Tuesday, 20 December 2016

अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेची आवेदनपत्र स्विकारण्याबाबत


        उस्मानाबाद , दि. 20 :- मंडळ विनियम 1977 नियम क्र. 46 अन्वये  मार्च 2017 मध्ये  होणाऱ्या  माध्यमिक शालान्त  प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेस  नियमित  प्रवष्ठि होणाऱ्या  विद्यार्थ्यांची  नियमित, पुनर्परीक्षार्थी  , नाव  नोंदणी प्रमाणपत्र  प्राप्त झालेले  खाजगी  विद्यार्थी , श्रेणी सुधार  योजनेंतर्गत  व तुरळक  विषयासी  परीक्षेस  प्रविष्ठ  होणाऱ्या  व विलंब  शुल्कासह  ऑनलाईन  परीक्षेची  आवेदनपत्र स्विकारण्याची  मुदत संपल्यानंतरही श्रेणी/ तोंडी / प्रात्यक्षिक  परीक्षा सुरु होण्यापूर्वी 33 दिवसांचा  कालावधी वगळून त्या अगोदर  प्रतिदिन  रु. 50/- प्रमाणे  अतिविलंब  शुल्क ,  अतिविलंब  शुल्काच्या  निर्धारित  तारखेनंतर  लेखी किंवा  प्रात्यक्षिक  परीक्षेच्या अगोदर जी परीक्षा  सुरु होणार आहे , त्यातील  सुरुवातीच्या  15 दिवसांपर्यंत  प्रती विद्यार्थी  प्रतिदिन  रु. 100/- व तद्नंतरच्या  15 दिवसांकरिता  व परीक्षेच्या आदल्या  दिवसापर्यंत  रु. 200/- प्रमाणे   अतिविशेष  अतिविलंब  शुल्क आकारुन आवेदनपत्र  स्विकारण्याच्या  तारखा पुढीलप्रमाणे  निश्चित करण्यात आल्या आहेत .
अतिविलंब शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2016 ते 15 जानेवारी 2017, विशेष अतिविलंब शुल्क भरण्यासाठी अंतिम  दिनांक 16  ते 30 जानेवारी 2017, अति‍ विशेष  अतिविलंब शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2017 असा राहील . दिनांक 13 डिसेंबर 2016 नंतर  प्राप्त होणारी  आवेदनपत्रे ही शाळांनी  स्वहस्ताक्षरात  भरुन तयावर विद्यार्थी  व मुख्याध्यापक  यांच्या स्वाक्षरीसह  मंडळास  सादर  करण्यात याव्यात. हे आवेदनपत्र  मंडळाच्या संकेतस्तळावर उपलब्ध आहे .

असे  विभागीय सचिव , लातूर विभागीय मंडळ  लातूर यांनी कळविले आहे .

सर्वरोग निदान शिबिराचा 3 हजार 500 रूग्णांनी घेतला लाभ


उस्मानाबाद, दि. 20:- बळीराजा चेतना अभियानांतर्गत केशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार, 20 डिसेंबर रोजी सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात केशेगाव व परिसरातील साडेतीन हजार रूग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, तेरणा वैद्यकिय महाविद्यालय व आशा सामाजिक संस्था, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन लोमटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
तेरणा वैद्यकिय महाविद्यालयातील 10 तज्ञांच्या पथकाने सर्व रूग्णांची तपासणी केली. रूग्णांना शिबिरस्थळी प्रयोगशाळा, औषधोपचाराची सोय करण्यात आली होती. शाळेतील विद्यार्थ्यांचीही यावेळी आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रदर्शन पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. दिवसभरात साडेतीन हजार रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. दरम्यान शिबिरास आरोग्य सभापती सुधाकर गुंड यांनीही भेट देवून पाहणी केली. 
या शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्या डॉ. अर्चना पाटील यांनी पुढाकार घेतला होता. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल चव्हाण, डॉ. दीपक मेंढेकर, डॉ. सरोज आडे, विजय माकुवार, डॉ. राजकुमार तळवेकर, डॉ. विजय द्विदी, डॉ. शैलेंद्र सिंह, डॉ. स्वप्नील गोहोकार, स्वप्नील गणेशपुरे, डॉ. हेमंत येवगे, डॉ. सिग्नास मेहता, डॉ. प्रियंका उरणकर, डॉ. नेहल दोडीया आदींनी परिश्रम घेतले.

Monday, 19 December 2016

युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून देशाचा विकास घडवावा -आ.सुजितसिंह ठाकूर


उस्मानाबाद,दि.19:- युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून काम केले तर व्यक्तिमत्व विकासासोबतच देशाचाही विकास घडून येईल,असा विश्वास भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.
      नेहरु युवा केंद्र उस्मानाबादमार्फत युवा नेतृत्व व सामाजिक विकास कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री दत्ताभाऊ कुलकर्णी,श्री नितीन काळे,श्री सतीश देशमुख, अॅड  खंडेराव  चौरे  प्रमुख  वक्ते श्री अशोक  चव्हाण (जहागीरदारवाडी)  हे  उपस्थित  होते.
       नेहरु युवा केंद्राच्या वतीने पाच दिवसाच्या या शिबिराचा समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नेहरु युवा केंद्राचे लेखापाल श्री रामचंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनाची भूमिका मांडली, प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर सहभागींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
       आमदार सुजितसिंह ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, नेहरु युवा केंद्राची चळवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी चळवळ यामधुन युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांना दिशा देण्यास,युवकांमध्ये देशभक्ती, देशप्रेम व सामाजिक जाणीव निर्माण करुन देण्याचे काम  नेहरु युवाकेंद्रामार्फत केले. या केंद्राच्या स्थापनेपासून म्हणजे 1989 पासून सतत संपर्कामधून असून सर्व  उपक्रम, शिबीर प्रशिक्षणामध्ये मी सहभाग नोंदविला असून मला व माझ्या युवा मंडळाला नेहरु युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाला असून, माझ्या या सर्व जडण-घडणीमध्ये  नेहरु  युवा  केंद्राचे  स्थान  खूप  मोठे  आहे.
     आपण जर सातत्याने सामाजिक विकासाच्या चळवळीत कार्यरत राहिले तर एक निश्चितच एक दिवस आपण आपले ध्येय प्राप्त केल्याशिवाय राहात नाही, युवकांना त्यांनी असे अवाहन  केले की, तुम्ही या देशविकासाच्या चळवळीमध्ये स्वत:ला झोकून घ्या ,जेणेकरुन समाजाची प्रगती होऊन देश महासत्ता बनण्यासाठीच्या मार्गात आपले योगदान दिल्याचे समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही.
      ते पुढे बोलताना म्हणाले की, युवकांनी सतर्क आणि क्रियाशील राहिले पाहिजे, युवक हा या देशाचा आधारस्तंभ असून, युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर राहिले पाहिजे. सशक्त युवक हा देशास प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे युवकांनी  डोळसपणे  आपली  जडण-घडण  केली  पाहिजे.
      या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एन.वाय.व्ही रुपेश उमरदंड यांनी तर आभार प्रदर्शन  प्रतिभा  जाधव  हीने  केले.
            कार्यक्रमासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातील युवा मोठया संख्येने उपस्थित होते.
****