Thursday, 3 October 2019

श्री तुळजाभवानी देवीजींचे मुरली अलंकार महापूजेचे मनोहारी रुप


शारदीय नवरात्र महोत्सव-2019




          उस्मानाबाद, दि.03: शारदीय नवरात्र महोत्सवात आज  पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती. विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवून भाविकांना सुलभपणे दर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
          दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांना चांगल्या पद्धतीने दर्शन मिळावे, यासाठी मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणानी समन्वयाने या गर्दीचे नियंत्रण केले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, मंदिर संस्थानचे तहसीलदार योगिता कोल्हे यांनी सातत्याने ठिकठिकाणी भेटी देऊन प्रत्येक ठिकाणी भाविकांना त्रास होणार नाही,  यापद्धतीने यंत्रणांना सूचना देत होते. तसेच महाद्वार, मंदिरातील पोलीस चौकी येथून वारंवार भाविकांना सूचना दिल्या जात आहेत. ज्या भाविकांची चुकामूक झाली, त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ ध्वनीक्षेपकावरुन कळवून पोलीस चौकी अथवा मदत केंद्रात येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी  याबद्दल समाधान व्यक्त केले. तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत खाजगी सुरक्षा रक्षक गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र भक्तांची सेवा करत आहेत नवरात्रीच्या कालावधीत अनेक रुग्णांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये ॲम्बुलन्स च्या माध्यमातून दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या सुरक्षारक्षकांनी केले आहे रुग्णा बरोबरच अस्थिव्यंग, अपंग, वयोवृद्ध यांची सेवा येथील सुरक्षारक्षक कर्मचारी करत आहेत.
दरम्यान काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  उद्या (दि. 04) श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.