वृत्त क्रमांक-337
दि.5 जून 2019
जिल्हा क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण
पालकमंत्री
अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न
उस्मानाबाद,दि.05 : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
व जिल्हा क्रीडाअधिकारी संजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून अनेक वर्षांपासून
प्रलंबित असलेल्या व उपयोगात नसलेल्या तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलामधील
बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी दीपा
मुधोळ-मुंडे,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार ज्ञानराज चौगुले,लातूर विभागीय क्रीडा उपसंचालक
उर्मिला मोराळे,जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, कैलास पाटील,शंकरराव
बोरकर,सतीश सोमाणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप
कार्यकारी अभियंता विलास गपाट,तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्या
उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सहायक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे,मदन
गायकवाड,शैलेंद्र माने,रमेश जगताप हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
प्रास्तविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी या बहुउद्देशीय इमारतीमधील
हॉलमध्ये कबडडी, खो-खो, कुस्ती, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, ज्युडो,
कराटे, तायक्वांदो आदी इनडोअर खेळ या हॉलमध्ये खेळता येणार आहेत, असे सांगितले
तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट असल्यामुळे याचा खेळाडूंना निश्चित लाभ
होईल, असे सांगितले.
यावेळी
नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही
अनन्यसाधारण महत्व असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षणासाठी गुण व
समृद्धी मिळविण्याची संधी असल्याचे म्हटले. तसेच अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील
खेळाडूंसाठी बनविण्यात आलेला बहुउद्देशीय इमारत (बॅडमिंटन हॉल) जिल्हाधिकारी दीपा
मुधोळ-मुंडे व जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी उपलब्ध करून दिला व या
हॉलमध्ये आतंराराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट तयार करून खेळाडूंना उत्तम संधी उपलब्ध
करून दिल्याबद्दल कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील खेळाडूंच्या कष्टांना यश
येण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले.
पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी
आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेली बहुउद्देशीय
इमारत (बॅडमिंटन हॉल ) खेळाडूंना वाव मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
व जिल्हा क्रीडाअधिकारी संजय महाडिक
यांच्या
पाठपुराव्यातून आंतराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक कोर्ट तयार केले गेले, खेळाकरिता
मैदान तयार करून देण्यात आले, जिल्ह्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरिता
आंतराष्ट्रीय दर्जाचे मैदान उपलब्ध करून
दिले, त्याबद्दल कौतुक करून राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त
आर्या वाले व आरोही दीक्षित यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाच्या
यशस्वीततेसाठी योगेश थोरबोले,अजिंक्य वराळे,अनिल दांडगे,सुरेश कळंबकर,किशोर बोकरे,राम
भुतेकर,अविनाश थोरबोले,दिनेश माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द
निवेदक रवी केसकर तर आभार प्रदर्शन मदन गायकवाड यांनी केले.
****
वृत्त
क्रमांक-338
आम्ही श्रमदान
केले ! तुम्ही...?
पुढच्या वेळी नक्की या!
पुढच्या वेळी नक्की या!
उस्मानाबाद
दि.05: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज बुधवार,दि.5 जून रोजी तुळजापूर
तालुक्यातील रामदरा तलावाच्या परिसरात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर
जिल्हाधिकारी पराग सोमण, सामाजिक वनीकरण चे विभागीय वन अधिकारी श्री. बेडके,निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) महेंद्रकुमार
कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख, तहसीलदार योगिता कोल्हे, तहसीलदार
अभय म्हस्के, तहसीलदार राजकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख,
कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद
(लघुपाटबंधारे) श्री. जगताप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव,
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पसरटे, उपविभागीय वन अधिकारी श्री. पवार, वन अधिकारी श्री.
घोडके, या सर्वांच्या उपस्थितीत पर्यावरण वृद्धीसाठी तसेच नजीकच्या काळात करण्यात
येणाऱ्या वृक्षलागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून सकाळी सहा वाजेपासून महसूल विभागातील
,सामाजिक वनीकरण विभागातील, जिल्हा परिषदेतील विविध विभागातील, जिल्हा माहिती
कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून श्रमदान केले.
या श्रमदानातून
सर्वांनी मिळून खड्डे खोदणे, चर खोदणे, दगडांचे बांध तयार करणे,अशी कामे केली. या
कामात तुळजापूर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी,तुळजापूर
सैनिकी शाळेचे सर्व अधिकारी कर्मचारी,तुळजापूर मंदिर संस्थानाचे सर्व अधिकारी
कर्मचारी,सुरक्षारक्षक,पंचायत समितीतील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व स्वस्त
धान्य दुकानदार आणि स्थानिक गावकरी अत्यंत उत्साहाने मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे
एका महिला जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श समोर ठेवून प्रशासनातील अनेक महिला अधिकारी व
कर्मचारीही या श्रमदानात हिरीरीने सहभागी झाल्या होत्या.
***
वृत्त
क्रमांक-339
ज्योती पेस्टीसाईड्स, सहरानपूर उत्पादित
फोरेट(थिनेट) चे
जिल्हाभरात विक्री बंद आदेश जारी
तपासणी अहवालात आढळून आले 0% घटक
उस्मानाबाद दि.05: दि. 17 मे 2019
रोजी येथील कृषी सेवा केंद्राची जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री.
सी.जी.जाधव यांनी तपासणी केली होती. त्यामध्ये ज्योती पेस्टीसाइड, सहरानपूर
उत्पादित फोरेट या किटकनाशकाचा साठा आढळून आला होता. कीटकनाशक कायदा 1968 अन्वये
हा नमुना काढून कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणीकरिता पाठविण्यात आला
होता. या प्रयोगशाळेकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून विश्लेषण अहवालानुसार फोरेट
या किटकनाशकाचे शून्य टक्के घटक आढळून आल्याने त्याची जिल्हाभरात विक्री तात्काळ
बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आतापर्यंत
2 हजार 556 किलो (रक्कम दोन लाख 55 हजार सहाशे) चे विक्री बंद आदेश करण्यात आलेले
असून कीटकनाशक कायदा 1968 व नियम 1971 अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
तरी
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करीत असताना अधिकृत परवानाधारक कृषी
सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी. खरेदी करताना पक्की पावती घ्यावी.
पावतीवर विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करून घ्यावी. बियाणे खरेदी
केल्यानंतर त्याचे वेस्टन, पावती पिशवीत व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत
जतन करून
ठेवावेत. बियाण्यांची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत
पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत. कमी
वजनाच्या निविष्ठा छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री आदी कारणांसाठी तक्रार
असल्यास
नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ
संपर्क साधावा तसेच ज्योती पेस्टीसाइड, सहरानपूर उत्पादित फोरेटची खरेदी करू नये,
असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे यांनी केले आहे.
****
वृत्त
क्रमांक-340 दि.5 जून 2019
शेती
व शेतीतंत्रज्ञानाविषयी नवनवीन माहिती
मिळवून
परिस्थितीवर मात करा
---पालकमंत्री अर्जुन खोतकर
उस्मानाबाद
दि.05: हवामानातील बदल, निसर्गाचा लहरीपणा या गोष्टींना दोष देत न बसता शेतकर्यांनी
शेती व शेती तंत्रज्ञानाबाबत नवनवीन माहिती मिळवून परिस्थितीवर मात मिळवायला शिकलं
पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल येथे केले.
जिल्हाधिकारी
कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या एकत्रित
प्रयत्नांनी 2जून ते 5 जून या कालावधीत कृषी प्रदर्शन तथा महोत्सवाचे आयोजन नगरपरिषद
नाट्य सभागृह तसेच यशराज लॉन्स येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या तिसऱ्या
दिवशीच्या परिसंवादाच्या उद्घाटनाच्या वेळी पालकमंत्री श्री.खोतकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, शंकरराव बोरकर,
संजय पाटील दुधगावकर, कैलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्री. साळवी, जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, प्रकल्प संचालक (आत्मा) श्री.
जितेंद्र शिंदे ,कृषी उपसंचालक श्री. सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.
नामदेव आघाव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे, प्रकल्प
उपसंचालक (आत्मा) श्री. केशव मलगुंडे,
प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी श्री. सत्यवान सुरवसे हे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.खोतकर
पुढे म्हणाले, आपल्या जीवनाची दिशा आपणच ठरविली पाहिजे. नकारात्मक विचारांना थारा
न देता संशोधनात्मक वृत्ती जोपासायला हवी. शेती नियोजन करताना लहान-सहान सर्वच
गोष्टींचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी पर्यावरणाचा अभ्यास करून
अंदाज घेऊन त्याप्रमाणे विविध पिकांच्या लागवडीचे अभ्यासपूर्ण नियोजन करावे, असे
सांगून अशा प्रकारच्या संपन्न अनुभव देणाऱ्या,अभ्यासपूर्ण माहिती देणाऱ्या, नवनवीन
तंत्रज्ञानाची, पीक पद्धतीची माहिती देणाऱ्या प्रदर्शन व कृषी महोत्सवामुळे
उस्मानाबादमधील शेती व शेतकरी निश्चितच समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला तसेच अशा प्रकारचे अत्यंत सुंदर असे प्रदर्शन व कृषी महोत्सव आयोजित
केल्याबद्दल पालकमंत्री श्री. खोतकर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा कृषी
अधीक्षक उमेश घाटगे, प्रकल्प संचालक (आत्मा) जितेंद्र शिंदे यांचे विशेष अभिनंदन
केले.
यावेळी
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी अतिशय उत्साहवर्धक मनोगत व्यक्त करताना
शेतकऱ्यांना शेती नियोजन,पाणी वापराचे नियोजन यांचा अभ्यास करण्याचे आणि आम्ही मागासलेल्या जिल्ह्याचे आहोत या
वाक्याचा आणि विचारांचा त्याग करण्याचे आवाहन केले.
प्रगतशील व
प्रयोगशील शेतकरी सत्यवान सुरवसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पाणी नियोजन, मजूर
नियोजन, शेतमालाच्या विक्रीचे नियोजन याविषयीचे वस्तुस्थितीदर्शक अनुभव सांगितले व
शेतीविषयक व्यवस्थित नियोजन केल्यास शेतीत निश्चितच यश मिळेल, हा आत्मविश्वास
बाळगा असे आवाहन केले.
या निमित्ताने
आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही उपस्थित शेतकऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला. या
परिसंवादाच्या अनुषंगाने पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पसरटे यांनी उपस्थित शेतकर्यांना
या परिसंवादाचे महत्त्व, त्यातील विषय व संबंधित वक्ते या विषयांची सविस्तर माहिती
दिली.
सुरूवातीस या
परिसंवादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले तर प्रास्ताविक
जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी केले, सूत्रसंचालन कृषी उपसंचालक श्री.
सुभाष चोले यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक (आत्मा) जितेंद्र शिंदे
यांनी केले.
****





