Thursday, 3 October 2019

श्री तुळजाभवानी देवीजींचे मुरली अलंकार महापूजेचे मनोहारी रुप


शारदीय नवरात्र महोत्सव-2019




          उस्मानाबाद, दि.03: शारदीय नवरात्र महोत्सवात आज  पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती. विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवून भाविकांना सुलभपणे दर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
          दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांना चांगल्या पद्धतीने दर्शन मिळावे, यासाठी मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणानी समन्वयाने या गर्दीचे नियंत्रण केले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, मंदिर संस्थानचे तहसीलदार योगिता कोल्हे यांनी सातत्याने ठिकठिकाणी भेटी देऊन प्रत्येक ठिकाणी भाविकांना त्रास होणार नाही,  यापद्धतीने यंत्रणांना सूचना देत होते. तसेच महाद्वार, मंदिरातील पोलीस चौकी येथून वारंवार भाविकांना सूचना दिल्या जात आहेत. ज्या भाविकांची चुकामूक झाली, त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ ध्वनीक्षेपकावरुन कळवून पोलीस चौकी अथवा मदत केंद्रात येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी  याबद्दल समाधान व्यक्त केले. तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत खाजगी सुरक्षा रक्षक गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र भक्तांची सेवा करत आहेत नवरात्रीच्या कालावधीत अनेक रुग्णांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये ॲम्बुलन्स च्या माध्यमातून दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या सुरक्षारक्षकांनी केले आहे रुग्णा बरोबरच अस्थिव्यंग, अपंग, वयोवृद्ध यांची सेवा येथील सुरक्षारक्षक कर्मचारी करत आहेत.
दरम्यान काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  उद्या (दि. 04) श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.                      

Wednesday, 2 October 2019

प्लास्टिक मुक्त उस्मानाबादसाठी शपथ / जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण


वि.स. वृत्त : 16
प्लास्टिक मुक्त उस्मानाबादसाठी शपथ

उस्मनाबाद, दि.2 : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी (सिंगल युज प्लास्टिक मुक्तीसाठी) आज जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ घेण्यात आली. तसेच प्‍लास्टिक मुक्‍तीसाठी यावेळी स्‍वाक्ष्‍ारी मोहिम घेण्‍यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी श्री.मनोरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पंचायत संस्था तथा सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील प्लास्टिकचे संकलन करावे. तसेच पॉलिथिनचा व प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ-मुंडे यांनी यावेळी केले.

****



वि.स. वृत्त : 17

जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण

उस्मनाबाद, दि.2 : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील हुतात्मा स्मारक येथे महात्‍मा गांधी यांनी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सन 1936 मध्‍ये लावलेल्‍या झाडापासून तयार केलेल्‍या  रोपाचे वृक्षारोपण जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, विभागीय वनाधिकारी मच्छिंन्द्रनाथ गायकर, नगर परिषदेचे मुख्यधिकारी श्री.मनोरे, तहसिलदार श्री. माने, स्वातंत्र्य सैनिक राजाराम मारुती पडवळ, माजी सैनिक महादेव दगडु यादव यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.


****





वि.स. वृत्त : 18

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू 
        उस्मानाबाद,दि.2: जिल्ह्यात दि. 22 सप्टेंबर ते 14 ऑक्टोंबर या कालावधीत श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सव तसेच 8 ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन, विधानसभा निवडणूक-2019 आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दूष्काळ सदृष्य  परिस्थिती जिल्ह्यात  विविध प्रकारचे निषेध आंदोलने  करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा विविध  घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात  दिनांक 1 ऑक्टोंबर,  2019 रोजीचे सकाळी 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 15 ऑक्टोबर, 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भा अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****








श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकाराने महापूजा


शारदीय नवरात्र महोत्सव-2019




         उस्मानाबाद,दि.02:-तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आजपासून चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमी निमित्त श्रीदेवीजींची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. आज तुळजापूरात विविध भागातून व आंध्र व कनार्टक राज्यातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, मंदिर संस्थानचे तहसीलदार योगिता कोल्हे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.  
          ललीता पंचमी निमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.                 
        दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  यात, उद्या दि. 03 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 04 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 05 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 06 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (मंगळवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
           या देवीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. मंदिर प्रशासनाने केलेल्या बदलास भाविकांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असून  एक ते दोन तासात गोंधळ न होता दर्शन होत असल्यामुळे भाविकांमधून उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय, दर्शनरांगांच्या ठिकाणी भाविकांच्या विश्रांतीसाठी कक्ष उघडल्यानेही भाविक या विश्रांती कक्षात विश्रांती घेत आहेत. दर्शनरांगेच्या सुरुवातीलाच धर्मदर्शन आणि मुखदर्शन तसेच अभिषेक पूजेची स्वतंत्र रांग असल्याने भाविकांची गर्दी विभागली जाऊन प्रत्येकाला श्री देवीजींचे दर्शन होत आहे.                         
***