उस्मानाबाद, दि 25- सध्याच्या
युगात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. याच तंत्रज्ञानाचा
काही जणांकडून गैरवापर करण्यात येतो,त्यामुळे सायबर गुन्हें घडतात.मात्र नागरिकांनी
थोडीशी सावधानता बाळगली तर अशा घटनाना आळा बसु शकतो. यासाठी आपल्या बँक खात्यांसह इतर महत्त्वाची माहिती अनोळखी व्यक्तीना देवू नका त्याचबरोबर
सोशल मीडियाचा वापरही जबाबदारीने करा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर
यांनी नुकतेच येथे केले.
उस्मानाबाद जिल्हा पोलीस व जिल्हा माहिती
कार्यालयाच्या वतीने पोलीस मुख्यालयातील सभागृहात मंगळवार दि.23 जानेवारी रोजी आयोजित
सायबर गुन्हे, सुरक्षा जाणीव जागृती या विषयावर कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी स्थागुशाचे
पोनि डी.एम.शेख, सपोनि राजेंद्र बनसोडे यांच्यासह पोलीस अधिकारी बँकेचे कर्मचारी
उपस्थित होते.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सोशेल मीडियावर कुणाच्या भावना
दुखावणारा मजकूर टाकणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा मजकूर टाकणे कायद्याने गुन्हा आहे.
अशा प्रकरणात एखाद्या विरुध्द गुन्हा दाखल झाला तर त्याला शिक्षा ही ठरलेली आहे.
त्यामुळे नागरिकांनी विशेषत: युवकांनी सोशल मीडियाचा वापर दक्षतेने करावा.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मनोज
सानप यांनी कार्यशाळा आयोजनाचा हेतू प्रास्ताविकात विषद केला त्यानंतर ॲक्सीस बँकेचे
प्रतिनिधा के.एम.पाटील यांनी बँकींग क्षेत्रात सायबर क्राईममधून होणारी ग्राहकांची
लूट आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता याची माहिती दिली. तर सायबर सेलच्या प्रमुख सपोनि
विरयाणी कदम यांनी उस्मानाबाद ग्रामीण व तुळजापूर ठाण्यातर्गत दाखल गुन्हें,
ग्राहकांची झालेली फसवणूक व त्यानंतर
तपासात समोर आलेले मुद्दे व घ्यावयाची दक्षता याची माहिती या कार्यशाळेत दिली.
शेवटी स्थागुशाचे पोनि डी.एम.शेख यांनी
उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेत प्रसारमाध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.