उस्मानाबाद,दि.25- भारतीय
मतदाराला संसदीय लोकशाहीने मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे, या अधिकाराचा वापर
जबाबदारीपूर्वक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महसूल भवन येथे
आयोजित विशेष कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी
नीलेश श्रीरंगी, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज
शिवाजी सानप,तहसिलदार सुजित नरहरे हे उपस्थित होते.
श्री गमे म्हणाले, संसदीय लोकशाहीचा मतदार
हा पाया आहे,आणि या मतदारांसाठी सुलभ सुविधा निर्माण करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
आपला देश हा तरुणांचा देश म्हणून जगभरात ओळखला जातो, या देशात 18 वर्षावरील
प्रत्येकास कोणत्याही प्रकाराचा भेदभाव न बाळगता मतदानाचा अधिकार मिळतो. यामुळेच
आपली लोकशाही जगातील सर्वात प्रबळ लोकशाही आहे, असे सांगून ते म्हणाले, आताची
मतदार यादी आता परिपूर्ण आहे,आणि मतदान पत्रिकाही सहजसुलभ आहे. त्यामुळे बोगस
मतदानालाही आळा बसला आहे. याशिवाय मतदान झाल्यानंतर आपण आपले मत निश्चित कोणाला
दिले याचा पुरावाही आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी आपला मतदानाचा
अधिकाराचा सदुपयोग करावा,असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांना भारताचे
मुख्य निवडणूक आयुक्त श्री ओमप्रकाश रावत यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त
जनतेला केलेल्या आवाहनाची चित्रफीत दाखविण्यात आली.
यानंतर जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी
मतदारांसाठी प्रतिज्ञा वाचून दाखविली व उपस्थित सर्वांनी ती प्रतिज्ञा घेतली. या
कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणूक ज्ञान स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या एकंडे
सरोज सहदेव,मुंढे यशकुमार अशोकराव, पठाण तनवीर,भागवत तेजश्री,विलास थोरात,तसेच
अपंग मतदार सायरत्ता जोहुरोद्यीन सय्सद,मोठे पद्मामाणी, पाटील ऋतुजा प्रकाश, रितेश
राजकुमार घुटे,प्रमोद सुभाष चौधरी,येताळ शाम काकासाहेब यांचाही सत्कार करण्यात
आला. या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी श्री गमे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व
पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले तसेच नवमतदारांचा, दिव्यांग मतदारांचा सत्कार
करण्यात आला. याशिवाय मतदार जनजागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी श्री.गमे यांचा विशेष
सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपजिल्हा निवडणूक
अधिकारी नीलेश श्रीरंगी यांनी केले. सूत्रसंचलन तहसिलदार सुजित नरहरे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने आज शहरात
महाविद्यालयीन तरुण-तरुणींना जनजागरण रॅली काढून उस्मानाबाद मधील जनतेला मतदान
करण्याविषयीचे आवाहनही केले.