजार 850/- वसूली  करून  देण्यात  आली.  भू-संपादन प्रकरणांमध्ये रूपये 2 कोटी 51 लाख 44 हजार 243/- मावेजा मंजूर होवून रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली आणखी काही प्रकरणांमध्ये तडजोडी होणार आहेत. याच लोकअदालतीमध्ये  एक्सकेडर  म्हणून  ग्राहक  मंचाची  47 प्रकरणे ठेवण्यात आली  त्यापैकी 33 प्रकरणे तडजोडीने  मिटविण्यात  आली असून  यामध्ये  रुपये 86 लाख 3 हजार 585/- रक्कमेची उलाढाल झाली.
            मोटार अपघात प्रकरण क्रमांक 81/2012 अर्चना विरूध्द सुखदेव या प्रकरणात सर्वाधिक म्हणजे रूपये 69 लाख 57 हजार 154 एवढ्या रक्कमेची भरपाई मंजूर होवून रक्कम त्याचवेळी न्यायालयात जमा करण्यात आली, या प्रकरणातील पक्षकार व त्यांचे विधीज्ञ श्री पी.डी.वाघमोडे, यूनायटेड  इंडिया विमा  कंपनीचे  विभागीय अधिकारी श्री डी. एन. नाखरे, श्रीमती श्रीजा जैन, श्री  दिनेश जामगे व त्यांचे विधीज्ञ श्री एस. पी. दानवे यांनी उत्तमरित्या तडजोड घडवून आणल्याबद्दल त्यांचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री आर.आर.देशमुख, जिल्हा न्यायाधीश व पॅनल प्रमुख श्री आर.एन.रोकडे, यांनी सुमन स्वागत केले.

            लोकअदालतीमध्ये पॅनलवर न्यायीक अधिकारी सर्वश्री एस. आय. पठाण, ए. पी. कानडे, एस. बी. देसाई, आर. के. राजेभोसले, एस. ए. जमादार, एन. सी. बोरफळकर,  सर्वश्रीमती डॉ.रचना तेहरा, एन. पी. पवार, ए. सी. पारशेट्टी तसेच इतर पंच म्हणून विधिज्ञ सदस्यांनी काम पाहिले. 


Friday, 11 November 2016

चलनी नोटांच्या व्यवहाराकरिता जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांनी जनसामान्यांत समाधान


उस्मानाबाद,दि.11:-  अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द  करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. जिल्हयातील ग्राहकांस व सर्वसामान्य नागरिकांस चलनी नोटांच्या आर्थिक व्यवहारासाठी जिल्हयातील सर्वच राष्ट्रीयीकृत, जिल्हा,नागरी बॅंक व संबंधित सहकारी बँकांनी सहकार्याची भूमिका ठेवून व्यवहार करावेत,  अशा सूचना  जिल्हा प्रशासनाने  बँकांना  दिल्या होत्या .  त्या पार्श्वभूमीवर  रिझर्व्ह बँक ऑफ  इंडियाचे अधिकारी  आणि जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांची बैठक  नुकतीच जिल्हाधिकारी  कार्यालयात  पार पडली .  यावेळी  निवासी  उपजिल्हाधिकारी सुनिल यादव , उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रभोदय मुळे हेही उपस्थित  होते .
या बैठकीत  केंद्र शासन व रिझर्व्ह  बँकेने  दिलेल्या  सूचना ,  जिल्हा प्रशासनाने , पोलीस प्रशासनाने  केलेल्या उपाययोजना  याचा ऊहापोह  घेण्यात आला .
या परिस्थितीत सर्व बँकांनी आपआपल्या बँकांचे अतिरिक्त काऊंटर्स सुरू करावेत. जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच प्रत्येक व्यक्तीस सामंजस्याने वागणूक द्यावी, बँकेत गर्दी वाढणार आहे, लॉकर ऑपरेशन, लोड वाढू शकतो,हे लक्षात घेवून बँक व्यवस्थापकांनी योग्य ती काळजी घ्यावी ,प्रत्येक ग्राहकास पावती देण्यात यावी, ग्राहकांचे ऑनलाईन व्हेरीफिकेशन करुन घ्यावे, राष्ट्रीयीकृत बँकांनी सी.डी. एम. चालू ठेवावेत, पेट्रोल पंपचालकांचे पैसे बँकेने स्विकारावेत तसेच ग्राहकांनी आर.टी.जी.एस व एन.एफ.टी व्दारे आर्थिक व्यवहार करावेत, गरज पडल्यास पेट्रोल पंप, पोस्ट ऑफीस व बँकांना पोलीस संरक्षण देण्यात येईल. स्टेट बँक हैद्राबाद एक कॅश व तीन रिसिप्ट  काऊंटर्स  चालू ठेवावेत. स्टेट बॅक ऑफ इंडिया एक कॅश व दोन रिसिप्ट काऊंटर्स  चालू ठेवावेत, महाराष्ट्र  बँक एक कॅश व  दोन रिसिप्ट काऊंटर्स चालू ठेवावेत.  उर्वरित बॅकांनी ग्राहकांसाठी काऊन्टर्स वाढवावेत अशा  सूचना प्रशासनाकडून  संबंधित  सर्व यंत्रणांना  देण्यात आल्या  होत्या . या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी  डॉ. नारनवरे हे संपूर्ण  सर्व परिस्थितीवर  बारकाईने लक्ष ठेवून आहेत .
            संपूर्ण जिल्ह्यात  प्रशासनाने  केलेल्या  नियोजित  प्रयत्नांना  चांगलेच यश मिळत आहे ,  नागरिकांना  सर्वत्र  योग्य ते सहकार्य  संबंधित  सर्वच यंत्रणांकडून  मिळत आहे ,  कुठेही  कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न  निर्माण  झालेला नाही , लोकांना  त्यांचे बँकेतील व्यवहार  सुरळीतपणे पार पाडता येत आहेत आणि  जिल्हा  प्रशासनाने  केलेल्या  उपाययोजनांमुळे  सर्वसामान्य  नागरिकांमध्ये  प्रशासनाबद्दल  सर्वत्र  समाधान व्यक्त  करण्यात येत आहे


Thursday, 10 November 2016

“आमच गाव आमचा विकास” साठी जिल्हा परिषदने कंबर कसली


उस्मानाबाद, दि.10:- जिल्हयाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधांच्या निर्मितीकडे भर देवून शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती कडे लक्ष देवून गावाचा विकास साधावा,असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी “आमचा गाव आमचा विकास” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.
    या कार्यशाळेस जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालिका डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) तुकाराम देवकर तसेच जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी  व विभाग प्रमुख तसेच केंद्रीय सूचना  केंद्राचे संचालक श्री. कोंडेकर प्रमुख उपस्सिथत होते.
जिल्हा परिषद च्या कृषी, शिक्षण ,महिला बाल कल्याण, पशुसंवर्धन ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  आमचा गाव आमचा विकास करिता कृती आराखडयाचे सादरीकरण केले. सादरी करणात मुख्य कार्याकारी अधिकारी आनंद रायते यांनी संबधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनीही मार्गदर्शनपर भाषण करुन माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासिकाचे शासकीय विविध वेबसाईड्सचे  महत्व पटवून देवून “आमचं गाव आमचा विकास” ही संकल्पना अधिक यशस्वी करता येईल याचे महत्तव उपस्थितांना पटवून दिले आणि उस्मानाबाद जिल्हयात मोठ्या संख्येने  “लोकराज्यग्राम” करावेत,असे आवाहन केले.