उस्मानाबाद,
दि.1:
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आणि शक्तीदेवता श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र
महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे
पारंपारिक पध्दतीने श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर
दुपारी 12 वाजता श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत
नारनवरे यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चार, आई राजा उदो
उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पूजाविधी
करण्यात आले.
यावेळी
मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पूजा पार पडली. त्यानंतर घटकलशांची पारंपरिक
पध्दतीने पूजा करण्यात आली आणि गोमुख तीर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात
आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदीमाया
आदीशक्ती या मंदिरांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि
त्यांच्या पत्नी प्रियंका भगत-नारनवरे यांच्या हस्ते
घटस्थापना करण्यात आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा
प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून
भाविकांनी शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे. कुठलीही
अडचण असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी घटस्थापनेनंतर केले. त्यांनी यावेळी सर्व
भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रतिवर्षाप्रमाणे या
उत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या
प्रमाणात भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले
आहेत. आज हजारो भाविकांनी श्रीभवानी मातेचे दर्शन घेतले. वेगवेगळया गावातूनही अनेक
युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे येतानाचे चित्र दिसत होते.
नवरात्र महोत्सवानिमित्त
मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालय यांच्यासह आरोग्य,
सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ आदि विभागांनीही भाविकांच्या
सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भाविकांनी या सुविधांचा लाभ
घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मंदिरातील धार्मिक
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह महंत तुकोजीबुवा, महंत
चिलोजीबुवा, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे
पुजारी मंडळाचे पदाधिकारी,प्रांताधिकारी अभयसिंह मोहिते,तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुजित
नरहरे, तुळजापूर तहसिदार दिनेश झांपले,भूमचे तहसिलदार सुरेंद्र देशमुख, मंदिर
संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व
भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


