Saturday, 1 October 2016

शारदीय नवरात्र महोत्सव-2016 घटस्थापनेने श्रीतुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

                                


 
                                         
        उस्मानाबाद, दि.1: महाराष्ट्राची कुलस्वामीनी आणि शक्तीदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी  करण्यात आले.
        यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पूजा पार पडली. त्यानंतर घटकलशांची पारंपरिक पध्दतीने पूजा करण्यात आली आणि गोमुख तीर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदीमाया आदीशक्ती या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि त्यांच्या पत्नी प्रियंका भगत-नारनवरे यांच्या हस्ते  घटस्थापना करण्यात  आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे. कुठलीही अडचण असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी घटस्थापनेनंतर केले. त्यांनी यावेळी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात  भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत. आज हजारो भाविकांनी श्रीभवानी मातेचे दर्शन घेतले. वेगवेगळया गावातूनही अनेक युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे येतानाचे चित्र दिसत होते.
नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ आदि विभागांनीही भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी,प्रांताधिकारी अभयसिंह मोहिते,तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुजित नरहरे, तुळजापूर तहसिदार दिनेश झांपले,भूमचे तहसिलदार सुरेंद्र देशमुख, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.        

Friday, 30 September 2016

राज्यातील पहिले “लोकराज्य जीवन विमा कार्यालय” बनण्याचा बहुमान पटकाविला उस्मानाबादच्या जीवन विमा कार्यालयाने

राज्यातील पहिले “लोकराज्य  जीवन विमा कार्यालय”  बनण्याचा बहुमान  पटकाविला उस्मानाबादच्या जीवन विमा कार्यालयाने
उस्मानाबाद,दि.30:- महाराष्ट्र  शासनाचे मुख्यपृष्ठ  असलेल्या “लोकराज्य”   मासिकाची उपयुक्तता  लक्षात घेवून  या वर्षातील  पहिले “लोकराज्य जीवन  विमा कार्यालय”  बनण्याचा बहुमान  उस्मानाबाद  जिल्ह्यातील  जीवन विमा  कार्यालयाने (कोड नं.946)  पटकाविण्यात यश मिळविले आहे .
विमा सप्ताहाच्या समारोप  कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे  म्हणून जिल्हा  माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप  हे उपस्थित  होते. आपल्या भाषणात  त्यांनी माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयाचे  विविध  उपक्रम, प्रकाशने , फेसबुक पेज, ट्विटर हँडल , ब्लॉग  आदींची  माहिती उपस्थितांना सांगितली.  त्यावेळीच  त्यांनी  राज्यातील  पहिले “ लोकराज्य  जीवन विमा  कार्यालय ” बनण्याचा बहुमान या कार्यालयास  मिळू शकतो  अशी संकल्पना  मांडली  आणि त्यास  उपस्थित  अधिकारी -कर्मचारी  व इतर  मान्यवरांनीही  संमती दर्शविली . 
त्याच अनुषंगाने उस्मानाबादच्या  या जीवन विमा  कार्यालयाच्या  एकूण 42 अधिकारी  कर्मचाऱ्यांनी “लोकराज्य” चे  वार्षिक  सभासदत्व  स्वीकारले आणि या वर्षातील  पहिले “लोकराज्य जीवन  विमा कार्यालय”  बनण्याचा बहुमान  मिळविला. शाखा व्यवस्थापक श्री. बी.एन. केकरजवळेकर , विष्णू मोराळे यांनी या  उपक्रमाकरिता पुढाकार  घेतला.

यानिमित्ताने श्री.  केकरजवळेकर  व त्यांच्या  सहकाऱ्यांनी संकल्प  केला की,  यापुढील  प्रत्येक  कार्यालयीन बैठकीच्या वेळी “लोकराज्य”  मासिकातील किमान एका लेखाचे  वाचन  आमच्या कार्यालयात केले जाईल. त्याचबरोबर आमच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास शासनाच्या योजनांच्या माहितीसाठी “लोकराज्य” हे अत्यंत उपयुक्त मासिक असून आपणही त्याचे वाचन करावे असे  सांगण्यात येईल . 

परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष्‍ प्रसाद यांची सहारा एचआयव्ही बाधीत बालगृह व स्वआधार मतिमंद प्रकल्पास सदिच्छा भेट


उस्मानाबाद दि,30: परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष्‍ प्रसाद यांनी नुकतीच कळंब तालुक्यातील आळणी येथील एचआयव्ही बाधीत व स्वआधार मतिमंद प्रकल्पास सदिच्छा भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व 50 एलईडी बल्ब चे वाटप केले.

    कळंब येथील तुळजाई प्रतिष्ठान संस्थेच्या सहारा HIV बाधीत मुलामुलींच्या बालगृहास तसेच संस्थेच्या आळणी येथील स्वआधार मतिमंद मुलींच्या निवासी प्रकल्पास भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी  अभ्यास करण्याच्या वेगवेगळया पध्दती, आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी दररोज योगा, छंद जोपासने, हात धुण्याच्या पध्दती आदी  गोष्टीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “एम.एस.धोनी” हा चित्रपट मुलांना दाखवण्यासाठी रूपये 2 हजारची आर्थिक मदतही त्यांनी केली. मुलांसाठी सुसज्य वाचनालय सुरू करून देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुलांच्या हस्ताक्षराबाबत व मुलांनी गायलेल्या प्रार्थना गीताबद्दल त्यांनी मुलांचे कौतुक केले. एच. आय. व्ही. बाधीत मुलामुलींचे बालगृह कळंब येथे 14 एलईडी बल्ब, संत ज्ञानेश्वर महाराज मूकबधीर शाळा कळंब 16 एलईडी बल्प, स्वआधार मतिमंद निवासी प्रकल्पास 20 एलईडी बल्बचे त्यांनी वाटप केले.