उस्मानाबाद,दि.16:- जिल्ह्यास सन 2015-16 साठी 44 लाख रुपयांचे ध्वजदिन
निधीचे उद्दिष्ट देण्यात आले होते . जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली 80.12
टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे . हे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचा शाल ,
श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन यावेळी विशेष सत्कार करण्यात आला . तसेच 2016
च्या ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल
गोडबोले , कमांडर गुरुदत्त सालोखे, राज्य
परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक
राजीव साळवे हे उपस्थित होते .
प्रास्ताविकात बोलताना जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले म्हणाले की , परकीय आक्रमणापासून देशाचे
संरक्षण करताना , अंतर्गत
शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करताना
शूर सैनिक स्वत:च्या परिवारापासून
हजारो मैल अंतरावर राहून देशसेवा करीत
असताना कित्येक सैनिक हुतात्मे होतात तसेच त्यांना अपंगत्व येते . अशा या
शूर सैनिकांबद्दल कृतज्ञता
व सद्भावना व्यक्त करुन त्यांचे ऋण फेडण्याच्या उदात्त भावना व्यक्त
करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन
निधी संकलित करुन सैनिकांच्या कल्याणकारी
योजना या निधीतून राबविण्यात येतात. अशा या
सैनिकांच्या व राष्ट्राचा मानबिंदू
असणाऱ्या ध्वजाचा ध्वजदिन निधी
संकलन दरवर्षी करण्यात येते . याचे औचित्य
साधून शहीद सैनिकांना यावेळी श्रध्दांजली
वाहण्यात आली. कॅप्टन सुनिल गोडबोले यांनी
ध्वजदिनाचे महत्व तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या
विविध योजनांविषयी उपस्थितांना माहिती सांगितली.
यावेळी सन 1971 च्या 16
डिसेंबर रोजी भारतीय लष्कराने पाक सैन्यावर
विजय मिळविला . त्याला आज 45 वर्षे
पूर्ण झाली आहेत . या युध्दामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील चार सैनिक शहीद झाले . तसेच इतर युध्द
मोहिमांमधील शहीद वीरांच्या वीरपत्नी , वीरमाता
व वीरपिता यांचा यावेळी सत्कार
करण्यात आला . यामध्ये वीरपत्नी
श्रीमती प्रभावती निकम , श्रीमती
गयाबाई सोनटक्के , श्रीमती बेबीताई
नारंगवाडे , श्रीमती ललीता जाधव , श्रीमती
रतन महाडिक , श्रीमती रेहना बेगम
, श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड, श्रीमती कांताबाई कदम , वीरपिता श्री. काशिनाथ कोकरे , वीरमाता श्रीमती
माताबाई नागरगोजे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी माजी सैनिकांच्या
पाल्यांस उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले . यामध्ये माजी सैनिक श्री.
ज्ञानदेव गुंड यांचा पाल्य कु. प्रभात
याने इयत्ता 10 वी च्या परीक्षेत
96.40 टक्के गुण मिळविल्याबद्दल त्याला
रुपये 10 हजार , माजी सैनिक श्री. पोपट
लोमटे यांची पाल्या कु. धनश्री हिने इयत्ता 10 वी मध्ये 96.20 टक्के गुण
मिळविल्याबद्दल तिला रुपये 10 हजार, प्रशस्तीपत्रक , शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच माजी सैनिक श्री उत्तम काळे यांची
पाल्या कु. दिपीका हिला परदेश शिक्षणासाठी
मदत म्हणून रुपये 50 हजार , माजी सैनिक श्री. संजय साळुंके यांची पाल्या कु.
शितल हिच्या वैद्यकीय व्यावसायिक शिक्षणास आर्थिक मदत रु. 40
हजार, माजी सैनिक श्री. धनराज भोसले यांची पाल्या कु. वैष्णव
हिच्या सैनिकी शिक्षणासाठी आर्थिक मदत रु. 15 हजार ,
माजी सैनिक गुलाब शेख यांचा
पाल्य कु. सूरज याच्या
अभियांत्रिकी व्यावसायिक शिक्षणास
मदत रुपये 20 हजार , माजी सैनिक
नंदकुमार लाटे यांचा पाल्य श्री. अक्षय
याच्या वसतिगृह खर्च प्रतिपूर्तीसाठी मदत रु. 8 हजार रुपये एवढी आर्थिक मदत सैनिक कल्याण कार्यालयाच्या कल्याणकारी निधीतून
करण्यात आली .
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत
नारनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी
सन 1971 च्या भारत -पाकिस्तान युध्दाची विस्तृत माहिती देवून देशाच्या संरक्षणासाठी
जवान प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहीद होतात.
अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन
जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र
दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या
निधीचा विनियोग केला जात असल्याने या निधीच्या संकलनात सर्वांनी योगदान द्यावे ,
असे आवाहन यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते म्हणाले की
, पुढील ग्रामसभेत आजी / माजी सैनिकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी गावपातळीवर,
तालुकास्तरावर व जिल्हास्तरीय समिती गठीत
करुन त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात
येतील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले .
ध्वजदिन निधी 2016 निधी
संकलन शुभारंभ व ध्वजदिन निधी 2015 चे
उत्कृष्ट संकलन केलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते , राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजीव साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.
शिरीष बनसोडे , जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप , तुळजापूरचे तहसिलदार श्री. दिनेश झांपले, शिक्षणाधिकारी श्री. सचिन
जगताप व श्री. औदुंबर उकिरडे आदी कार्यालय प्रमुखाना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला . या कार्यक्रमास जिल्ह्यातील
विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व
त्यांचे प्रतिनिधी , माजी सैनिक संघटना, नागरिक, माजी सैनिक -विधवा बहुसंख्येने
उपस्थित होते, या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
*****

