Thursday, 18 May 2017

विधी साक्षरता शिबिरे घेण्यासाठी अशासकीय संस्थेने प्रस्ताव सादर करावेत


उस्मानाबाद.दि.18:- जिल्हयात विधी साक्षरता शिबिरे घेण्यासाठी अशासकीय संस्थेकडून अधिस्विकृती आणि सहायक अनुदानाकरीता सन 2017-18 या वित्तीय वर्षाकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील इच्छूक अशासकीय संस्थांनी प्रस्ताव दि.30 मे 2017 पर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय,उस्मानाबाद येथे सादर करावेत,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी केले आहे.
            जिल्हयात सन 2017-18 मध्ये विधी साक्षरता शिबिरे घेण्यासाठी एका अशासकीय संस्थेचा प्रस्ताव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या शिफारशीने महाराष्ट्र राज्य विधी सेवा पा्रधिकरण, मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.

             प्रस्तावासोबत सहायक अनुदान व संपूर्ण भरलेला अधिस्विकृती फॉर्म असावा, अशासकीय संस्था निती आयोग पोर्टलवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे असाधारण ओळख (Unique) असणे आवश्यक आहे, अशासकीय संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अशासकीय संस्थेचा स्थापना  लेख व अधिसंघ नियमावलीची प्रत,मागील तीन वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल,संस्थेचा मागील आर्थिक वर्षाचा अहवाल, खर्चाचे अंदाजपत्रक, अशासकीय संस्थेस विधी साक्षरता शिबिरामध्ये काम करीत असल्याचा अनुभव कागदपत्रे, सन 2017-18 मध्ये जिल्हयात घेण्यात येणाऱ्या शिबिराचे ठिकाण आदी कागदपत्रासह तीन प्रतीमध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.विधी सेवा प्राधिकरणाकडून विधी साक्षरता शिबिर घेण्यासाठी प्रत्येक वर्षी अशासकीय संस्थेस अनुदान देण्यात येते, अधिक माहिती, प्रस्तावासंबंधी नियमावलीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्याशी संपर्क साधावा, असे ही कळविण्यात आले आहे.

Tuesday, 16 May 2017

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ उस्मानाबाद शाखेची बैठक संपन्न



उस्मानाबाद.दि.16:- पगार,भत्ते,बढत्या,आदी रास्त मागण्यांचा पाठपुरावा करतानाच, बहुसंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाजही तेवढयाच तत्परतेने करतात.तरीही, अधिकारी बांधवांबाबत जनमाणसात जी नकारात्मक भावना दिसून येते, ती विचारात घेता, आपली कार्यपध्दती आणि कार्यशैलीचे आत्मपरिक्षण करण्याची गरज महासंघाने स्वत:हून लक्षात घेतलेली आहे. 'कार्यसंस्कृती' अभियानाचे पुढचे पाऊल म्हणून, राज्याच्या विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासनासाठी महासंघाने अभ्यासपूर्वक 'पगारात भागवा' हे 'जनताभिमुख' अभियान सुरु केले आहे.
            या अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ उस्मानाबाद शाखेची बैठक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या दालनात आज संपन्न झाली.यावेळी महासंघाचे विभागीय सरचिटणीस तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, राज्य संघटक मधुकर डोईफोडे, विभागीय उपाध्यक्ष बाळासाहेब शेलार,कार्याध्यक्ष मनोज शिवाजी सानप,सचिव डॉ.शितलकुमार मुकणे हे उपस्थित होते.
            गुरुवार दि.18 मे रोजी सकाळी 10.30 वाजता महासंघाचे मुख्य सल्लागार श्री.ग.दि.कुलथे यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्मानाबाद जिल्हयातील वर्ग 1 व 2 राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा  नियोजन समिती सभागृहात होणार आहे.या बैठकीच्या पूर्व तयारीकरिता आज ही बैठक संपन्न झाली. दि.18 मे रोजी होणाऱ्या बैठकीला अधिकाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही  यावेळी करण्यात आले आहे.
            या बैठकीत महासंघाच्या सकारात्मक व विधायक कार्याची दखल घेऊन, राज्य शासनाने महासंघास बांद्रा (पूर्व) येथे 1381 चौ.मी. आकाराचा भूखंड, महासंघाचे कल्याणकेंद्र बांधण्यासाठी दिला आहे.त्या ठिकाणी राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी हे मुंबई येथे शासकीय कामकाजानिमित्त आल्यानंतर त्यांच्या निवासाची व विश्रामाची सोय करण्याकरिता तसेच, महासंघाच्या सदस्यांसाठी विविध प्रशिक्षण व मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करण्याकरिता ' कल्याण केंद्र '  उभारण्याचा महासंघाचा मनोदय आहे, या विषयावरही या बैठकीत  विस्तृत चर्चा होणार आहे.
तरी जिल्हयातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या उस्मानाबाद शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

गावनिहाय लाभ प्रदान करण्यात आलेल्या त्रस्त कुटुंबप्रमुखाची यादी पाहण्यास उपलब्ध



उस्मानाबाद.दि.16:- बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणे बाबत महसूल गावातील ग्रामस्तरीय समितीस दिलेल्या वार्षिक रुपये एक लाख रक्कमेच्या खर्चाबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्यानुसार त्रस्त कुटुंबास पेरणी, बियाणे करीता, गरीब कुटुंबास आकस्मिक खर्चासाठी व 2-3 महिन्याकरिता बिनव्याजी कर्ज इत्यादीकरीता वैयक्तिक लाभ प्रदानाच्या बाबीसाठी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व महसूली गावांमधील लाभ प्रदान करण्यात आलेल्या त्रस्त कुटुंबप्रमुखांच्या नावाची यादी पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे,असे ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांच्याकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविण्यात आले आहे.