Wednesday, 14 December 2016

फर्स्ट पर्सन हेडमास्तरांची भरली “कॅशलेस शाळा” …


डिसेंबर महिना तसा थंडीची चाहूल लागणारा महिना .. निसर्गाच्या कृपेने आज सूर्यदर्शन न होता ढगाळ वातावरणात हलक्याशा रिमझिम सरी पडत असताना दुपारची 12 ते 12.30 ची वेळ.. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात जिल्ह्यातील शिक्षकी पेशात विचार सांगणारा वर्ग इकडे तिकडे लगबगीने धावत पळताना दिसले .. मी काही कार्यालयीन कामानिमित्त बाहेर जात असताना .. चार-पाच व्यक्तींचा एक गट समोरुन आला ..  त्यातील एकाने मला विचारले नियोजन समितीचे सभागृह कोठे आहे? मी त्यांना सांगितले की ते पहिल्याच मजल्यावर आहे .. मी त्यांना सहज विचारले की, नियोजन विभागाच्या सभागृहात काय आहे ? त्यातील एकाने चटकन उत्तर दिले, जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबत  प्रशिक्षण आहे . हे ऐकून मी तात्काळ नियोजन सभागृहात पोहोचली..  जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप साहेबही तेथे  शिक्षणाधिकारी जगताप साहेब,  माध्यमिकचे शिक्षणाधिकारी उकिरडे साहेब,  उपशिक्षणाधिकारी कुंभार मॅडम यांच्यासह मंचावर उपस्थित होते ...   
 जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  आनंद रायते  यांच्या प्रमुख  मार्गदर्शनातून  सर्व कार्यालय  प्रमुखांनी आपआपल्या  विभागांना  कॅशलेस करण्याचा  संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रशिक्षणास  जिल्ह्यातील 1 हजार 813 शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. हे सर्वजण या प्रशिक्षणातून कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबतचे म्हणजेच ई- बँकींग, मोबाईल बँकींग,  पेटीएम, एटीएम इत्यादींमार्फत कॅशलेस  व्यवहार कसा करायचा याबाबतचे धडे बँक अधिकाऱ्यांकडून घेवून आपआपल्या  शाळेतील एकूण 10 हजार 100 शिक्षकांना हे धडे शिकवतील … आणि हे शिक्षक जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या एकूण 343 प्राथमिक शाळा व 117 उच्च माध्यमिक शाळेतील 5 ते 12 वी पर्यंतच्या एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना   आणि  जिल्ह्यातील इतर खाजगी व विनाअनुदानित शाळेतील  विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येक कौशल्य  विकास दिनी हे धडे देणार आहेत …
दिनांक 8 नोव्हेंबर 2016 पासून  देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था अंगिकारावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. पंतप्रधानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. रोखीने होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण कमी करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी आर्थिक व्यवहारात जास्तीत जास्त कॅशलेस पद्धतीचा वापर करावा. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये बँकेच्या शाखेची सुविधा नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेचे व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीकोनातून बँकमित्रांची नियुक्तीही करण्यात आली  आहे.   तसेच विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक कॅशलेस व्यवहारांबाबत प्रशिक्षण देतील तेव्हा हेच विद्यार्थी घरी जाऊन आपल्या पालकांना या कॅशलेस व्यवहारांबाबतची माहिती देतील .. त्यामुळेही ग्रामीण भागातील जनेतेमध्ये मोठ्या प्रमाणात या कॅशलेस व्यवहारांची माहिती पोहोचेल आणि त्यांच्या मनातील कॅशलेस व्यवहारांबाबतची भीतीही दूर होण्यास मदत होईल .. जे जे आपणांसी ठावे .. ते ते सर्वांसी सांगावे .. शहाणे करुन सोडावे .. सकळजण … या ओळी या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सार्थ ठरतील अशी अपेक्षा यावेळी मला वाटू लागली …
एरवी मुलांना कधी प्रेमाने तर कधी दम भरुन शिकवणारे शिक्षक , मुख्याध्यापक आज सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखे या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना व प्रशिक्षकांना  कॅशलेस व्यवहारांबाबत आणि  ई- बँकींग, मोबाईल बँकींग,  पेटीएम, एटीएम च्या वापराबाबत अगदी उत्सुकतेने प्रश्न विचारताना दिसत होते …
या प्रशिक्षणास जिल्हा आग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर ,  स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. धनंजय दामले , शिक्षणाधिकारी  श्री.सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य) श्री.ए.एम. उकिरडे, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप , उपशिक्षणाधिकारी (प्राथ) श्रीमती  रोहिणी कुंभार आदी उपस्थित होते .
या प्रशिक्षणातून कॅशलेस व्यवहारांबाबतचे जे प्रशिक्षण या मुख्याध्यापकांना देण्यात  आले आहे  त्याचा फायदा शाळकरी मुलांना व त्यांच्या पालकांना नक्कीच होईल आणि देशभरात चाललेल्या या चलनकल्लोळाचा सुरुवातीला जो काही त्रास जनतेस सहन करावा लागला तो या कॅशलेस व्यवहाराच्या ज्ञानामुळे आर्थिक व्यवहारात त्यात सुलभता येईल  व पूर्वीच्या  ज्या पारंपारिक पध्दती होत्या त्याच पध्दती नंतर सर्वांना अवघड आणि वेळखाऊ होत्या याची जाणीव होईल …
            या प्रशिक्षणामध्ये एटीएम कार्ड स्वाईप करुन डिजिटल व्यवहाराचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना पाहावयास मिळाले. याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हातोहात पैशांचा व्यवहार करण्यापेक्षा फक्त मशीनद्वारे योग्य ती माहिती इनपूट करुन वेळ व श्रम वाचविणारे पैशांचे हस्तांतरण सर्वांना पाहावयास मिळाले. हे व्यवहार झाल्याची पोहोचही मोबाईलवर संदेशाद्वारे मिळत असल्याची खात्रीही उपस्थितांना झाल्याचे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर कुतुहलाचे भाव दिसून आले ...जसे लहान मुलांना एखादी कविता किंवा उजळणी पाठ केल्यानंतर शिक्षकांनी शाबासकीची थाप पाठीवर मारल्यानंतर विद्यार्थ्यांच्या त्या बालमनाला जो आनंद होतो अगदी तसाच आनंद उपस्थित मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावरुन  यावेळी ओसंडून वाहत होता...
 सर्वजण या नवीन अर्थव्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील आणि शासनाकडून अर्थधोरणांमध्ये सातत्याने बदल केले जात असताना त्याचा व्यर्थ ऊहापोह न करता विकासाची हीच संधी आहे, असे समजून  शासनाच्या डिजीटल व्यवहारांच्या मोबाईल बॅंकींग, ई-वॉलेट, स्वाईप मशीन, एटीएम डेबीट कार्ड, युपीआय अॅप, इंटरनेट बॅंकींग इत्यादींचा अवलंब करतील अशी आशा मला यावेळी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांकडे पाहून वाटू लागली होती..
सशक्त राष्ट्र उभारणीच्या या एका मार्गावर  सर्वांची यशस्वी वाटचाल  होवो याकरिता सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
           
                                                                                                --आशा बंडगर,
                                                                                                सर्वसाधारण सहायक  तथा
                                                                                                माहिती सहायक (अ.का.),
                                                                                                जिल्हा माहिती कार्यालय ,
      उस्मानाबाद


****