Thursday, 18 May 2017

राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हा / तालुकास्तरीय प्रशिक्षण दिनांकात बदल


उस्मानाबाद.दि.18:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात येणा-या शिक्षक प्रशिक्षणासाठी ज्या माध्यमिक शिक्षकांची सेवा 12 वर्ष पूर्ण व 24 वर्ष पूर्ण झालेली आहे तसेच जे वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणास पात्र आहेत, अशा सर्व अर्हता प्राप्त शिक्षकांसाठी दिनांक 01 जून 2017 ते 10 जून 2017 या कालावधीत वरिष्ठश्रेणी प्रशिक्षण तर दिनांक 01 जून 2017 ते 10 जून 2017 या कालावधीत निवडश्रेणी प्रशिक्षण विभागीय मंडळामार्फत आयोजित केलेले होते.

           सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन करणा-या तज्ज्ञांचे विभागस्तराचे प्रशिक्षण दिनांक 28 ते 30 मे 2017 या कालावधीत विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेले आहे. तर विभागास्तराच्या तज्ज्ञांना मार्गदर्शन करणा-या प्रमुख मार्गदर्शक तज्ज्ञांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण राज्यमंडळामार्फत दिनांक 19 ते 21 मे 2017 या कालावधीत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, कुसगांव बु. लोणावळा, ता. मावळ जि. पुणे येथे आयोजित केलेले आहे. माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणात प्रशासकीय कारणास्तव प्रशिक्षणाचे आयोजनात काही तांत्रिक बदल होत असल्यामुळे उपरोक्त कालावधीत आयोजीत केलेली राज्यस्तरीय , विभागस्तरीय तसेच प्रत्यक्ष जिल्हा / तालुकास्तरीय प्रशिक्षणे उपरोक्त दिनांकास होणार नाहीत याची नोंद घ्यावी. माध्यमिक वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणाचा सुधारित नियोजनाचा कार्यक्रम यथासमय जाहीर करण्यात येईल. मात्र उच्च माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणे ठरल्याप्रमाणे नियोजित कालावधीत होतील, याची नोंद घ्यावी असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.