उस्मानाबाद,
दि. 25:- परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे दिवाकर रावते यांच्या
अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी
झटून कामे करा, जिल्हयाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री
श्री. रावते यांनी येथे केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, सर्वश्री आमदार
मधुकर चव्हाण, राणा जगजितसिंह पाटील, विक्रम काळे, राहुल मोटे, नगराध्यक्ष मकरंद
राजेनिंबाळकर हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सर्वप्रथम दिनांक 30 ऑक्टोबर 2017 रोजी
झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तावर केलेल्या
कार्यवाहीच्या अनुपालन अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली, जिल्हा वार्षिक
योजना सन 2017-18 मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उप योजना व
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांचा माहे डिसेंबर 2017 अखेर झालेल्या
खर्चाचा आढावा पालकमंत्री श्री. रावते यांनी घेतला.
सन 2018-19 मधील जिल्हा वार्षिक सर्वसाधारण, अनुसूचित जाती
उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनानिहाय प्रारुप आराखड्यास
यावेळी मंजूरी देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2017-18 करीता एकूण 14
हजार 813 लक्ष रुपये मंजूर असून आजपर्यंत 5 हजार 02 लक्ष एवढा निधी खर्च
झाला आहे. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2017-18 साठी 7 हजार 79
लक्ष एवढा निधी मंजूर असून त्यापैकी 732.91 लक्ष एवढा निधी खर्च झाला आहे
तर जिल्हा वार्षिक आदिवासी उप योजना सन 2017-18 साठी 227.02 लक्ष एवढा
निधी जिल्ह्यासाठी मंजूर असून त्यापैकी 57.68 लक्ष निधी आतापर्यंत खर्च झाला
असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुधारक आडे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे
सभागृहासमोर सादर केली.
या सादरीकरणानंतर पालकमंत्री महोदयांनी सर्व विभागप्रमुखांस
मार्च 2018 पर्यंत निधी 100 टक्के खर्च करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
सन 2017-18 या वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या निधीला शासनाकडून 30
टक्के कपात करण्यात आलेली आहे, केलेली कपात सन 2018-19 च्या प्रारुप आराखडयात
वाढवून देण्यात यावी तसेच 50 टक्के वाढीव निधी देण्यात यावा असा ठराव सदस्य संजय मडके
यांनी यावेळी मांडला त्यास सदस्या सक्षेणा सलगर यांनी अनुमोदन दिले. या ठरावाचे
सर्व सदस्यांनी स्वागत केले.
जिल्ह्यात विविध विकासकामे हाती घेऊन चांगल्या
प्रकारच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, जिल्हयाला या वर्षी 30 टक्के
निधी कपातीला सामोरे जावे लागले आहे परंतु सन 2018-19 च्या जिल्हयाच्या आराखडयात
मागील वर्षाचा 30 टक्के वाढीव निधी व 50 टक्के जास्तीचा निधी प्राप्त होईल
यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे पालकमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.
या बैठकीनंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने बळीराजा चेतना
अभियानावरील लघुपटाचा मुहूर्त पालकमंत्री दिवाकर रावते आणि उपस्थित अन्य
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय मुद्रा बँक योजना आणि सामाजिक न्याय
विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठीच्या योजना या विषयावरील लघुपटाचे
प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर घडीपत्रिका आणि माहितीपुस्तिकेचेही प्रकाशन
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर लोकराज्य या शासकीय मुखपत्राच्या
प्रचार, प्रसिध्दी आणि वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी ज्यांनी विशेष काम केले आहे अशा
जिल्हा पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद उस्मानाबाद, जि.प.कें.आदर्श प्रा. शाळा
तडवळे (कसबे), विद्यानिकेतन हायस्कूल, येरमाळा, देवधानोरा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय,देवधानोरा,
जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कसबे तडवळे, महाराष्ट्र संत
विद्यालय,तेर, भाई नारायणराव लोमटे, माध्यमिक विद्यालय,भाटशिरपुरा, ता.कळंब या
कार्यालय/शाळा/ महाविद्यालय यांचा लोकराज्य कार्यालय, लोकराज्यशाळा व लोकराज्य
महाविद्यालय या पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याचबरोबर अण्णासाहेब सातपुते, सिध्दार्थ सावंत, राहुल
जगताप, भारत बळीराम लोंढे, महादेव भंडारे यांचा लोकराज्य दूत म्हणून विशेष सन्मान करण्यात
आला.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्या श्रीमती अर्चना राणाजगजिसिंह
पाटील, जयश्री रामा खंडागळे, उषा सुरेश
यरकळ, सुनिता गोविंद जाधव, सक्षेणा सिद्राम सलगर, छाया सुनिल काळे, महानंदा सुरेश
कोरे, संगीता हनमंत बोराडे, शोभा शामसुंदर तोरकडे, अनिता सुधीर अंबर, संयोगिता
संजय गाढवे, अंजली नितिन शेरखाने, सदस्य बाळासाहेब धनराज जाधवर, शेखर गोविंद घंटे,
प्रकाश मोतीराम चव्हाण, संदिप गौतम मडके, गौतम रामा लटके, सिध्दार्थ अंगुल बनसोडे,
प्रसाद माणिक जोशी, ज्ञानदेव गणपती राजगुरु तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा नियोजन
अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियेाजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, श्री. पवार
आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.