Tuesday, 5 September 2017

"अवयवदान" विषयावरील जनजागृती विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा


उस्मानाबाद.दि.5:- विद्यार्थ्यांनी अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करुन त्याबाबत असणारे  गैरसमज दूर करुन  अवयदान करण्याबाबत प्रभावी मोहीम राबवावी, असे प्रतिपादन जिल्हा अवयवदान मोहीम समन्वयक डॉ.गजानन परळीकर यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने "दिशा करिअर ॲकॅडमी" येथे आयोजित ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात डॉ. परळीकर बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, दिशा करिअर ॲकडमीचे संचालक प्राध्यापक श्री. बाळकृष्ण उंबरे, प्रा. सिध्देश्वर मते आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना डॉ. परळीकर म्हणाले की, जनजागृतीच्या अभावी अवयवदान करणाऱ्यांची संख्या आज समाजात खूप कमी आहे, त्यामुळे अनेक गरजवंत उपेक्षित आहेत.त्यासाठी युवा शक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात अवयवदानाच्या बाबतीत जनजागृती करुन अवदानाची चळवळ बनवली पाहीजे. उपस्थित विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
             जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यावेळी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच सखोल ज्ञान मिळावे म्हणून ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करिअर ॲकडमीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र “लोकराज्य” हे मासिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असून या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनाची माहिती मिळते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी  लोकराज्य मासिकाचे वार्षिक  वर्गणीदार होण्याचे आवाहन यावेळी केले.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अनेक कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात यामध्ये शासनाच्या  विविध योजना, यशकथा, वेचक वेधक, फस्ट पर्सन, नौकरी मार्गदर्शन, महाभ्रमंती,  दिलखुलास, जय महाराष्ट्र,छायाचित्र दालन, चित्रफीत दालन आदींची "महान्यूज" या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सविस्तर व विश्वासार्ह माहिती दिली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महान्यूज ही पाहिले पाहिजे असे सांगितले. 
या "संवाद पर्व" कार्यक्रमात श्री.सानप यांनी स्पर्धा परिक्षेतील मुलाखत व व्यक्तिमत्व विकास या विषयावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी केले.
नगरपालिका प्रशासनाचे व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी विद्यार्थ्यांना नगरपालिका प्रशासन कशा प्रकारे काम करते, नागरी सुविधा, नगरपालिकेत प्रशासन अधिकारी निवड होते, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नगरपालिकेत कुठली कुठली प्रशासनाचे पदे असतात या विषयी माहिती दिली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी  या कार्यक्रमात सक्रिय होवून आपल्या अडचणी व शंका उपस्थित करुन त्याचे मान्यवरांकडून निरसन करुन घेत चर्चात्मक संवाद साधला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर बंडगर  यांनी केले तर आभार संदीप गायकवाड  यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. 

Monday, 4 September 2017

बहुरुपी कलावंतांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी कार्य करणार समाजकल्याण अधिकारी श्री. मिनगीरे


उस्मानाबाद, दि.04:- बहुरुपी कलाकारांनी संपूर्ण आयुष्यभर विविध कलांद्वारे समाजाला आनंद दिला आहे, शासनाच्या वतीने समाजकल्याण विभागांतर्गत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशा प्रकारचे कार्य पुढील काळात करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचचे समाज कल्याण अधिकारी श्री. मिनगीरे यांनी दिली.  
            जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील हंगरगा वस्ती येथे “संवाद पर्व” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    
यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी गोरे, उपसरपंच मधुकर भंडारे, नागनाथ लोंढे, राजाभाऊ घोडके, डॉ. किरण पवार, डॉ. कुतवाळे यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.    
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, सांस्कृतिक, कला, वाड्मय क्षेत्रात  बहुरुपी कलाकारांची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. ज्या स्त्री किंवा पुरुष कलावंताचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांना शासनाच्या वतीने विशेष सहाय्य केले जाते. या ठिकाणच्या जास्तीत-जास्त कलावंतांना मानधन देण्यासाठी मी प्रयत्न करीन तसेच शासनाच्या वतीने असणाऱ्या योजनांचा लाभ देण्याचाही प्रयत्न करीन. तसेच “संवादपर्व” हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.   
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यावेळी बोलताना म्हणाल्या की, कलावंताच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येतो त्यासाठी या भागातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज एकत्रीतरित्या भरुन सादर करावेत आणि या भागातील एकही लहान मूल शिक्षणापासुन वंचित राहायला नको यासाठी आवश्यक ती मदत करण्यास उत्सुक असल्याचे सांगीतले.
त्यानंतर शाहीर राणा जोगदंड, माऊली विभूते, सिध्दराम विभूते, निलम विभूते यांनी समाजप्रबोधनपर गीत सादर केली तर बहुरुपी कलावंतांनी रामायणाचे सादरीकरण कलेच्या माध्यमातून सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी हंगरगा वस्तीच्या गणेश मंडळाचे पदाधिकारी, बहरुपी कलावंत, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्पर्धा परिक्षेसाठी इतिहासाचा अभ्यास करताना संदर्भग्रंथांचेही वाचन करा पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे


उस्मानाबाद, दि.03:- स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना इतिहास या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त संदर्भग्रंथांचेही वाचन करावे, असे प्रतिपादन पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे  यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने मौजे ढोकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, उदगीर, जिल्हा लातूर आणि जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने “संवाद पर्व” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, ढोकी येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश बप्पा देशमुख, राहुल पाटील, राहुल जगताप व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.   
जयराज खोचरे यांनी सांगितले की, इतिहास या विषयाचा अभ्यास एखाद्या चांगल्या संदर्भ ग्रंथातून, क्रमिक पुस्तकातूनच सुरुवात करा, जेणेकरुन सर्व प्रश्न प्रकारांनुसार तुम्ही विचार कराल आणि कमी वेळेत त्या संबंधीत विषयात पारंगत व्हाल. स्पर्धा परीक्षेचा फक्त अभ्यास करु नका तर तो आपल्या जगण्याचा एक भाग बनवा. जास्त संदर्भग्रंथ वाचण्यापेक्षा प्रत्येक घटकावर एक किंवा दोन संदर्भग्रंथांचे वाचन करा, सध्याच्या परीक्षेचे स्वरुप गतिशील झाले आहे त्यामुळे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, वाचन किंवा अभ्यास विश्लेषणात्मक आणि सुसंगत असणे गरजेचे आहे, प्रत्येक गोष्टीत अभ्यास शोधा तरच तुमच्यामध्ये भावी अधिकारी होण्याचे गुण तयार होतील.
तसेच शासन विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम राबवित आहे, याचाच एक भाग म्हणून “संवादपर्व” हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.   
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना अनेक शंकाकुशंकानी मन वेढलेलं असतं, त्यामुळे सर्वप्रथम या शंकाकुशंका, संशयकल्लोळ मनातून बाजूला करा, ज्या पदासाठी आपण तयारी करतोय त्याचा अभ्यासक्रम काय आहे, बरेच विद्यार्थी परिक्षा पास होवून देखील मुलाखतीत पात्र ठरीत नाहीत, त्यामुळे मुलाखतीची तयारी आपण कशा पध्दतीने केली पाहिजे, मुळात आयुष्य हे
सरल, सुगम कधीही नसतं. अनंत अडचणी, अडथळे, विवंचना यातून मार्ग शोधावा लागतो. त्या
आयुष्याच्या अडथळ्यांच्या तुलनेत हे अडथळे अगदी किरकोळ आहेत. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा, आज ना उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.  

यावेळी ढोकी गावचे सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.