उस्मानाबाद, 22 :- राज्य
शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत
शेतकरी सभासदांनी शासनाने पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरुन अर्ज सादर केले आहेत. परंतु
बँकेने शासनाला सादर केलेल्या त्यांच्या माहितीशी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती जुळत
नसल्याने अशा शेतकऱ्यांची यादी शासनाने बँकेकडे पाठविलेली आहे ही यादी संबंधित
शाखास्तरावर प्रसिध्द केली आहे.
शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे
नाव अद्यापपर्यंत शासनाने कर्जमाफी मंजूर केलेल्या लाभार्थ्यांचे यादीमध्ये नाही,
अशा शेतकरी सभासदांनी संबंधित बँकेचे शाखेशी त्वरीत संपर्क साधून बँकेने प्रसिध्दी
केलेल्या यादीमध्ये आपले नाव असल्यास आवश्यक कागदपत्रासह योग्य माहिती बँकेच्या
शाखेला सादर करावी ज्या आधारे बँकेला पुढील कार्यवाही करता येईल.
कार्यवाही 8 दिवसाचे मुदतीत करणे आवश्यक असल्याने विनाविलंब
ही पूर्तता करुन शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा.
त्याचप्रमाणे 1 लाख पन्नास हजार पेक्षा जास्त कर्जबाकी
असलेल्या ज्या शेतकऱ्यांना शासनाने रु. 1.50 लाखाची कर्जमाफी मंजूर केलेली आहे,
अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडील उर्वरीत कर्जाचे रक्कमेचा भरणा करण्याबाबत बँकेने
पत्राद्वारे कळविलेले आहेच, या शेतकऱ्यांनीदेखील त्यांच्याकडील उर्वरीत रक्कमेचा
त्वरीत भरणा करुन शासनाच्या या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. जगदाळे व जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक विजय
घोणसे-पाटील यांनी केले आहे.
