Tuesday, 13 March 2018

सोशल मीडिया महामित्रच्या माध्यमातून तरुण सकारात्मक दृष्टीने एकत्र येण्यास चालना– – सोशल मीडीया महामित्रांची प्रतिक्रिया










उस्मानाबाद,दि.13:-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया महामित्र उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील निवडक सहभागींनी आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात संवादसत्र स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या गटचर्चेत उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर व उमरगा या क्षेत्रातील एकूण 19 युवकांनी सहभाग नोंदविला होता.

          जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी सोशल मीडिया महामित्र उपक्रम आणि संवादसत्र उपक्रमाबद्दल प्रास्ताविकातून उपस्थित स्पर्धक, परीक्षक, निरीक्षक यांना माहिती सांगितली.  

दिवसभरात एकूण चार टप्प्यातील स्पर्धकांनी महामित्र उपक्रमातून काय साध्य होईल? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमांचा प्रभाव किती खरा किती खोटा? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमांची इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बरोबरी? अशा विषयांवर गटचर्चा होवून ही स्पर्धा संपन्न झाली.

या गटचर्चांचे परीक्षण व निरीक्षण जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, पत्रकार संतोष जाधव, साहित्यिक राजेंद्र अत्रे,नेहरू विकास केंद्राचे विकास कुलकर्णी,संतोष कांबळे (कोळी), गणेश कुलकर्णी यांनी केले.

शेवटी सहभागी सर्व स्पर्धकांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अभिनंदन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.याशिवाय सहभागी स्पर्धकांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांचीही माहिती देण्यात आली तसेच त्यांना लोकराज्य, महाराष्ट्र अहेड, मुद्रा योजनेची आणि बळीराजा चेतना अभियानाची माहिती पुस्तिका भेट स्वरुपात देण्यात आले.

Sunday, 11 March 2018

दिव्यांगासाठी मोफत सहाय्यक उपकरर्ण वाटपासाठी तपासणी शिबीर



उस्मानाबाद. दि. 11:-  उस्मानाबाद जिल्हयातील दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरर्ण ज्यात कृत्रीम पाय, हात, खूर्ची इत्यादी मोफत दिले जाणार आहेत. त्यासाठी दि. 15, 16 व 17 मार्च रोजी जिल्हयात तीन ठिकाणी तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरासाठी रुरल इलेक्टीफिकेशन कार्पोरेशन लिमीटेड मदत करणार असून दिल्लीच्या तज्ञ व्यक्तींकडून तपासणी केली जाणार आहे. यासाठी जास्तीत-जास्त लाभार्थींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा व आरोग्य सभापती अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.
यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेले अपंगाचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला, एक पासपोर्ट फोटो या कागदपत्रासह दि. 15 मार्च रोजी परीचारीका प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालयाचे मागे, मारवाड गल्ली, उस्मानाबाद, दि. 16 मार्च रोजी ग्रामीण रुग्णाल, सास्तूर ता. लोहारा, जि. उस्मानाबाद व दि. 17 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय, कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद या ठिकाणी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे यांनी केले आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ 11 मार्च मोहीमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या शुभ हस्ते स्त्री रुग्णालयात संपन्न







उस्मानाबाद. दि. 11:-  दि. 11 मार्च 2018 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ (दुसरी फेरी) मोहीमेचा शुभारंभ स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या शुभ हस्ते बालकांना लसीची मात्रा देवून करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ, डॉ.   राहूल वाघमारे, डॉ. प्रताप शिंदे, डॉ. सुशील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयात आज पोलिओ बुथवर पोलिओ लसीची मात्रा (डोस) देण्यासाठी ग्रामीण भागात 1228 व शहरी भागात 168 असे एकूण 1296 बुथवर व त्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वे स्टेशन,  बाजार, बांधकाम, विटभट्टी, साखरे कारखाने, ऊसतोड कामगार पाली, भटके जाती/जमातीच्या फिरस्ती पाली, टमटम स्टॅन्ड, सेल्स इत्यादी ठिकाणी ट्रान्झीट टिमची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या मोहीमेसाठी जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांच्यामार्फत पर्यवेक्षण करण्यात येत असून आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती यांचा पोलिओची मात्रा देण्यासाठी समावेश करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा विस्तार व माध्यम धिकारी ए.यु. लाकाळ व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.