कॅशलेस व्यवहाराचे
प्रशिक्षण
उस्मानाबाद.दि.14:- देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था
अंगिकारावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे. पंतप्रधानाची संकल्पना
प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस अर्थव्यवस्था होण्यासाठी
विविध उपाययोजना करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेंतर्गत
असलेल्या एकूण 343 प्राथमिक शाळा व 117 उच्च माध्यमिक शाळेतील 5 ते 12 वी पर्यंतच्या
एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या
माध्यमातून प्रत्येक कौशल्य विकास दिनी ई-
बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेटीएम, एटीएम इत्यादींमार्फत
कॅशलेस व्यवहार कसा करायचा याबाबत विविध बँकांच्या
अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जात
असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.
आनंद रायते यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या या दोन्ही प्रशासन प्रमुखांनी रोखीने होणारे व्यवहाराचे
प्रमाण कमी करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी आर्थिक व्यवहारात जास्तीत
जास्त कॅशलेस पद्धतीचा वापर करावा. जिल्ह्यात ज्या गावांमध्ये बँकेच्या शाखेची सुविधा
नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेचे व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीकोनातून
बँकमित्रांची नियुक्ती करण्यात येईल,सर्वप्रथम सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या
पालकांच्या बँक खात्यांची माहिती घेतली जाईल ज्या पाल्यांच्या पालकांचे बँकेत खाते
नसतील अशांची खाती बँकेत उघडली जातील . प्रत्येक शनिवारी म्हणजेच कौशल्य विकास दिनी
बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने शिक्षक ई-लर्निंगच्या माध्यमातून नेटबँकींग, मोबाईल बँकींग
यासारख्या डिजिटल पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना सांगतील , ज्यामध्ये नोटांची निर्मिती
कशी झाली , नोटांचा इतिहास , प्लॅस्टिक मनी
ही संकल्पना , एटीएम कार्डबाबत माहिती एटीएम कार्डची काळजी कशी घ्यायची , एटीएम कार्ड वापरण्याची पध्दत, एटीएम कार्डचे फायदे
इत्यादींबाबतची माहिती इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहे . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
निश्चलनीकरणाबाबतची भीती निघून जाईल तसेच कॅशलेस
पध्दतीबाबत जनजागृती होईल . याशिवाय प्रत्येक
विद्यार्थी शाळेत दिलेल्या प्रशिक्षणाची माहिती आपल्या पालकांना देतील त्यामुळे सर्वसामान्य
नागरिकांमधील ही निश्चलनीकरणाची व कॅशलेस व्यवहारांबाबतची भीती दूर होण्यास मदत होईल.
या कार्यशाळेत शिक्षणाधिकारी (प्राथ) सचिन जगताप , शिक्षणाधिकारी (माध्य)ए.एम. उकिरडे, जिल्हा माहिती
अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा आग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर , स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. धनंजय दामले, उपशिक्षणाधिकारी , गट शिक्षणाधिकारी आणि सर्व
शाळांचे मुख्याध्यापक आदी
उपस्थित होते .
सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणानंतर शिक्षकांना
आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना व पालकांना असा हा कॅशलेस व्यवहारासंबंधीचा प्रशिक्षण
उपक्रम राबविला जाणार आहे .
****
वृत्त क्र.952
पोलीस पाटील पदांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ
उस्मानाबाद.दि.14:- उपविभागीय
दंडाधिकारी, उस्मानाबाद अंतर्गत उस्मानाबाद व तुळजापूर या तालुक्यातील पोलीस
पाटलांची 131 रिक्त पदे भरावयाची असून, बँकेला सलग तीन दिवस सुट्टया आल्यामुळे इच्छूक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली असून दि.14 डिसेंबर ऐवजी शनिवार
दि. 17 डिसेंबर 2016 पर्यंत पोलीस पाटील या पदासाठीचे अर्ज स्विकारण्यात येणार
असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.****
वृत्त.क्र. 953
अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस पदभरती
उस्मानाबाद , दि. 14:-
एकात्मीक बाल विकास सेवा
योजना प्रकल्प मुरूम या
कार्यालयांतर्गत मौ. होर्टी येथील अंगणवाडी क्र. 113 मधील मदतनीस एक,
मौ.वागदरी येथील अंगणवाडी क्र.108 मधील मदतनीसचे एक पद, मौ. कोथळी येथील अंगणवाडी
क्र.70 मधील मदतनीसचे एक पद, मौ. दाळींब येथील अंगणवाडी क्र. 8 मधील मदतनीसचे एक पद, मौ. तुगांव येथील अंगणवाडी
क्र. 48 मधील मदतनीसचे एक पद अशा मदतनीसाच्या एकूण पाच रिक्त पदांसाठी संबंधित गावात ग्रामपंचायत , इतर व बाल विकास
प्रकल्प अधिकारी कार्यालयात या
पदभरतीबाबतचे जाहीर प्रगटन डकविण्यात आले आहे.
या प्रगटनात सविस्तर अटी
व शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत .
तरी इच्छूकांनी बाल विकास प्रकल्प
अधिकारी कार्यालय मुरूम येथून विहित नमुन्यातील
अर्ज घेऊन योग्य त्या
कागदपत्रांच्या पूर्ततेसह दि. 14
ते 23 डिसेंबर 2016 या मुदतीत अर्ज सादर
करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना,
मुरूम यांनी केले आहे.****
वृत्त.क्र. 954 जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची
त्रैमासिक बैठक
उस्मानाबाद , दि. 14:- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन
समितीची त्रैमासिक बैठक दि.29 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी, अभिकथने पुराव्यासह या बैठकीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी
कार्यालयाकडून करण्यात आले आहे. *****
वृत्त.क्र. 955 शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीस मुदतवाढ
उस्मानाबाद , दि. 14:- मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दि. 8 डिसेंबर 2016 रोजीच्या पत्रान्वये शिक्षक
मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रम नोंदणीस दि. 12 जानेवारी
2017 रोजीपर्यंत अंतिम करण्यास मुदतवाढ दिली आहे. पुनरिक्षण
कार्याक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत- दावे व हरकती स्विकारण्याचा
कालावधी दि.23 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर
2016 , दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दि.6 जानेवारी 2017 व मतदार
यादीची अंतिम प्रसिध्दी दि. 12 जानेवारी
2017 रोजी असेल , असे उप जिल्हा निवडणूक
अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.*******
वृत्त.क्र. 956 अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले
उस्मानाबाद , दि. 14:- सकनेवाडी शिवार
येथे वाडीवाटच्या शेताच्या बाजुला बाभळीच्या झाडाखाली अज्ञात इसमाचे प्रेत दि.6
डिसेंबर 2016 रोजी आढळून आले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाणे, उस्मानाबाद येथे
आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे- या
मयत व्यक्तीची उंची 168 सें.मी., शरीर
बांधा सडपातळ, रंग काळा, वय 34 वर्षे, अंगात पिवळया इटकरी रंगाचा चौकडा शर्ट, इटकरी रंगाची
अंडरवेअर, श्री शक्ती कंपनीचा हाफ बाहीचा बनियन आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत
कुणास काही माहिती असल्यास ग्रामीण पोलीस ठाणे, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी.पवार यांनी केले
आहे.
******
वृत्त.क्र. 957 नेहरु युवा मंडळाच्या शेतकरी विकास
कार्यक्रमास प्रतिसाद
उस्मानाबाद , दि. 14:- विश्व मृदा दिवसाचे औचित्य साधून दि.5 डिसेंबर
2016 रोजी ओम नगर येथील नेहरु युवा मंडळाच्या
वतीने शेतकरी विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वडगाव(सि)
व शेकापूर येथील 101 शेतकऱ्यांच्या शेतातील माती परीक्षण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करण्यात आले. यावेळी माती परीक्षण कार्यालयातील विजय पाटील, सहायक कुमोद नारनवरे,
नेहरु युवा केंद्राचे लेखाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, वैभव लांडगे, रवि सूर्यवंशी,
बाळकृष्ण साळूंके, राहूल इंगळे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****

