Thursday, 25 January 2018

अधिकाऱ्यांनी झटून कामे करा, जिल्हयाला निधीची कमतरता पडू देणार नाही -पालकमंत्री दिवाकर रावते





उस्मानाबाद, दि. 25:- परिवहन, खारभूमी विकास  मंत्री  तथा  जिल्ह्याचे दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आज  जिल्हा  नियोजन समितीची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा  नियोजन समिती सभागृहात पार पडली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी झटून कामे करा, जिल्हयाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री श्री. रावते यांनी येथे केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, सर्वश्री आमदार मधुकर चव्हाण, राणा जगजितसिंह पाटील, विक्रम काळे, राहुल मोटे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर  हे उपस्थित होते.          
या बैठकीमध्ये सर्वप्रथम  दिनांक 30 ऑक्टोबर 2017 रोजी  झालेल्या  जिल्हा  नियोजन समिती बैठकीच्या  इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली,  जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 मधील  सर्वसाधारण, अनुसूचित  जाती उप योजना  व आदिवासी क्षेत्राबाहेरील  उपयोजनांचा माहे डिसेंबर 2017 अखेर  झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्री श्री. रावते यांनी घेतला.  
सन 2018-19 मधील  जिल्हा वार्षिक सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी  क्षेत्राबाहेरील योजनानिहाय  प्रारुप आराखड्यास यावेळी मंजूरी देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजना  सर्वसाधारण सन 2017-18 करीता एकूण 14 हजार 813 लक्ष रुपये मंजूर असून आजपर्यंत 5 हजार 02 लक्ष एवढा निधी  खर्च झाला आहे. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2017-18 साठी  7 हजार 79 लक्ष एवढा  निधी मंजूर असून त्यापैकी 732.91 लक्ष एवढा निधी खर्च झाला आहे तर  जिल्हा वार्षिक आदिवासी उप योजना सन 2017-18 साठी 227.02 लक्ष एवढा  निधी जिल्ह्यासाठी मंजूर असून त्यापैकी 57.68 लक्ष निधी आतापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुधारक आडे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे सभागृहासमोर सादर केली.
या सादरीकरणानंतर पालकमंत्री महोदयांनी सर्व विभागप्रमुखांस  मार्च 2018 पर्यंत निधी 100 टक्के खर्च  करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
सन 2017-18 या वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या निधीला शासनाकडून 30 टक्के कपात करण्यात आलेली आहे, केलेली कपात सन 2018-19 च्या प्रारुप आराखडयात वाढवून देण्यात यावी तसेच 50 टक्के वाढीव निधी देण्यात यावा असा ठराव सदस्य संजय मडके यांनी यावेळी मांडला त्यास सदस्या सक्षेणा सलगर यांनी अनुमोदन दिले. या ठरावाचे सर्व सदस्यांनी स्वागत केले.
 जिल्ह्यात विविध विकासकामे हाती घेऊन चांगल्या  प्रकारच्या सुविधा निर्माण  करणे आवश्यक आहे, जिल्हयाला या वर्षी 30 टक्के निधी कपातीला सामोरे जावे लागले आहे परंतु सन 2018-19 च्या जिल्हयाच्या आराखडयात मागील वर्षाचा 30 टक्के वाढीव निधी व 50 टक्के जास्तीचा निधी प्राप्त होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे पालकमंत्री महोदयांनी  यावेळी सांगितले.  
या बैठकीनंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने बळीराजा चेतना अभियानावरील लघुपटाचा मुहूर्त पालकमंत्री दिवाकर रावते आणि उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय मुद्रा बँक योजना आणि सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठीच्या योजना या विषयावरील लघुपटाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर घडीपत्रिका आणि माहितीपुस्तिकेचेही प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर लोकराज्य या शासकीय मुखपत्राच्या प्रचार, प्रसिध्दी आणि वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी ज्यांनी विशेष काम केले आहे अशा जिल्हा पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद उस्मानाबाद, जि.प.कें.आदर्श प्रा. शाळा तडवळे (कसबे), विद्यानिकेतन हायस्कूल, येरमाळा, देवधानोरा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय,देवधानोरा, जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कसबे तडवळे, महाराष्ट्र संत विद्यालय,तेर, भाई नारायणराव लोमटे, माध्यमिक विद्यालय,भाटशिरपुरा, ता.कळंब या कार्यालय/शाळा/ महाविद्यालय यांचा लोकराज्य कार्यालय, लोकराज्यशाळा व लोकराज्य महाविद्यालय या पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याचबरोबर  अण्णासाहेब सातपुते, सिध्दार्थ सावंत, राहुल जगताप, भारत बळीराम लोंढे, महादेव भंडारे  यांचा लोकराज्य दूत म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्या श्रीमती अर्चना राणाजगजिसिंह पाटील, जयश्री रामा खंडागळे,  उषा सुरेश यरकळ, सुनिता गोविंद जाधव, सक्षेणा सिद्राम सलगर, छाया सुनिल काळे, महानंदा सुरेश कोरे, संगीता हनमंत बोराडे, शोभा शामसुंदर तोरकडे, अनिता सुधीर अंबर, संयोगिता संजय गाढवे, अंजली नितिन शेरखाने, सदस्य बाळासाहेब धनराज जाधवर, शेखर गोविंद घंटे, प्रकाश मोतीराम चव्हाण, संदिप गौतम मडके, गौतम रामा लटके, सिध्दार्थ अंगुल बनसोडे, प्रसाद माणिक जोशी, ज्ञानदेव गणपती राजगुरु तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियेाजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, श्री. पवार आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. 

मतदानाच्या मौलिक अधिकाराचा वापर जबाबदारीपूर्वक करावा-जिल्हाधिकारी गमे.






उस्मानाबाद,दि.25- भारतीय मतदाराला संसदीय लोकशाहीने मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे, या अधिकाराचा वापर जबाबदारीपूर्वक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
    राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महसूल भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रीरंगी, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,तहसिलदार सुजित नरहरे हे उपस्थित होते.
     श्री गमे म्हणाले, संसदीय लोकशाहीचा मतदार हा पाया आहे,आणि या मतदारांसाठी सुलभ सुविधा निर्माण करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. आपला देश हा तरुणांचा देश म्हणून जगभरात ओळखला जातो, या देशात 18 वर्षावरील प्रत्येकास कोणत्याही प्रकाराचा भेदभाव न बाळगता मतदानाचा अधिकार मिळतो. यामुळेच आपली लोकशाही जगातील सर्वात प्रबळ लोकशाही आहे, असे सांगून ते म्हणाले, आताची मतदार यादी आता परिपूर्ण आहे,आणि मतदान पत्रिकाही सहजसुलभ आहे. त्यामुळे बोगस मतदानालाही आळा बसला आहे. याशिवाय मतदान झाल्यानंतर आपण आपले मत निश्चित कोणाला दिले याचा पुरावाही आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा अधिकाराचा सदुपयोग करावा,असेही ते म्हणाले.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री ओमप्रकाश रावत यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जनतेला केलेल्या आवाहनाची चित्रफीत दाखविण्यात आली.
       यानंतर जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी मतदारांसाठी प्रतिज्ञा वाचून दाखविली व उपस्थित सर्वांनी ती प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणूक ज्ञान स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या एकंडे सरोज सहदेव,मुंढे यशकुमार अशोकराव, पठाण तनवीर,भागवत तेजश्री,विलास थोरात,तसेच अपंग मतदार सायरत्ता जोहुरोद्यीन सय्सद,मोठे पद्मामाणी, पाटील ऋतुजा प्रकाश, रितेश राजकुमार घुटे,प्रमोद सुभाष चौधरी,येताळ शाम काकासाहेब यांचाही सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी श्री गमे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले तसेच नवमतदारांचा, दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय मतदार जनजागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी श्री.गमे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रीरंगी यांनी केले. सूत्रसंचलन तहसिलदार सुजित नरहरे यांनी केले.

     राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने आज शहरात महाविद्यालयीन तरुण-तरुणींना जनजागरण रॅली काढून उस्मानाबाद मधील जनतेला मतदान करण्याविषयीचे आवाहनही केले.

आपल्या बँक खात्याविषयीची माहिती इतरांना शेअर करु नका - अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर


उस्मानाबाद, दि 25- सध्याच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. याच तंत्रज्ञानाचा काही जणांकडून गैरवापर करण्यात येतो,त्यामुळे सायबर गुन्हें घडतात.मात्र नागरिकांनी थोडीशी सावधानता बाळगली तर अशा घटनाना आळा बसु शकतो. यासाठी  आपल्या बँक खात्यांसह इतर महत्त्वाची  माहिती अनोळखी व्यक्तीना देवू नका त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापरही जबाबदारीने करा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी नुकतेच येथे केले.  
     उस्मानाबाद जिल्हा पोलीस व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पोलीस मुख्यालयातील सभागृहात मंगळवार दि.23 जानेवारी रोजी आयोजित सायबर गुन्हे, सुरक्षा जाणीव जागृती या विषयावर  कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी स्थागुशाचे पोनि डी.एम.शेख, सपोनि राजेंद्र बनसोडे यांच्यासह पोलीस अधिकारी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सोशेल मीडियावर कुणाच्या भावना दुखावणारा मजकूर टाकणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होईल असा मजकूर टाकणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकरणात एखाद्या विरुध्द गुन्हा दाखल झाला तर त्याला शिक्षा ही ठरलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: युवकांनी सोशल मीडियाचा वापर दक्षतेने करावा.                                         
           प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी कार्यशाळा आयोजनाचा हेतू प्रास्ताविकात विषद केला त्यानंतर ॲक्सीस बँकेचे प्रतिनिधा के.एम.पाटील यांनी बँकींग क्षेत्रात सायबर क्राईममधून होणारी ग्राहकांची लूट आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता याची माहिती दिली. तर सायबर सेलच्या प्रमुख सपोनि विरयाणी कदम यांनी उस्मानाबाद ग्रामीण व तुळजापूर ठाण्यातर्गत दाखल गुन्हें, ग्राहकांची झालेली फसवणूक  व त्यानंतर तपासात समोर आलेले मुद्दे व घ्यावयाची दक्षता याची माहिती या कार्यशाळेत दिली.

     शेवटी स्थागुशाचे पोनि डी.एम.शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेत प्रसारमाध्यम प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.