Thursday, 13 June 2019

जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम शैक्षणिक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य 

वृत्त क्रमांक-361                                              दि.13 जून 2019  

 

जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम

शैक्षणिक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य 

उस्मानाबाद, दि.13:- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, उस्मानाबाद या समितीकडून दि. 20 मार्च ते 15 जून 2019 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी विशेष मोहिमेद्वारे शैक्षणिक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. अर्जदारांच्या प्रकरणांवर समितीला लवकरात लवकर निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी नियम 2012 मधील नियम क्रमांक 17 (2) (3) नुसार कागदोपत्री पुरावे, शपथपत्र, इतर आवश्यक दस्तावेज अद्याप दाखल केले नसल्यास व अर्जदारांच्या ज्या प्रकरणात त्रुटी आहेत, अशा अर्जदारास समितीकडून त्रुटींची पूर्तता करण्यासाठी त्रुटीची पत्र पाठविण्यात आले आहे. अशा अर्जदाराने तातडीने समितीकडे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करावीत.
 शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधित महाविद्यालयामार्फत पडताळणी समिती कार्यालयात प्राप्त झालेले आहेत. मात्र ज्यांना समितीकडून त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत,अशा विद्यार्थ्यांनी दि. 15 जून रोजी कार्यालयात येऊन त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, उस्मानाबाद यांनी केले आहे. तसेच अर्जदार यांना वारंवार संपर्क करुनही जे अर्जदार प्रकरणांच्या त्रुटींची पूर्तता करणार नाहीत, त्यांचे अर्ज वरील नियमानुसार निकाली काढण्यात येतील, याची नोंद घ्यावी. अर्जदार यांनी स्वतः अथवा त्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासह कार्यालयाशी संपर्क साधावा, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही या कार्यालयाशी संपर्क साधू नये,असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्वाती इथापे यांनी केले आहे.    

***

वृत्त क्रमांक-362

वेटरन सेल नवी दिल्ली, येथे

माजी सैनिक/विधवा यांची नाव नोंदणी मोहीम सुरु

उस्मानाबाद,दि.13:-  माजी सैनिक/विधवा यांचे वेटरन सेल,(Veteran Cell ) नवी दिल्ली येथे नाव नोंदणी करण्याची मोहीम सुरु आहे. या नाव नोंदणीमुळे आपल्या अडीअडचणी वेळेत सोडविण्यात मदत होईल तसेच आर्थिक मदतसुध्दा वेळेत मिळणे सुलभ होईल.
 
 
 
तरी जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवा यांनी वेटरन सेलचा फॉर्म भरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावा, जेणेकरुन आपला फॉर्म या कार्यालयामार्फत पाठवून वेटरन सेल, नवी दिल्ली येथे नाव नोंदणी करणे सुलभ होईल.
तरी सर्व माजी सैनिक /विधवा यांनी हे फॉर्म लवकरात लवकर भरुन दयावेत,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत  यांनी केले आहे.
                                                  ****
वृत्त क्रमांक-363   
 

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांचा

 जून  महिन्यातील  बैठक / दौरा कार्यक्रम रद्द

 

उस्मानाबाद,दि.13:- जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांचा माहे जून 2019 मधील सहामाही बैठकीच्या संदर्भात परांडा, उमरगा, वाशी, लोहारा व उस्मानाबाद  येथील तहसील कार्यालयामध्ये आजी-माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीचा नियोजित दौरा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे, याची सर्व आजी माजी सैनिक, विधवा व त्यांचे कुटुंबीय यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत  यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक-364  

केंद्रीय सैनिक बोर्डाकडून  आर्थिक मदतीसाठी

माजी सैनिक/विधवा/ पाल्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

उस्मानाबाद,दि.13:- सन 2019-20 मध्ये माजी सैनिक, विधवांच्या पाल्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून आरएमडीएफ/एएफएफडीएफ मधून हवालदार पदापर्यंतच्या माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी ऑनलाइन प्रकरणे सादर करावयाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत--
1) चरितार्थाची आर्थिक मदत वय वर्ष 65 व पेन्शन नसलेल्या माजी सैनिकांसाठी वार्षिक रुपये 48हजार, वर्ष 2019-20, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख- 1 मार्च 2020, 2) शिक्षणाची आर्थिक मदत, प्रथम व द्वितीय पाल्यास रुपये 12हजार प्रत्येकी, इयत्ता पहिली ते नववी व अकरावी, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.30 सप्टेंबर 2019, इयत्ता दहावी व बारावी, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.30 ऑक्टोबर 2019,बीए,बीकॉम,
 
 
 
 
बीएस्सी, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2019, 3) मुलीच्या लग्नाकरिता आर्थिक मदत एका मुलीच्या लग्नासाठी रुपये पन्नास हजार, विवाहाच्या तारखेनुसार ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीचा अवधी लग्नानंतर 180 दिवसांच्या आत, 4) अंत्यविधीची आर्थिक मदत एकावेळी रुपये 5हजार, मृत्यू दिनांकानुसार ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मृत्यू दिनांकानंतर 365 दिवसाच्या आत, 5) अनाथ मुलांसाठी आर्थिक मदत वार्षिक रुपये बारा हजार, याकरिता मुदत नाही, 6)  शंभर टक्के मतिमंद, अपंग पाल्यासाठी आर्थिक मदत, वार्षिक रुपये बारा हजार, याकरिता मुदत नाही, 7) वैद्यकीय मदत, रुपये तीस हजार ते रुपये 1 लाख 25हजार,  हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचा कालावधी- हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याच्या तारखेपासून सहा महिने पर्यंत.
तरी गरजू माजी सैनिक अथवा विधवा आणि त्यांचे पाल्य  यांनी   ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत  यांनी केले आहे.           

***

 
वृत्त क्रमांक-365  

  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील

युवक-युवतींसाठी मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

उस्मानाबाद,दि.13:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2019-20 च्या प्रशिक्षणार्थींची (70 टक्के पुरुष व 30 टक्के महिला) पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवड करावयाची आहे.
जिल्ह्यातील वरील संवर्गातील इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या, 18 ते 25 वयोगटातील युवक-युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत. यासाठी उमेदवाराला महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा, उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा, उमेदवारांची उंची पुरुष-165 सेंटीमीटर व महिला-155 सेंटीमीटर इतकी असावी, पुरुषांसाठी छाती-79 सेंटीमीटर व फुगवून 84 सेंटीमीटर असावी, उमेदवारांकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
निवड केलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षणासाठी श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे तीन महिन्यांच्या मोफत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.
 तरी  जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील इच्छुक उमेदवारांनी दि. 14 जून 2019 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी केले आहे.   

      

 

 

 

वृत्त क्रमांक-366                                                दि.13 जून 2019

 

कळंब येथील फटाका कारखाना स्फोटाबाबत चौकशीकरिता

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

उस्मानाबाद,दि.13:- कळंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फेरोज फायर वर्क्स, भोगजी रोड, कळंब येथे आयुब युनुस अत्तार यांच्या नावे असलेल्या परवाना क्रमांक 2/94 या फटाक्याच्या कारखान्यात  दि. 19 मे 2019 रोजी दुपारी साडेचार वाजता अचानक स्फोट होऊन फिरोज आयुब अत्तार आणि सलमा शेख या दोन व्यक्ती मयत झाल्या होत्या.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा दंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 176 अन्वये दंडाधिकारीय चौकशीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, कळंब यांची नियुक्ती केली आहे. या चौकशीबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (2/1974) मधील  दंडाधिकारी; चौकशीसाठी जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार असतील. तसेच विस्फोटक अधिनियम 1884 च्या कलम 7 च्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमान्वये  चौकशी अधिकारी म्हणून त्यांना अधिकार असतील.  
संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत या घटनेचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

*** 

वृत्त क्रमांक-367  

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा

गरोदर व स्तनदा मातांनी लाभ घ्यावा

उस्मानाबाद,दि.13:- गरोदर व स्तनदा मातांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र व महाराष्ट्र शासनाची लाभदायक योजना असून बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी तसेच सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, या दृष्टीकोनातून ही योजना राबविण्यात येते.  
 ही योजना दि. 1 जानेवारी 2017 पासून सुरू करण्यात आलेली असून या योजनेंतर्गत गरोदर व स्तनदा माता यांना पहिल्या जिवंत अपत्यासाठी तीन टप्प्यात एकूण पाच हजार रुपये मातेच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केले जातात. त्यासाठी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेत किंवा किंवा आशा स्वयंसेविका यांना भेटून त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देण्यात येणे बंधनकारक आहे.  त्यामध्ये पहिल्या लाभासाठी गरोदरपणाची नोंद आरसीएच पोर्टल मध्ये एएनएम यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर 100 दिवसाच्या आज कोणत्याही शासकीय
 
 
 
आरोग्य संस्थेत करणे बंधनकारक आहे, गरोदर मातेची नोंदणी केलेल्या माता व बालसंगोपन कार्डची झेरॉक्स, मातेचे आधारकार्ड, पतीचे आधारकार्ड आणि मातेचे बँक किंवा पोस्ट खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स इत्यादी आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर पहिला हप्ता रुपये 1000/- मातेच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात , दुसऱ्या हप्त्यासाठी गरोदर मातेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर व किमान एक प्रसूतिपूर्व गरोदर तपासणी करणे बंधनकारक असून या गरोदर तपासणी केलेल्या माता बाल संगोपन कार्ड मधील गरोदर तपासणी पानाची झेरॉक्स दिल्यानंतर दुसरा हप्ता रुपये 2000/- मातेच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात, तिसऱ्या लाभासाठी प्रसूतीनंतर बाळाचे प्राथमिक स्वरूपाचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर बाळाचे जन्म प्रमाणपत्र व लसीकरण पूर्ण केलेल्या माता बालसंगोपन कार्ड मधील पानाची झेरॉक्स दिल्यानंतर तिसरा हप्ता रुपये दोन हजार मातेच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात. असे एकूण तीन टप्प्यात संबंधित मातेच्या खात्यामध्ये रुपये पाच हजाराची रक्कम जमा केली जाते. हा लाभ ह्या मातेच्या सकस आहारासाठी व बुडीत मजुरीसाठी देण्यात येतो, परंतु या तीनही बाबींसाठी लाभार्थीच्या शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून ते पुढे 730 दिवसाच्या आतच अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे.
ही योजना सुरू झाल्यापासून ते दि. 5 जून 2019 पर्यंत उस्मानाबाद ग्रामीण व शहरी भागात एकूण पंधरा हजार 263 गरोदर व स्तनदा मातांच्या खात्यामध्ये रुपये पाच कोटी 36 लाख 84 हजार इतकी रक्कम डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य संस्था, एएनएम, आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधावा व प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.डी वडगावे यांनी केले आहे.
                                                                       ***

वृत्त क्रमांक-368

महिला लोकशाही दिनाचे

17 जून रोजी आयोजन

उस्मानाबाद, दि.13:- समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून राज्य स्तरावर, विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन ही संकल्पना राबविण्यात येते. या अनुषंगाने सोमवार,दि. 17 जून

 

 

 

 

रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

  तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तर जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाचा दिवस महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो.

या महिला लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले, सेवाविषयक व आस्थापनाविषयक, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर या विषयावरील अर्ज स्वीकारले जात नाहीत.

जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिनाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ महिला, वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतात.

तालुकास्तरावर प्राप्त प्रकरणांवर कार्यवाही होऊन तक्रारीचे निराकरण न झाल्यास ती प्रकरणे जिल्हास्तर महिला लोकशाही दिनामध्ये विचारार्थ घेतली जातात. लोकसभा निवडणूक  आदर्श आचार संहितेमुळे मागील तीन महिने महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

या लोकशाही दिनात महिलांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी/निवेदन विहित नमुन्यात स्वीकारल्या जाणार आहेत. अर्जाचा विहित नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद ,प्रशासकीय इमारत, तळमजला येथे कार्यालयीन वेळेत विनामूल्य प्राप्त करून घेता येतील. या महिला लोकशाही दिनाचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. अशोक सावंत यांनी केले आहे. 

 

***  

वृत्त क्रमांक-369

 

पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत

जिल्हा प्रयोगशाळा नूतन इमारतीचे होणार उद्घाटन

उस्मानाबाद, दि.13:- पाणी गुणवत्ता व सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे वर्कशॉप, तुळजापूर नाका, पोहनेर रोड या नव्या इमारतीचे उद्घाटन आज दि. 14 जून रोजी सकाळी 11 वाजता
 
 
 
 
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यकारी अभियंता राजकुमार पांडव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता मिशन) श्री. मधुकर देशमुख, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक पी. एल. साळवे, वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम. ठाकूर, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) ए. एस.कोळी, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, उपअभियंता प्रशांत बुरडे, सहायक भूवैज्ञानिक श्रीमती डॉ. मेघा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Friday, 7 June 2019

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत ऑनलाइन प्राप्त अर्जाची सोडत दि. 14 जून रोजी


वृत्त क्रमांक-344                                                       दि.7 जून 2019                                                                                           
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत
ऑनलाइन प्राप्त अर्जाची सोडत दि. 14 जून रोजी

उस्मानाबाद,दि.07:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, सामूहिक शेततळे, पॅक हाऊस, शेडनेट, पॉलिहाऊस, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदा चाळ व इतर योजना सन 2019-20 अंतर्गत मंजुरीसाठी ऑनलाइन प्राप्त अर्जाची सोडत शुक्रवार, दि. 14 जून रोजी कृषी चिकित्सालय, तुळजापूर येथे निश्चित करण्यात येणार आहे.
 तरी तुळजापूर तालुक्यातील संबंधित योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी या सोडतीसाठी दि. 14 जून रोजी सकाळी दहा वाजता कृषी चिकित्सालय, तुळजापूर या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर यांनी केले आहे. 

****

वृत्त क्रमांक-345
प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत
फळपीक विमा योजना मृगबहार-2019 लागू
उस्मानाबाद,दि.07:- प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृगबहार-2019 मध्ये जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांसाठी डाळिंब या फळपिकासाठी तर परांडा तालुक्यातील परांडा, आसू,जवळा नि. व सोनारी या महसूल मंडळासाठी लिंबू या फळपिकासाठी लागू केलेली आहे.
या योजनेंतर्गत मृगबहार सन 2019 मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना डाळींब या फळपिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत दाखल करण्याची अंतिम मुदत दि.15 जुलै    तर लिंबू या फळपिकासाठी दि. 14 जून 2019 ही आहे.
शेतकऱ्यांनी प्रतिहेक्‍टरी डाळिंबाच्या फळपिकासाठी रुपये 6 हजार 50 तर लिंबू या फळपिकासाठी रुपये 3 हजार तीनशे इतका विमा हप्ता बँकेत भरून संरक्षित करावेत. या योजनेंतर्गत डाळिंब फळपिकासाठी सलग पावसाचा खंड, एका दिवसात जास्त पाऊस तर लिंबू या फळपिकासाठी कमी पाऊस व पावसातील खंड या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे.




या योजनेंतर्गत डाळिंब फळपिकासाठी उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण, बेंबळी, पाडोळी, केशेगाव, ढोकी, जागजी, तेर, तुळजापूर तालुक्यातील
तुळजापूर, सलगरा, सावरगाव, मंगरूळ, इटकळ, जळकोट, नळदुर्ग, परांडा तालुक्यातील परांडा, जवळा, अनाळा, सोनारी, भूम तालुक्यातील अंभी, माणकेश्वर, भूम,वालवड, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकूर,येरमाळा, मोहा, शिराढोण, गोविंदपूर, उमरगा तालुक्यातील उमरगा, दाळींब, नारंगवाडी, मुळज, मुरूम, लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी, जेवळी आणि वाशी तालुक्यातील वाशी, पारगाव, तेरखेडा तसेच लिंबू या फळपिकासाठी परंडा तालुक्यातील परांडा, आसू, जवळी, सोनारी या  महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे यांनी कळविले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही   श्री. घाटगे यांनी केले आहे.
***

वृत्त क्रमांक-346

पायाभूत सोयीसुविधा अनुदान योजनेंतर्गत अनुदान लाभासाठी
अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळा-महाविद्यालयांनी अर्ज करावेत

उस्मानाबाद,दि.07:-  धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयीसुविधा अनुदान योजनेंतर्गत कमाल रुपये दोन लाख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
या योजनेच्या लाभासाठी शाळा किंवा महाविद्यालयात अल्पसंख्यांक समाजाचे (मुस्लिम,बौद्ध,ख्रिश्चन,जैन, शीख, पारशी व ज्यू मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये किमान पन्नास टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी करणे, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, संगणक कक्ष अद्यावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने एलसीडी प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर इत्यादी, इंग्रजी भाषा लॅब, शुध्द पेयजलाची  व्यवस्था, प्रयोगशाळा




उभारणे, प्रयोगशाळा अद्ययावत करणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृह उभारणे, डागडुजी करणे, झेरॉक्स मशीन, संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअर या पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे.
इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावा. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डीआयईएस कोड, औद्योगिक प्रशिक्षण इन्स्टिट्यूट कोड, संस्थांनी तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाची छाननी शासन निर्णयानुसार करून व सर्व त्रुटींची पूर्तता करून पात्र शाळांची यादी अल्पसंख्यांक विभागास दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सादर करावयाची आहे.  
या विषयाबाबतची माहिती, शासन निर्णय व अर्जाचा नमुना  htt://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र शासनाचे जिल्हा नियोजन चे अवर सचिव श्री. गेंगजे आणि जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे यांनी कळविले आहे.
****

वृत्त क्रमांक-346
ट्रान्सफर ऑफ क्रेडिट चा लाभ घेण्यासाठी
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यास 10 जून पर्यंत मुदतवाढ

उस्मानाबाद,दि.07:- शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च 2019 च्या इ. दहावीच्या परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट चा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मागून घेण्यासाठी दि. 10 जून 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी शाळांनी विद्यार्थ्यांकडून दि.10 जून 2019 पर्यंत अर्ज स्वीकारून संबंधित विभागीय मंडळात सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
***


  

   




Thursday, 6 June 2019

जिल्हा क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न


वृत्त क्रमांक-337                                            





    दि.5 जून 2019                                                                                           

जिल्हा क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण
पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न

उस्मानाबाद,दि.05 : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व जिल्हा क्रीडाअधिकारी संजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व उपयोगात नसलेल्या तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलामधील बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले,लातूर विभागीय क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे,जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, कैलास पाटील,शंकरराव बोरकर,सतीश सोमाणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप कार्यकारी अभियंता विलास गपाट,तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सहायक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे,मदन गायकवाड,शैलेंद्र माने,रमेश जगताप हे देखील उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी या बहुउद्देशीय इमारतीमधील हॉलमध्ये कबडडी, खो-खो, कुस्ती, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, ज्युडो, कराटे, तायक्वांदो आदी इनडोअर खेळ या हॉलमध्ये खेळता येणार आहेत, असे सांगितले तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट असल्यामुळे याचा खेळाडूंना निश्चित लाभ होईल, असे सांगितले. 
यावेळी नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही अनन्यसाधारण महत्व असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षणासाठी गुण व समृद्धी मिळविण्याची संधी असल्याचे म्हटले. तसेच अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील खेळाडूंसाठी बनविण्यात आलेला बहुउद्देशीय इमारत (बॅडमिंटन हॉल) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी उपलब्ध करून दिला व या हॉलमध्ये आतंराराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट तयार करून खेळाडूंना उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील खेळाडूंच्या कष्टांना यश येण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले.
          पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेली बहुउद्देशीय इमारत (बॅडमिंटन हॉल ) खेळाडूंना वाव मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व जिल्हा क्रीडाअधिकारी संजय महाडिक


यांच्या पाठपुराव्यातून आंतराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट तयार केले गेले, खेळाकरिता मैदान तयार करून देण्यात आले, जिल्ह्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरिता आंतराष्ट्रीय दर्जाचे मैदान  उपलब्ध करून दिले, त्याबद्दल कौतुक करून राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त आर्या वाले व आरोही दीक्षित यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी योगेश थोरबोले,अजिंक्य वराळे,अनिल दांडगे,सुरेश कळंबकर,किशोर बोकरे,राम भुतेकर,अविनाश थोरबोले,दिनेश माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदक रवी केसकर तर आभार प्रदर्शन मदन गायकवाड यांनी केले.

****
वृत्त क्रमांक-338
आम्ही श्रमदान केले ! तुम्ही...?
पुढच्या वेळी नक्की या!

उस्मानाबाद दि.05: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज बुधवार,दि.5 जून रोजी तुळजापूर तालुक्यातील रामदरा तलावाच्या परिसरात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, सामाजिक वनीकरण चे विभागीय वन अधिकारी श्री. बेडके,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख, तहसीलदार योगिता कोल्हे, तहसीलदार अभय म्हस्के, तहसीलदार राजकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख, कार्यकारी अभियंता  जिल्हा परिषद (लघुपाटबंधारे) श्री. जगताप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पसरटे, उपविभागीय वन अधिकारी श्री. पवार, वन अधिकारी श्री. घोडके, या सर्वांच्या उपस्थितीत पर्यावरण वृद्धीसाठी तसेच नजीकच्या काळात करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून सकाळी सहा वाजेपासून महसूल विभागातील ,सामाजिक वनीकरण विभागातील, जिल्हा परिषदेतील विविध विभागातील, जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून श्रमदान केले.
या श्रमदानातून सर्वांनी मिळून खड्डे खोदणे, चर खोदणे, दगडांचे बांध तयार करणे,अशी कामे केली. या कामात तुळजापूर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी,तुळजापूर सैनिकी शाळेचे सर्व अधिकारी कर्मचारी,तुळजापूर मंदिर संस्थानाचे सर्व अधिकारी कर्मचारी,सुरक्षारक्षक,पंचायत समितीतील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व स्वस्त

धान्य दुकानदार  आणि स्थानिक गावकरी अत्यंत उत्साहाने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे एका महिला जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श समोर ठेवून प्रशासनातील अनेक महिला अधिकारी व कर्मचारीही या श्रमदानात हिरीरीने सहभागी झाल्या होत्या.

***

वृत्त क्रमांक-339

ज्योती पेस्टीसाईड्स, सहरानपूर उत्पादित फोरेट(थिनेट) चे
जिल्हाभरात विक्री बंद आदेश जारी
तपासणी अहवालात आढळून आले 0% घटक

उस्मानाबाद दि.05: दि. 17 मे 2019 रोजी  येथील कृषी सेवा केंद्राची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. सी.जी.जाधव यांनी तपासणी केली होती. त्यामध्ये ज्योती पेस्टीसाइड, सहरानपूर उत्पादित फोरेट या किटकनाशकाचा साठा आढळून आला होता. कीटकनाशक कायदा 1968 अन्वये हा नमुना काढून कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणीकरिता पाठविण्यात आला होता. या प्रयोगशाळेकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून विश्लेषण अहवालानुसार फोरेट या किटकनाशकाचे शून्य टक्के घटक आढळून आल्याने त्याची जिल्हाभरात विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 2 हजार 556 किलो (रक्कम दोन लाख 55 हजार सहाशे) चे विक्री बंद आदेश करण्यात आलेले असून कीटकनाशक कायदा 1968 व नियम 1971 अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
तरी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करीत असताना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी. खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. पावतीवर विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करून घ्यावी. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे वेस्टन, पावती पिशवीत व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत
जतन करून ठेवावेत. बियाण्यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत. कमी वजनाच्या निविष्ठा छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री आदी कारणांसाठी  तक्रार


असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा तसेच ज्योती पेस्टीसाइड, सहरानपूर उत्पादित फोरेटची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे यांनी केले आहे.
****

वृत्त क्रमांक-340                                                दि.5 जून 2019

शेती व शेतीतंत्रज्ञानाविषयी नवनवीन माहिती
मिळवून परिस्थितीवर मात करा
                                                                 ---पालकमंत्री अर्जुन खोतकर
उस्मानाबाद दि.05: हवामानातील बदल, निसर्गाचा लहरीपणा या गोष्टींना दोष देत न बसता शेतकर्‍यांनी शेती व शेती तंत्रज्ञानाबाबत नवनवीन माहिती मिळवून परिस्थितीवर मात मिळवायला शिकलं पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या एकत्रित प्रयत्नांनी 2जून ते 5 जून या कालावधीत कृषी प्रदर्शन तथा महोत्सवाचे आयोजन नगरपरिषद नाट्य सभागृह तसेच यशराज लॉन्स येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या परिसंवादाच्या उद्घाटनाच्या वेळी पालकमंत्री श्री.खोतकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, शंकरराव बोरकर, संजय पाटील दुधगावकर, कैलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्री. साळवी, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, प्रकल्प संचालक (आत्मा) श्री. जितेंद्र शिंदे ,कृषी उपसंचालक श्री. सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे, प्रकल्प
उपसंचालक (आत्मा) श्री. केशव मलगुंडे, प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी श्री. सत्यवान सुरवसे हे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.खोतकर पुढे म्हणाले, आपल्या जीवनाची दिशा आपणच ठरविली पाहिजे. नकारात्मक विचारांना थारा न देता संशोधनात्मक वृत्ती जोपासायला हवी. शेती नियोजन करताना लहान-सहान सर्वच गोष्टींचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे.


शेतकऱ्यांनी पर्यावरणाचा अभ्यास करून अंदाज घेऊन त्याप्रमाणे विविध पिकांच्या लागवडीचे अभ्यासपूर्ण नियोजन करावे, असे सांगून अशा प्रकारच्या संपन्न अनुभव देणाऱ्या,अभ्यासपूर्ण माहिती देणाऱ्या, नवनवीन तंत्रज्ञानाची, पीक पद्धतीची माहिती देणाऱ्या प्रदर्शन व कृषी महोत्सवामुळे उस्मानाबादमधील शेती व शेतकरी निश्चितच समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच अशा प्रकारचे अत्यंत सुंदर असे प्रदर्शन व कृषी महोत्सव आयोजित केल्याबद्दल पालकमंत्री श्री. खोतकर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, प्रकल्प संचालक (आत्मा) जितेंद्र शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी अतिशय उत्साहवर्धक मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांना शेती नियोजन,पाणी वापराचे नियोजन यांचा अभ्यास करण्याचे  आणि आम्ही मागासलेल्या जिल्ह्याचे आहोत या वाक्याचा आणि विचारांचा त्याग करण्याचे आवाहन केले.
प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी सत्यवान सुरवसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पाणी नियोजन, मजूर नियोजन, शेतमालाच्या विक्रीचे नियोजन याविषयीचे वस्तुस्थितीदर्शक अनुभव सांगितले व शेतीविषयक व्यवस्थित नियोजन केल्यास शेतीत निश्चितच यश मिळेल, हा आत्मविश्वास बाळगा असे आवाहन केले.
या निमित्ताने आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही उपस्थित शेतकऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला. या परिसंवादाच्या अनुषंगाने पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना या परिसंवादाचे महत्त्व, त्यातील विषय व संबंधित वक्ते या विषयांची सविस्तर माहिती दिली.
सुरूवातीस या परिसंवादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले तर प्रास्ताविक जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी केले, सूत्रसंचालन कृषी उपसंचालक श्री. सुभाष चोले यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक (आत्मा) जितेंद्र शिंदे यांनी केले.
****