वृत्त क्र.673 दि.01 ऑक्टोबर 2019
प्लास्टीक कचरा संकलनासाठी महाश्रमदान
मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे
– डॉ. संजय कोलते
उस्मानाबाद दि.01(जिमाका):- केंद्र शासनाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त देशभरात स्वच्छता ही सेवा हे अभियान दि.11 सप्टेंबर ते दि.27 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.या निमित्त या अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्हयामध्ये दि.2 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हाभरात प्लास्टीक कचरा निर्मुलनासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने गावागावात हा कार्यक्रम राबवून जिल्हा प्लास्टीकमुक्त करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील विविध गावांमध्ये दि.11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2019 दरम्यान स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम राबविण्यात येत असून या कालावधीत गावपातळीवर निर्माण होणा-या प्लास्टीक कच-याचे योग्य प्रकारे निर्मुलन करणे हा या मागचा उद्देश आहे.
दि.2 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हयातील सर्व गावांमध्ये गाव प्लास्टीकमुक्त करणेसाठी शपथ घेऊन सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा महाश्रमदानाद्वारे संकलित करुन त्याचे वर्गीकरण करणे तसेच एकच वेळ वापरात येणा-या प्लास्टीक कच-यावर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.तसेच गोळा होणा-या प्लास्टीक कच-यांची कार्यक्षम विल्हेवाट दि.3 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत लावणेबाबत कार्यवाही करणे आहे.तसेच स्वच्छता ही सेवा शपथ उपस्थितांना दिली जाणार आहे.
या संपूर्ण अभियान कालावधीत प्लास्टीक कचरा या विषयावर जनजागृती घडवून प्लास्टीक करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.आपले गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आणि प्लास्टीकपासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्याचे निर्मुलन करुन कापडी पिशव्यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.
सदर कार्यक्रम प्रत्येक गावात राबविण्यासाठी गाव स्तरावर ग्रामसेवक यांना नोडल ऑफीसर म्हणून नेमण्यात आले आहे.
जिल्हयातील प्रत्येक गावात तसेच शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी,कर्मचारी ,नेहरु युवा केंद्र,उमेद अंतर्गत सर्व बचत व ग्रामस्थ यांचेमार्फत हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले आहे.
****