Thursday, 15 December 2016

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा 15 हजार रुग्णांना लाभ





उस्मानाबाद,दि.15:- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक प्रकारच्या आजारातून रुग्णांना लाभ मिळाला आहे.आतापर्यंत 15 हजार रुग्णांना याचा लाभ झाला आहे, अशी माहिती राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. गुरूराज थट्टेकर यांनी दिली आहे.
            राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि 21 नोव्हेंबर 2013 पासून सुरु करण्यात आली आहे . योजनेला दि. 20 नोव्हेंबर 2016 रोजी 3 वर्षे पूर्ण होत आहेत.या योजनेत 971 अतिगंभीर व अतिविशिष्ट प्रकारच्या रुग्णांवर या योजनेतून उपचार केले जातात.राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये नवीन शासन निर्णयानुसार शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबाचा समावेश यात करण्यात आला आहे .उस्मानाबाद जिल्ह्यातून व शहरातून या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या रुग्णालयातून लाभ देण्यात येतो. आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील 971अतिगंभीर  आजारी रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत . जिल्ह्यातील 5 रुग्णालयांतून  3 हजार 261 रुग्णांवर उपचार करुन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
या योजनेतून दि.21 नोव्हेंबर 2013 ते 14 डिसेंबर 2016 पर्यत 15 हजार 184 रुग्णांवर विविध प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्ह्यातून दि. 10 ऑक्टोबर 2015 ते 30 नोव्हेंबर 2016 या दरम्यान उस्मानाबाद 870, कळंब 553, तुळजापूर 388, परंडा 357, उमरगा 316, भूम 303, वाशी 269, लोहारा 139  अशा एकूण 3 हजार 195 रुग्णांवर उपचार करुन शस्त्रक्रिया  करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे संबंधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत - रेशन कार्ड (पिवळे, केशरी, अन्त्योदय, अन्नपूर्णा),पांढरे रेशनकार्ड व 7/12 उतारा (शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी), ओळखपत्र – (आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँक पासबूक व इतर शासनमान्य ओळखपत्र), लहान मुलांसाठी (6 वर्ष वयापेक्षा कमी) जन्माचा दाखला,आई किंवा वडिलांचे ओळखपत्र, फाटलेले रेशन कार्ड किंवा रेशन कार्डमध्ये त्रुटी असतील तर संबंधित तहसिलदारांचे प्रमाणपत्र किंवा दुय्यम शिधापत्रिका  असणे आवश्यक आहे .
या योजनेसाठी जिल्हयातील जिल्हा रुग्णालय- उस्मानाबाद, सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उस्मानाबाद, सुविधा हॉस्पिटल- उस्मानाबाद, निरामय हॉस्पिटल-उस्मानाबाद व चिंचोळी हॉस्पिटल, उमरगा अंगीकृत रुग्णालयाचा समावेश असून या योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 155388/18002332200 वर संपर्क साधावा, असे आवाहन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. गुरूराज थट्टेकर यांनी केले आहे.
***
वृत्त क्र.959
कडबाकुट्टी  यंत्र / मुरघास युनिट
योजनेसाठी 17 डिसेंबर 2016 रोजी बैठक
उस्मानाबाद,दि.15:- राष्ट्रीय पशुधन अभियान  योजना सन 2016-17 अंतर्गत  विद्युतचलित  कडबाकुट्टी  यंत्राच्या  वापरास प्रोत्साहन  आणि मुरघास  तयार करण्याचे युनिट  स्थापन  करणे या योजनांच्या  अंमलबजावणीसाठी  जिल्हा पशुधन  अभियान  समितीअंतर्गत  गठीत  निवड समितीमार्फत  लाभार्थींची  निवड  करण्यासाठी  दि. 17 डिसेंबर 2016 रोजी जिल्हा पशुसंवर्धन  उपआयुक्त कार्यालय  , आनंद नगर  उस्मानाबाद  येथे दुपारी 12.30 वाजता  बैठक आयोजित  करण्यात आली आहे .
या निवड प्रक्रियेसाठी  अर्जाच्या  स्वरुपात  प्रस्ताव  सादर केलेल्या लाभार्थ्यांपैकी  योजनेचा लाभ  घेण्यासाठी पात्र  ठरलेल्या  लाभार्थींनी जास्तीत जास्त  संख्येने  हजर राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस.एस. भोसले यांनी केले आहे .
**
वृत्त क्र .960
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद  निवडणूक 2016
18 डिसेंबर 2016 रोजी होणार मतदान
            उस्मानाबाद , दि. 15:-   जिल्ह्यात महाराष्ट्र वैद्यकीय  परिषद  निवडणूक -2016 ची निवडणूक  दिनांक 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8.00 ते 5.00 या वेळेत  घेण्यात येणार   असून उस्मानाबाद येथे दोन  मतदान केंद्रे ठेवण्यात  आली आहेत .  मतदान  केंद्र क्रमांक -1 निवासी  वैद्यकीय  अधिकारी , (बाह्य संपर्क )  जिल्हा सामान्य  रुग्णालय , उस्मानाबाद  आणि मतदान केंद्र  क्रमांक -2  आयुष विभाग , जिल्हा सामान्य रुग्णालय,उस्मानाबाद.
जिल्ह्यातील वैद्यकीय परिषदेकडे नोंद झालेल्या  व्यावसायिक  एमबीबीएस डॉक्टर्स मतदारांनी  या दिवशी मतदान करावे ,असे आवाहन  उप जिल्हा निवडणूक अधिकारी , उस्मानाबाद यांनी केले आहे . *****

वृत्त क्र . 961
पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाबाबत 
उपाययोजनेकरिता फवारणी करण्याचे आवाहन
            उस्मानाबाद , दि. 15:-  राष्ट्रीय कृषी  विकास  योजनेंतर्गत  भूम उपविभागात  आंबा  फळपिकांवरील  कीडरोग सर्वेक्षण , सल्ला व  व्यवस्थापन प्रकल्प सन 2016-17 राबविण्यात येत असून या अंतर्गत  वाशी , कळंब  व परंडा तालुक्यात  प्रत्येकी  एका कीड सर्वेक्षकामार्फत तसेच उपविभागातील  चारही तालुक्यांत कीड नियंत्रकांमार्फत  आंबा  पिकावरील  प्रमुख किडे तुडतुडे , फूलकिडे तसेच  भुरी  व बुरशीजन्य  करपा या रोगांसाठी  सर्वेक्षण  करण्यात येत आहे . त्या माहितीच्या आधारे  विश्लेषण  करुन दर सोमवारी व गुरुवारी   पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाबाबत  उपाययोजना  सूचविण्यात येत आहेत .  याबाबतची अधिक माहिती www.ncipm.org.in  या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
             दिनांक 5 डिसेंबर 2016 रोजीच्या प्राप्त  सर्वसाधारण  कीडरोग  सल्ल्यानुसार , आंबा  फळ‍पिकांवर  तुडतुडे  या कीडीचा  प्रादूर्भाव  दिसून  येण्याची शक्यता  आहे त्यासाठी  डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के (प्रवाही) 9 मिलिलीटर किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के (प्रवाही) 15 मिलिलीटर प्रति 10 लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी, असे आवाहन  उपविभागीय कृषी अधिकारी , भूम यांनी केले आहे .
****


वृत्त क्र . 962

उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाची
विभागीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी
            उस्मानाबाद.दि.15:- संचालनालय  लेखा  व  कोषागारे  कर्मचारी कल्याण  समितीमार्फत  हिंगोली येथे दि. 10 व 11 डिसेंबर 2016 रोजी  संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात उस्मानाबाद  येथील जिल्हा कोषागार कार्यालयाने विविध स्पर्धा प्रकारात  घवघवीत  यश  संपादन केले  आहे.  क्रिकेट व व्हॉलीबॉल  स्पर्धेत  उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रथम  क्रमांक  मिळविला आहे.
            वैयक्तिक  क्रीडा  प्रकारात देखील  कोषागार  कार्यालयाने यश  संपादन  केले आहे. यात 100 मीटर धावणे या पुरूष गटाच्या स्पर्धेत श्री. एस. आय. मोहमद व 200 मीटर धावणे या पुरूष गटाच्या स्पर्धेत श्री. एस. के. सरनाईक यांनी द्वितीय क्रमांक,100 मीटर रिले महिला गटात श्रीमती एस.जी. घोगरे,श्रीमती ए.एन. नरवाडे,श्रीमती  के.बी. गायकवाड, श्रीमती ए.एच. पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला, गोळा फेक पुरूष गटात श्री. व्ही. आर. पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविला , थाळी फेक पुरूष गटात व्हि. आर. पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविला.,कॅरम एकेरी पुरूष गटात श्री. सी.व्ही. कांबळे यांनी द्वितीय, कॅरम दुहेरी पुरूष गटात श्री. सी.व्ही. कांबळे, के.डी. मगर यांनी व्दितीय क्रमांक पटकविला, कॅरेम दुहेरी महिला गटात श्रीमती  एम.व्ही. कुलकर्णी व श्रीमती के. बी. गायकवाउ यांनी द्वितीय क्रमांक , टेबल टेनिस एकेरी पुरूष  गटात श्री. एन.बी. बारकुल यांनी प्रथम क्रमांक, बॅडमिंटन एकेरी पुरूष गटात एस. मोहमद यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
            उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाने  मिळविलेल्या या यशाबद्दल जिल्हा कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार , अप्पर कोषागार अधिकारी श्री. अप्पासाहेब पवार  व  त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे  जिल्ह्यातील अधिकारी – कर्मचारी तसेच  नागरिकांकडूनही अभिनंदन करण्यात आले आहे.****


Wednesday, 14 December 2016

जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आले कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण


जिल्ह्यातील  सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आले
कॅशलेस  व्यवहाराचे प्रशिक्षण
 उस्मानाबाद.दि.14:- देशात 500 आणि 1000 रुपयांच्या   नोटांचे निश्चलनीकरण केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था अंगिकारावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. पंतप्रधानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या एकूण 343 प्राथमिक शाळा व 117 उच्च माध्यमिक शाळेतील 5 ते 12 वी पर्यंतच्या एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना  ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक कौशल्य  विकास दिनी ई- बँकिंग, मोबाईल बँकिंग,  पेटीएम, एटीएम इत्यादींमार्फत कॅशलेस  व्यवहार कसा करायचा याबाबत विविध बँकांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रशिक्षण  दिले जात असल्याचे  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या या दोन्ही प्रशासन प्रमुखांनी रोखीने होणारे व्यवहाराचे प्रमाण कमी करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी आर्थिक व्यवहारात जास्तीत जास्त कॅशलेस पद्धतीचा वापर करावा. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये बँकेच्या शाखेची सुविधा नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेचे व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीकोनातून बँकमित्रांची नियुक्ती करण्यात येईल,सर्वप्रथम सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांच्या बँक खात्यांची माहिती घेतली जाईल ज्या पाल्यांच्या पालकांचे बँकेत खाते नसतील अशांची खाती बँकेत उघडली जातील . प्रत्येक शनिवारी म्हणजेच कौशल्य विकास दिनी बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने शिक्षक ई-लर्निंगच्या माध्यमातून नेटबँकींग, मोबाईल बँकींग यासारख्या डिजिटल पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना सांगतील , ज्यामध्ये नोटांची निर्मिती कशी झाली ,  नोटांचा इतिहास , प्लॅस्टिक मनी ही संकल्पना , एटीएम कार्डबाबत माहिती एटीएम कार्डची  काळजी कशी घ्यायची ,  एटीएम कार्ड वापरण्याची पध्दत, एटीएम कार्डचे फायदे इत्यादींबाबतची माहिती इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना  जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहे . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चलनीकरणाबाबतची भीती निघून जाईल तसेच  कॅशलेस पध्दतीबाबत जनजागृती होईल . याशिवाय  प्रत्येक विद्यार्थी शाळेत दिलेल्या प्रशिक्षणाची माहिती आपल्या पालकांना देतील त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधील ही निश्चलनीकरणाची व कॅशलेस व्यवहारांबाबतची भीती दूर होण्यास मदत होईल.
या कार्यशाळेत शिक्षणाधिकारी (प्राथ) सचिन जगताप ,  शिक्षणाधिकारी (माध्य)ए.एम. उकिरडे, जिल्हा माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप, जिल्हा आग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर ,  स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. धनंजय दामले,  उपशिक्षणाधिकारी , गट शिक्षणाधिकारी आणि सर्व शाळांचे  मुख्याध्यापक   आदी उपस्थित होते .
सर्व शाळांच्या  मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणानंतर शिक्षकांना आणि  शिक्षकांकडून  विद्यार्थ्यांना  व पालकांना असा  हा कॅशलेस व्यवहारासंबंधीचा प्रशिक्षण उपक्रम  राबविला जाणार आहे .
****



वृत्त क्र.952
पोलीस पाटील पदांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ
            उस्मानाबाद.दि.14:- उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद अंतर्गत उस्मानाबाद व तुळजापूर या तालुक्यातील पोलीस पाटलांची 131 रिक्त पदे भरावयाची असून, बँकेला सलग तीन दिवस सुट्टया आल्यामुळे  इच्छूक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्यासाठी  मुदतवाढ दिली असून दि.14 डिसेंबर ऐवजी शनिवार दि. 17 डिसेंबर 2016 पर्यंत पोलीस पाटील या पदासाठीचे अर्ज स्विकारण्यात येणार असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.****      
वृत्त.क्र. 953
अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस पदभरती
            उस्मानाबाद , दि. 14:-  एकात्मीक बाल विकास  सेवा योजना  प्रकल्प मुरूम या कार्यालयांतर्गत  मौ. होर्टी येथील  अंगणवाडी क्र. 113 मधील  मदतनीस एक,  मौ.वागदरी  येथील  अंगणवाडी क्र.108 मधील  मदतनीसचे एक पद, मौ. कोथळी येथील अंगणवाडी क्र.70 मधील मदतनीसचे एक पद, मौ. दाळींब येथील अंगणवाडी क्र. 8 मधील  मदतनीसचे एक पद, मौ. तुगांव येथील अंगणवाडी क्र. 48 मधील  मदतनीसचे एक पद  अशा मदतनीसाच्या एकूण पाच रिक्त पदांसाठी  संबंधित गावात ग्रामपंचायत , इतर व बाल विकास प्रकल्प  अधिकारी कार्यालयात या पदभरतीबाबतचे जाहीर प्रगटन डकविण्यात आले आहे.   
            या प्रगटनात  सविस्तर अटी  व शर्ती नमूद  करण्यात आलेल्या  आहेत .  तरी इच्छूकांनी  बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय मुरूम येथून  विहित  नमुन्यातील  अर्ज घेऊन योग्य त्या  कागदपत्रांच्या पूर्ततेसह  दि. 14 ते 23 डिसेंबर 2016 या मुदतीत  अर्ज सादर करावेत, असे आवाहन  बाल विकास  प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुरूम यांनी केले आहे.****                                                               
वृत्त.क्र. 954      जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक
            उस्मानाबाद , दि. 14:- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक दि.29 डिसेंबर 2016 रोजी दुपारी  12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी, अभिकथने पुराव्यासह  या बैठकीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.  *****
वृत्त.क्र. 955      शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीस मुदतवाढ
उस्मानाबाद , दि. 14:- मुख्य  निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी  दि. 8 डिसेंबर 2016 रोजीच्या पत्रान्वये शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रम नोंदणीस दि. 12 जानेवारी 2017 रोजीपर्यंत अंतिम करण्यास मुदतवाढ दिली आहे.  पुनरिक्षण  कार्याक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत- दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.23 नोव्हेंबर  ते 19 डिसेंबर 2016 , दावे व हरकती निकाली काढण्याचा   दिनांक व पुरवणी यादी तयार  करणे व छपाई करणे दि.6 जानेवारी 2017  व  मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी  दि. 12 जानेवारी 2017  रोजी असेल , असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.*******



वृत्त.क्र. 956                  अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले
            उस्मानाबाद , दि. 14:- सकनेवाडी शिवार येथे वाडीवाटच्या शेताच्या बाजुला बाभळीच्या झाडाखाली अज्ञात इसमाचे प्रेत दि.6 डिसेंबर 2016 रोजी आढळून आले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाणे, उस्मानाबाद येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे- या मयत व्यक्तीची उंची 168 सें.मी., शरीर बांधा सडपातळ, रंग काळा, वय 34 वर्षे, अंगात पिवळया  इटकरी रंगाचा चौकडा शर्ट, इटकरी रंगाची अंडरवेअर, श्री शक्ती कंपनीचा हाफ बाहीचा बनियन आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कुणास काही माहिती असल्यास ग्रामीण पोलीस ठाणे, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे  आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी.पवार यांनी केले आहे.
                                                          ******
वृत्त.क्र. 957         नेहरु युवा मंडळाच्या शेतकरी विकास कार्यक्रमास प्रतिसाद
            उस्मानाबाद , दि. 14:-  विश्व मृदा दिवसाचे औचित्य साधून दि.5 डिसेंबर 2016 रोजी ओम नगर येथील  नेहरु युवा मंडळाच्या वतीने शेतकरी विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वडगाव(सि) व शेकापूर येथील 101 शेतकऱ्यांच्या शेतातील माती परीक्षण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माती परीक्षण कार्यालयातील विजय पाटील, सहायक कुमोद नारनवरे, नेहरु युवा केंद्राचे लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, वैभव लांडगे, रवि सूर्यवंशी, बाळकृष्ण साळूंके, राहूल इंगळे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****



फर्स्ट पर्सन हेडमास्तरांची भरली “कॅशलेस शाळा” …


डिसेंबर महिना तसा थंडीची चाहूल लागणारा महिना .. निसर्गाच्या कृपेने आज सूर्यदर्शन न होता ढगाळ वातावरणात हलक्याशा रिमझिम सरी पडत असताना दुपारची 12 ते 12.30 ची वेळ.. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात जिल्ह्यातील शिक्षकी पेशात विचार सांगणारा वर्ग इकडे तिकडे लगबगीने धावत पळताना दिसले .. मी काही कार्यालयीन कामानिमित्त बाहेर जात असताना .. चार-पाच व्यक्तींचा एक गट समोरुन आला ..  त्यातील एकाने मला विचारले नियोजन समितीचे सभागृह कोठे आहे? मी त्यांना सांगितले की ते पहिल्याच मजल्यावर आहे .. मी त्यांना सहज विचारले की, नियोजन विभागाच्या सभागृहात काय आहे ? त्यातील एकाने चटकन उत्तर दिले, जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबत  प्रशिक्षण आहे . हे ऐकून मी तात्काळ नियोजन सभागृहात पोहोचली..  जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप साहेबही तेथे  शिक्षणाधिकारी जगताप साहेब,  माध्यमिकचे शिक्षणाधिकारी उकिरडे साहेब,  उपशिक्षणाधिकारी कुंभार मॅडम यांच्यासह मंचावर उपस्थित होते ...   
 जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  आनंद रायते  यांच्या प्रमुख  मार्गदर्शनातून  सर्व कार्यालय  प्रमुखांनी आपआपल्या  विभागांना  कॅशलेस करण्याचा  संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रशिक्षणास  जिल्ह्यातील 1 हजार 813 शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. हे सर्वजण या प्रशिक्षणातून कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबतचे म्हणजेच ई- बँकींग, मोबाईल बँकींग,  पेटीएम, एटीएम इत्यादींमार्फत कॅशलेस  व्यवहार कसा करायचा याबाबतचे धडे बँक अधिकाऱ्यांकडून घेवून आपआपल्या  शाळेतील एकूण 10 हजार 100 शिक्षकांना हे धडे शिकवतील … आणि हे शिक्षक जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या एकूण 343 प्राथमिक शाळा व 117 उच्च माध्यमिक शाळेतील 5 ते 12 वी पर्यंतच्या एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना   आणि  जिल्ह्यातील इतर खाजगी व विनाअनुदानित शाळेतील  विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक कौशल्य  विकास दिनी हे धडे देणार आहेत …
दिनांक 8 नोव्हेंबर 2016 पासून  देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था अंगिकारावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. पंतप्रधानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. रोखीने होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण कमी करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी आर्थिक व्यवहारात जास्तीत जास्त कॅशलेस पद्धतीचा वापर करावा. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये बँकेच्या शाखेची सुविधा नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेचे व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीकोनातून बँकमित्रांची नियुक्तीही करण्यात आली  आहे.   तसेच विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक कॅशलेस व्यवहारांबाबत प्रशिक्षण देतील तेव्हा हेच विद्यार्थी घरी जाऊन आपल्या पालकांना या कॅशलेस व्यवहारांबाबतची माहिती देतील .. त्यामुळेही ग्रामीण भागातील जनेतेमध्ये मोठ्या प्रमाणात या कॅशलेस व्यवहारांची माहिती पोहोचेल आणि त्यांच्या मनातील कॅशलेस व्यवहारांबाबतची भीतीही दूर होण्यास मदत होईल .. जे जे आपणांसी ठावे .. ते ते सर्वांसी सांगावे .. शहाणे करुन सोडावे .. सकळजण … या ओळी या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सार्थ ठरतील अशी अपेक्षा यावेळी मला वाटू लागली …
एरवी मुलांना कधी प्रेमाने तर कधी दम भरुन शिकवणारे शिक्षक , मुख्याध्यापक आज सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखे या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना व प्रशिक्षकांना  कॅशलेस व्यवहारांबाबत आणि  ई- बँकींग, मोबाईल बँकींग,  पेटीएम, एटीएम च्या वापराबाबत अगदी उत्सुकतेने प्रश्न विचारताना दिसत होते …
या प्रशिक्षणास जिल्हा आग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर ,  स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. धनंजय दामले , शिक्षणाधिकारी  श्री.सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य) श्री.ए.एम. उकिरडे, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप , उपशिक्षणाधिकारी (प्राथ) श्रीमती  रोहिणी कुंभार आदी उपस्थित होते .
या प्रशिक्षणातून कॅशलेस व्यवहारांबाबतचे जे प्रशिक्षण या मुख्याध्यापकांना देण्यात  आले आहे  त्याचा फायदा शाळकरी मुलांना व त्यांच्या पालकांना नक्कीच होईल आणि देशभरात चाललेल्या या चलनकल्लोळाचा सुरुवातीला जो काही त्रास जनतेस सहन करावा लागला तो या कॅशलेस व्यवहाराच्या ज्ञानामुळे आर्थिक व्यवहारात त्यात सुलभता येईल  व पूर्वीच्या  ज्या पारंपारिक पध्दती होत्या त्याच पध्दती नंतर सर्वांना अवघड आणि वेळखाऊ होत्या याची जाणीव होईल …
            या प्रशिक्षणामध्ये एटीएम कार्ड स्वाईप करुन डिजिटल व्यवहाराचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना पाहावयास मिळाले. याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हातोहात पैशांचा व्यवहार करण्यापेक्षा फक्त मशीनद्वारे योग्य ती माहिती इनपूट करुन वेळ व श्रम वाचविणारे पैशांचे हस्तांतरण सर्वांना पाहावयास मिळाले. हे व्यवहार झाल्याची पोहोचही मोबाईलवर संदेशाद्वारे मिळत असल्याची खात्रीही उपस्थितांना झाल्याचे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर कुतुहलाचे भाव दिसून आले ...जसे लहान मुलांना एखादी कविता किंवा उजळणी पाठ केल्यानंतर शिक्षकांनी शाबासकीची थाप पाठीवर मारल्यानंतर विद्यार्थ्यांच्या त्या बालमनाला जो आनंद होतो अगदी तसाच आनंद उपस्थित मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावरुन  यावेळी ओसंडून वाहत होता...
 सर्वजण या नवीन अर्थव्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील आणि शासनाकडून अर्थधोरणांमध्ये सातत्याने बदल केले जात असताना त्याचा व्यर्थ ऊहापोह न करता विकासाची हीच संधी आहे, असे समजून  शासनाच्या डिजीटल व्यवहारांच्या मोबाईल बॅंकींग, ई-वॉलेट, स्वाईप मशीन, एटीएम डेबीट कार्ड, युपीआय अॅप, इंटरनेट बॅंकींग इत्यादींचा अवलंब करतील अशी आशा मला यावेळी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांकडे पाहून वाटू लागली होती..
सशक्त राष्ट्र उभारणीच्या या एका मार्गावर  सर्वांची यशस्वी वाटचाल  होवो याकरिता सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
           
                                                                                                --आशा बंडगर,
                                                                                                सर्वसाधारण सहायक  तथा
                                                                                                माहिती सहायक (अ.का.),
                                                                                                जिल्हा माहिती कार्यालय ,
      उस्मानाबाद


****