Thursday, 29 September 2016

राज्यमंत्री विजय देशमुख यांनी नवरात्र महोत्सवानिमित्त घेतली आढावा बैठक

 दिनांक: 29 सप्टेंबर 2016

उस्मानाबाद.दि.29:- श्री.तुळजाभवानी शासकीय नवरात्र महोत्सवानिमित्त सार्वजनिक आरोग्य , परिवहन, कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री श्री. विजय देशमुख  यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात  सर्व संबंधित  शासकीय  अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेवून मार्गदर्शन केले व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.
या बैठकीस तुळजापूर येथील लघुउद्योगजक, व्यापारी,विश्वस्त सदस्य,  अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. एकनाथ माले, तुळजापूर येथील उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी व तहसिलदार सुजीत नरहीरे, मुख्याधिकारी राजीव डुमने व  संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीस मार्गदर्शन करताना मंत्रीमहोदय  म्हणाले की, या शारदीय नवरात्र महोत्सवास सर्वांच्या सहकार्याची गरज असून सर्वांनी मिळून महोत्सव निर्विघ्न पार पाडावयाचा आहे, त्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या जबाबदारीने काम करावे. काही अडचण आल्यास प्रशासनास सहकार्य करुन हा  महोत्सव  यशस्वी करावा .
या बैठकीत मंत्रीमहोदयांनी आरोग्यस विभागास,पाणी तपासणी, आरोग्यासह लागणारे सर्व उपाय व सूचना केल्या. तसेच एखाद्या भाविक भक्तास जर अचानकपणे आजारपणास सामोरे जावे लागले तर ताबडतोब रूग्णवाहिकांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.  एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भाविकांसाठी  दळणवळणाची  योग्य ती  चोख  व्यवस्था  ठेवण्याबाबतचे  आदेश दिले.तसेच पोलीस विभागाने महोत्सव काळात चोख बंदोबस्त  ठेवून कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे, आवाहनही मंत्री महोदयांनी यावेळी केले.