Saturday, 17 December 2016

“कॅशलेस उस्मानाबाद@ मोबाईल ॲप” चा वापर सर्व जनतेने करावा - जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे






उस्मानाबाद,दि.17:-  रोखरहित  महाराष्ट्र मोहिमेंतर्गत मोबाईल ॲप तयार करणारा उस्मानाबाद जिल्हा राज्यात पहिला असून रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हयातील सर्व जनतेने या ॲप चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी येथे केले.
             शनिवार (दि.17) रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन विभागाच्या सभागृहात कॅशलेस कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने व राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्राच्या मदतीने डिजिटल उस्मानाबाद अंतर्गत " कॅशलेस उस्मानाबाद@मोबाईल " या मोबाईल ॲप चे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (पुन्नर्वसन विभाग) श्री.अरविंद लाटकर, लिड बँकेचे व्यवस्थापक श्री. विजयकर, जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.राजकुमार माने, सी.एस.एस. चे जिल्हा समन्वयक हेमंत मोटे, महा-ऑनलाईनचे जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड, सी.एस.एस. चे लातूर  जिल्हा समन्वयक प्रशांत राजगुरू आदींची  यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, डिजिटल उस्मानाबाद या मोहिमेंतर्गत केंद्र शासना मार्फत राबविल्या जात असलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमास, उस्मानाबाद जिल्हा प्रशासन व एन.आय.सी.च्या पुढाकाराने मोबाईल ॲप च्या निर्मितीने एक वेगळी दिशा निश्चित मिळणार आहे. या ॲपमध्ये कॅशलेस सुविधा, डिजीटल भरणा पध्दती, नागरिकासाठी ई-सुविधा, महत्वाचे दुरध्वनी क्रमांक, लाईव्ह श्री. तुळजाभवानी दर्शन, ऑनलाईन 7/12 पाहणे, ऑनलाईन तक्रार नोंदवणे, ई-आधार डाऊनलोड करणे, आपली आधार माहिती अद्यावत करणे, ऑनलाईन माहिती अधिकार, शासन निर्णय पाहणे, संजय गांधी योजना, आदी योजनेबाबत सुविधाची माहिती असल्याने भविष्यात सर्व नागरिकांना याद्वारे महत्वाची व मोलाची मदत होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
                या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती. वृषाली तेलोरे यांनी केले. कार्यक्रमास ई-सुविधा केंद्र चालक, स्वस्त धान्य  दुकानदार, कॉलेजचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.*****

 उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई,
25 स्कूल बसेसची योग्यता प्रमाणपत्रे रद्द
 उस्मानाबाद.दि.17:- अधिक संख्येने विद्यार्थी बसवण्यासाठी सीट काढून बाकडे बसविणाऱ्या जिल्हयातील 25 स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या जिल्हयातील स्कूल बस, व्हॅन व रिक्षांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाने  कठोर कारवाई सुरू केली आहे.  
जिल्ह्यात प्रत्येक स्कूल बसची कसून तपासणी करण्यात येत आहे.ठिकठिकाणी दोन पथकांच्या माध्यमातून टेहळणी करण्यात येत असून गेल्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी कारवाई करून 25 स्कूल बसची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही बसचालकांनी आतील कुशनचे सीट काढून चक्क बाकडे लावले असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिक विद्यार्थी बसवण्याच्या हेतूने हा प्रकार करण्यात आला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा आदी ठिकाणी कारवाई करून स्कूल बसचे फिटनेस रद्द करण्यात आले आहे.
जिल्हयात अनेक ऑटोरिक्षा व टमटममधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येत आहे.खचाखच विद्यार्थ्यांना कोंबले जात आहे. एमएच 25-टी. 0598, एमएच 25-टी. 1105, एमएच 25-टी.0674, एमएच 25-टी. 9590, एमएच 25-टी.0720, एमएच 25-टी. 0597, एमएच 25-टी. 0670, एमएच 25-टी. 0941, एमएच 25- टी. 1838, एमएच 25-टी. 0826,एमएच 25- टी. 0745, एमएच 25-टी. 0740, एमएच 25-टी. 0748, एमएच 25-टी. 0933, एमएच 25- टी. 1117, एमएच 25- टी. 0741, एमएच 25- टी. 0722, एमएच 25- टी. 0718, एमएच 25- टी. 0694, एमएच 25- टी. 1104, एमएच 25- टी. 0659, एमएच 25- टी. 0588, एमएच 25- टी. 0727, एमएच 25- टी. 0676, एमएच 25-टी. 0861 उप प्रादेशिक  विभागाकडून या वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 56 नुसार ही वाहने यांत्रिकदृष्ट्या  दुरुस्त होईपर्यंत या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र व परवाना योग्यता प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले असल्याचे  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे आणि उप प्रादेशिक  परिवहन मोटार वाहन निरीक्षक श्री. इंद्रजित आमते  यांनी कळविले आहे .*****
वृत्त्‍ क्र.968                  कर्ज मागणीसाठी  अर्ज दाखल करावेत
उस्मानाबाद,दि.16 :-महात्मा फुले मागासवर्ग  विकास  महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील आर्थिक दूर्बल घटकांसाठी योजना राबविली जाते विविध व्यवसायाकरिता महामंडळ व बॅंकेमार्फत अनुदान व कर्ज वितरित करण्यात येते. महार, नवबौध्द, बुरूड बेडाजंगम, माला जंगम , या जातीमधील गरजू लाभार्थींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महामंडळाच्या नियमानुसार जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड, आधार कार्ड, जागेचा पुरावा, दोन छायाचित्रे, कोटेशन, अनुभव प्रमाणपत्रासह महामंडळाच्या कर्ज मागणी अर्ज परिपूर्ण भरुन जिल्हा कार्यालयात दाखल करावा. कर्ज मागणी करीता वय मर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत आहे. कर्ज मागणीसाठीचा अर्ज महामंडळाच्या www.mphulebedc.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग  विकास  महामंडळ यांनी केले आहे. ****


वृत्त्‍ क्र.969               तब्बल 16 तास काम; इतिहासात प्रथमच
मोठया प्रक्रियेतून 429 शिक्षकांना पदोन्नती
उस्मानाबाद,दि.17:-शिक्षण विभागातील 11 अधिकारी, 25 विस्तार अधिकारी, 15 लिपिकांनी 16 तास सलग काम करुन 429 शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया पार पाडली.  बालकांच्या मोफत शिक्षणाच्या हक्काच्या कायद्यानुसार सहावी ते आठवीला विज्ञान व गणिताला शिक्षक देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार देशात महाराष्ट्राने ही प्रक्रिया सुरूवातीला राबवण्याची योजना तयार केली. याबाबत  महाराष्ट्र हे  पहिले राज्य ठरले आहे . सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विज्ञान व गणिताला विद्यार्थ्यांसाठी शिक्षक मिळाले आहेत. अशी धडक प्रक्रिया राबवणारा उस्मानाबाद राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जिल्हा परिषदेच्या दोन सर्वसाधारण सभांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारी हजारो शिक्षकांची प्रतिक्षा असलेली 12 विज्ञान अहर्ताधारक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रिया अखेर दि. 16 डिसेंबर रोजी पार पडली. मात्र ही प्रक्रिया जिल्हा परिषदेतील विविध अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली आहे . गुरूवार दि. 14 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता सुरू करण्यात आलेल्या या प्रक्रियेला पूर्ण  होण्यासाठी  शुक्रवारी सकाळचे सहा वाजले. या प्रक्रियेत  सहभागी  झालेला  कोणताही  घटक  अधिक  वेळ  लागल्यामुळे उव्दिग्न न होता प्रक्रिया संपल्यावर उत्साहात दिसत होता.
            सामान्य  प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, शिक्षणाधिकरी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्यासह तालुक्याचे आठ गट शिक्षणाधिकारी असे  जिल्हयातील 11 अधिकारी, तालुका व जिल्हा कार्यालयात काम करणारे 5 विस्तार अधिकारी, शिक्षण विभागातील 15 वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, पाच शिपाई यांनी सलग सोळा तास यशवंतराव चव्हाण सभागृहात बसून  ही प्रक्रिया राबविली आहे.
पदोन्नतीसाठी जिल्ह्यातील 1 हजार 54 शिक्षक पात्र ठरविण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सर्वांकडून विकल्प मागविण्यात आले होते. त्यापैकी 683 शिक्षकांनी दर्जावाढीसाठी होकार दर्शविला .यातून 516 पदे भरणे अपेक्षित होते. यामुळे 429 जणांची दर्जावाढ होऊ शकली. सेवा ज्येष्ठता व अन्य नियमांनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ही प्रक्रिया झाली. प्रत्येक शिक्षकाला समोर बोलावून समुपदेशन करण्यात येत होते. शिक्षकांचे समाधान झाल्यावर पदवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात येत होते. त्यानंतर सर्वच अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित होते.****
वृत्त्‍ क्र.970
 कीडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी
 फवारणी आवश्यक
उस्मानाबाद,दि.16 :- जिल्ह्यात  कीड रोग  सर्वेक्षण  व सल्ला प्रकल्प सन 2016-17 अंतर्गत  तूर पिकाच्या केलेल्या निरीक्षणावरुन सध्या हरभरा  पिकावर  काही ठिकाणी  घाटे अळीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी  पुढील उपाय योजना  सुचविण्यात  आले आहेत –
घाटे अळीसाठी  निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पी.व्ही. 500 मिलिलीटर  प्रती हेक्टर याप्रमाणे  फवारणी करण्यात यावी , पक्षी थांबे प्रति हेक्टर 50 उभारावेत ,  या किटकनाशकाचे प्रमाण साध्या  पंपासाठी  असून पेट्रोल पंपासाठी किटकनाशकाची मात्रा तीन पट करावी , असे  उपविभागीय कृषी अधिकारी , उस्मानाबाद यांनी कळविले आहे.****
वृत्त्‍ क्र.971
वरुडा येथील शासकीय आश्रमशाळेस जिल्हाधिकारी यांची  भेट
उस्मानाबाद,दि.16:-शासकीय /अनुदानित  आश्रमशाळा  तसेच शासकीय  वसतिगृहातील विद्यार्थींनींबाबत  होणाऱ्या  गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा सल्लागार  समिती गठीत करण्यात आलेली आहे . या समितीतील अध्यक्ष व सदस्यांनी  दिनांक 16 डिसेंबर रोजी वरुडा येथील  माध्यमिक आश्रमशाळेस भेट देऊन तपासणी केली .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे ,  उप जिल्हाधिकारी श्री. सचिन बारवकर ,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी  श्री. आर.आर. सोनकवडे ,विधी अधिकारी श्रीमती  सोनाली पाटील, जिल्हा परषिद सदस्य श्रीमती कांचनमाला सांगवे,  जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) ,  समाज कल्याण निरीक्षक   श्री. दत्तात्रय कुंभार   आदी उपस्थित होते.
या तपासणीच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी  या आश्रमशाळेतील  विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  त्यांनंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या आश्रमशाळेच्या इमारतीची किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी करुन घेणे , विद्यार्थ्यांची दरमहा वैद्यकीय तपासणी करणे , आश्रम शाळेतील पट संख्या वाढण्यासाठी  पारधी वस्त्यांना भेट देऊन मुलांना शाळेस येण्यास प्रोत्साहीत करणे ,  गैरहजर मुलांचे सर्वेक्षण करुन प्रवेश वाढविणे ,  उन्हाळी सुट्टीमध्ये  भोसला  मिलिटरी स्कूल, नवोदय विद्यालय धर्तीवर  शिबिरांचे आयोजन  करणे , अंगणवाडीतून बाहेर पडणाऱ्या मुलांचा सर्व्हे करुन पुढील वर्षी हे मुले या आश्रम शाळेत प्रवेश घेतील याबाबत विशेष प्रयत्न करावेत , 7 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना  विशेष प्रशिक्षण देण्यात यावे ,  त्यांचा  शारिरीक , बौध्दीक व शैक्षणिक विकास घडवावा ,  मुलींचे  लैंगिक शोषण  होणार नाही यासाठी उपाय योजना कराव्यात इत्यादी सूचना यावेळी मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना   दिल्या .***
वृत्त्‍ क्र. 972
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष  माहितीकोष 
अद्ययावत  करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.16:-  महाराष्ट्र शासनाच्या  सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच राज्यातील सर्व  जिल्हा परिषदांमधील  अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष  माहितीकोष  दरवर्षी  अद्ययावत  करण्यात येणार आहे .  या माहिती कोषामध्ये  नियमित आस्थापनेवरील व नियमित्तेतर  आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी  आस्थापनेवरील , रोजंदारीवरील , अंशकालीन , मानसेवी इ.)  तसेच तदर्थ  तत्वावर  नेमणूका  करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या  कर्मचाऱ्यांची  माहिती दिनांक  1 ऑक्टोबर 2016  या संदर्भ दिनांकास अनुसरून  गोळा करण्यात  येणार आहे .  नियोजन  विभागाने याविषयी  दिनांक 3 डिसेंबर 2016 रोजी  शासन परिपत्रक  निर्गमित  केले आहे .  राज्य स्तरावर अर्थ व सांख्यिकी संचालनालय , मुंबई , विभागीय  स्तरावर  संबंधित  जिल्हा सांख्यिकी कार्यालय  कर्मचाऱ्यांचा सर्वंकष  माहितीकोष  तयार करण्याची  कार्यवाही करणार आहेत .  शासकीय कर्मचाऱ्यांचा  सर्वंकष  माहितीकोष  तयार करते वेळी  माहिती नोंदणीकरीता  महाराष्ट्र शासनाच्या  www.mahasdb.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर EMDb   या नावाने  ऑनलाईन  संगणकीय  आज्ञावली  उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
 जिल्हा सांख्यिकी  कार्यालय, लातूर  यांच्याकडून  जिल्ह्यातील  सर्व आहरण व संवितरण  अधिकारी यांनी लॉगीन युजर आयडी  व पासवर्ड  तात्काळ प्रात करुन ऑनलाईन संगणकीय  आज्ञावलीमध्ये माहिती  नोंदणी  दिनांक  16 डिसेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 पर्यंत पूर्ण  करावयाची आहे .  जिल्हा  सांख्यिकी कार्यालय , उस्मानाबाद  यांच्याकडून दिली जाणारी माहिती  भरल्याचे प्रमाणपत्र  माहे जानेवारी 2017 च्या वेतन  देयकासोबत  व माहिती बरोबर  असल्याचे प्रमाणपत्र  माहे मे 2017 च्या वेतन  देयकासोबत  जोडणे आवश्यक आहे .  अन्यथा  सदर वेतन  देयके कोषागार  कार्यालय / अधिदान व लेखा कार्यालय  येथे पारीत केली जाणार नाहीत .
शासन परिपत्रकाच्या  वेळापत्रकाप्रमाणे  सर्व आहरण व संवितरण  अधिकारी यांनी कार्यवाही  करुन  शासकीय  कर्मचाऱ्यांचा  सर्वंकष  माहितीकोष  तयार करण्यास  सहकार्य करावे, असे आवाहन  उस्मानाबादच्या जिल्हा सांख्यिकी अधिकारी  श्री. वा.प्र. जाधव यांनी यांनी केले आहे .***

वृत्त्‍ क्र.973
राज्यातील  सर्वात पहिली  लोकराज्य ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅच
उस्मानाबाद मध्ये
उस्मानाबाद,दि.16:-  महाराष्ट्र शासनाचे लोकप्रिय  मुखपत्र  असलेल्या  लोकमान्य: लोकराज्य  या मासिकाची ओळख  असलेल्या  अंकाचे महत्व लक्षात  घेवून  उस्मानाबाद मध्ये  या वर्षातील  राज्यातील  सर्वात  पहिली लोकराज्य ब्युटी पार्लर  प्रशिक्षण  बॅच  बनली आहे .
नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद केंद्रातर्फे महिलांचा  विशेष  ब्युटी पार्लर  प्रशिक्षण वर्ग  आयोजित  करण्यात  आला होता .  त्यावेळी  समारोपास  जिल्हा माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप  यांना आमंत्रित  करण्यात  आले होते .  त्यावेळी त्यांनी या महिलांना  महाराष्ट्र शासन ; माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती  कार्यालय , इतर  शासकीय विभाग  याविषयी  माहिती दिली.  त्याचवेळी  त्यांनी  लोकराज्य मासिकाचे  महत्वही त्यांना पटवून दिले .  त्यावर या संपूर्ण  प्रशिक्षण  वर्गाने  लागलीच लोकराज्यचे  वार्षिक सभासदत्व   स्वीकारले आणि ही बॅच  राज्यातील  व उस्मानाबादमधील  सर्वात पहिली लोकराज्य  ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅच झाली .
यावेळी  रामचंद्र कुलकर्णी ,  प्रतिभा जाधव ,  सायली सलगर ,  काझी कुलसुम ,मनोजकुमार  सरवदे ,  पायाळ विनोद ,  वाघ वैभव ,  कुंभार सोमनाथ ,  अश्विनी  थोरात ,  उमरदंड  रुपेश ,  प्रविण  माने , कार्तीक गिराम , सुबोध खुने,  गिराम  पल्लवी ,  विरेश गायकवाड , पांचाळ लक्ष्मण ,  शितल जोकार ,  सरोजिनी  मोहिते ,  अर्चना  मैदाड ,  कल्पना  उंदरे , मनिषा  ठेले , शितल माने हे उपस्थित होते .
 हा लोकराज् अंक  आम्हाला  तर उपयोगी पडेलच मात्र आमच्या ब्युटी पार्लरमध्ये  जे ग्राहक  म्हणून येतील  त्यांनाही हे मासिक  वाचता येईल आणि त्यातून  त्यांनाही  शासनाबद्दलची  अधिकृत  माहिती मिळेल. असा विश्वास या महिलांनी व्यक्त केला.*****
वृत्त क्र.974       शाळा व महाविद्यालयाने शिष्यवृत्तीसाठीचे  प्रस्ताव सादर करावेत
उस्मानाबाद.दि 16:- जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी सन 2016-17 करिता महाविद्यालयास  माध्यमिक  व  उच्च  माध्यमिक  शिक्षण मंडळ  व डॉ.  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी मंजूर केलेल्या शिक्षण शुल्कानुसार आपल्या महाविद्यालयाच्या लॉगीन आयडी वरती  शुल्क भरण्यात यावा व त्याची एक प्रत समाज कल्याण कार्यालयास  तात्काळ सादर  करण्यात  यावी.
            सन 2016- 17 या शैक्षणिक वर्षातील  मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे  भारत सरकार शिष्यवृत्तीचे  अर्ज  तात्काळ संगणक प्रणलीद्वारे भरण्यात यावे  व सदर  शिष्यवृत्तीचे  प्रस्ताव  या  कार्यालयास  मंजुरीस्तव  सादर  करण्यात यावेत. प्रस्ताव सादर करताना त्यासोबत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक,  बॅंक  खात्याशी संलग्न केलेला पुरावा सोबत जोडण्यात यावा.विहीत  कालावधीत  शुल्क  मान्यतेसाठी  प्रस्ताव  व  विद्यार्थ्यांचे अर्ज  सादर न केल्यास या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृती, शिक्षण शुल्क अदा करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणारी नाही असे, सहायक आयुक्त श्री. शिवाजी शेळके यांनी कळविले आहे.
****
वृत्त क्र. 975