Tuesday, 16 May 2017

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ उस्मानाबाद शाखेची बैठक संपन्न



उस्मानाबाद.दि.16:- पगार,भत्ते,बढत्या,आदी रास्त मागण्यांचा पाठपुरावा करतानाच, बहुसंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाजही तेवढयाच तत्परतेने करतात.तरीही, अधिकारी बांधवांबाबत जनमाणसात जी नकारात्मक भावना दिसून येते, ती विचारात घेता, आपली कार्यपध्दती आणि कार्यशैलीचे आत्मपरिक्षण करण्याची गरज महासंघाने स्वत:हून लक्षात घेतलेली आहे. 'कार्यसंस्कृती' अभियानाचे पुढचे पाऊल म्हणून, राज्याच्या विकासासाठी व भ्रष्टाचारमुक्त शासन-प्रशासनासाठी महासंघाने अभ्यासपूर्वक 'पगारात भागवा' हे 'जनताभिमुख' अभियान सुरु केले आहे.
            या अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ उस्मानाबाद शाखेची बैठक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या दालनात आज संपन्न झाली.यावेळी महासंघाचे विभागीय सरचिटणीस तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, राज्य संघटक मधुकर डोईफोडे, विभागीय उपाध्यक्ष बाळासाहेब शेलार,कार्याध्यक्ष मनोज शिवाजी सानप,सचिव डॉ.शितलकुमार मुकणे हे उपस्थित होते.
            गुरुवार दि.18 मे रोजी सकाळी 10.30 वाजता महासंघाचे मुख्य सल्लागार श्री.ग.दि.कुलथे यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्मानाबाद जिल्हयातील वर्ग 1 व 2 राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा  नियोजन समिती सभागृहात होणार आहे.या बैठकीच्या पूर्व तयारीकरिता आज ही बैठक संपन्न झाली. दि.18 मे रोजी होणाऱ्या बैठकीला अधिकाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही  यावेळी करण्यात आले आहे.
            या बैठकीत महासंघाच्या सकारात्मक व विधायक कार्याची दखल घेऊन, राज्य शासनाने महासंघास बांद्रा (पूर्व) येथे 1381 चौ.मी. आकाराचा भूखंड, महासंघाचे कल्याणकेंद्र बांधण्यासाठी दिला आहे.त्या ठिकाणी राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी हे मुंबई येथे शासकीय कामकाजानिमित्त आल्यानंतर त्यांच्या निवासाची व विश्रामाची सोय करण्याकरिता तसेच, महासंघाच्या सदस्यांसाठी विविध प्रशिक्षण व मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करण्याकरिता ' कल्याण केंद्र '  उभारण्याचा महासंघाचा मनोदय आहे, या विषयावरही या बैठकीत  विस्तृत चर्चा होणार आहे.
तरी जिल्हयातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या उस्मानाबाद शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.