Friday, 7 June 2019

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत ऑनलाइन प्राप्त अर्जाची सोडत दि. 14 जून रोजी


वृत्त क्रमांक-344                                                       दि.7 जून 2019                                                                                           
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत
ऑनलाइन प्राप्त अर्जाची सोडत दि. 14 जून रोजी

उस्मानाबाद,दि.07:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, सामूहिक शेततळे, पॅक हाऊस, शेडनेट, पॉलिहाऊस, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदा चाळ व इतर योजना सन 2019-20 अंतर्गत मंजुरीसाठी ऑनलाइन प्राप्त अर्जाची सोडत शुक्रवार, दि. 14 जून रोजी कृषी चिकित्सालय, तुळजापूर येथे निश्चित करण्यात येणार आहे.
 तरी तुळजापूर तालुक्यातील संबंधित योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी या सोडतीसाठी दि. 14 जून रोजी सकाळी दहा वाजता कृषी चिकित्सालय, तुळजापूर या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर यांनी केले आहे. 

****

वृत्त क्रमांक-345
प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत
फळपीक विमा योजना मृगबहार-2019 लागू
उस्मानाबाद,दि.07:- प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृगबहार-2019 मध्ये जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांसाठी डाळिंब या फळपिकासाठी तर परांडा तालुक्यातील परांडा, आसू,जवळा नि. व सोनारी या महसूल मंडळासाठी लिंबू या फळपिकासाठी लागू केलेली आहे.
या योजनेंतर्गत मृगबहार सन 2019 मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना डाळींब या फळपिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत दाखल करण्याची अंतिम मुदत दि.15 जुलै    तर लिंबू या फळपिकासाठी दि. 14 जून 2019 ही आहे.
शेतकऱ्यांनी प्रतिहेक्‍टरी डाळिंबाच्या फळपिकासाठी रुपये 6 हजार 50 तर लिंबू या फळपिकासाठी रुपये 3 हजार तीनशे इतका विमा हप्ता बँकेत भरून संरक्षित करावेत. या योजनेंतर्गत डाळिंब फळपिकासाठी सलग पावसाचा खंड, एका दिवसात जास्त पाऊस तर लिंबू या फळपिकासाठी कमी पाऊस व पावसातील खंड या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे.




या योजनेंतर्गत डाळिंब फळपिकासाठी उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण, बेंबळी, पाडोळी, केशेगाव, ढोकी, जागजी, तेर, तुळजापूर तालुक्यातील
तुळजापूर, सलगरा, सावरगाव, मंगरूळ, इटकळ, जळकोट, नळदुर्ग, परांडा तालुक्यातील परांडा, जवळा, अनाळा, सोनारी, भूम तालुक्यातील अंभी, माणकेश्वर, भूम,वालवड, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकूर,येरमाळा, मोहा, शिराढोण, गोविंदपूर, उमरगा तालुक्यातील उमरगा, दाळींब, नारंगवाडी, मुळज, मुरूम, लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी, जेवळी आणि वाशी तालुक्यातील वाशी, पारगाव, तेरखेडा तसेच लिंबू या फळपिकासाठी परंडा तालुक्यातील परांडा, आसू, जवळी, सोनारी या  महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे यांनी कळविले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही   श्री. घाटगे यांनी केले आहे.
***

वृत्त क्रमांक-346

पायाभूत सोयीसुविधा अनुदान योजनेंतर्गत अनुदान लाभासाठी
अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळा-महाविद्यालयांनी अर्ज करावेत

उस्मानाबाद,दि.07:-  धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयीसुविधा अनुदान योजनेंतर्गत कमाल रुपये दोन लाख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
या योजनेच्या लाभासाठी शाळा किंवा महाविद्यालयात अल्पसंख्यांक समाजाचे (मुस्लिम,बौद्ध,ख्रिश्चन,जैन, शीख, पारशी व ज्यू मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये किमान पन्नास टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी करणे, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, संगणक कक्ष अद्यावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने एलसीडी प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर इत्यादी, इंग्रजी भाषा लॅब, शुध्द पेयजलाची  व्यवस्था, प्रयोगशाळा




उभारणे, प्रयोगशाळा अद्ययावत करणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृह उभारणे, डागडुजी करणे, झेरॉक्स मशीन, संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअर या पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे.
इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावा. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डीआयईएस कोड, औद्योगिक प्रशिक्षण इन्स्टिट्यूट कोड, संस्थांनी तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाची छाननी शासन निर्णयानुसार करून व सर्व त्रुटींची पूर्तता करून पात्र शाळांची यादी अल्पसंख्यांक विभागास दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सादर करावयाची आहे.  
या विषयाबाबतची माहिती, शासन निर्णय व अर्जाचा नमुना  htt://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र शासनाचे जिल्हा नियोजन चे अवर सचिव श्री. गेंगजे आणि जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे यांनी कळविले आहे.
****

वृत्त क्रमांक-346
ट्रान्सफर ऑफ क्रेडिट चा लाभ घेण्यासाठी
विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यास 10 जून पर्यंत मुदतवाढ

उस्मानाबाद,दि.07:- शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च 2019 च्या इ. दहावीच्या परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट चा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मागून घेण्यासाठी दि. 10 जून 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी शाळांनी विद्यार्थ्यांकडून दि.10 जून 2019 पर्यंत अर्ज स्वीकारून संबंधित विभागीय मंडळात सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
***